computer

तव्याचा इतिहास, नावाचं उगमस्थान ते या इतिहासातलं मराठी माणसाचं योगदान! यातलं तुम्हांला कायकाय माहित होतं?

गेले अनेक आठवडे घरात बसलेल्या पुरुष मंडळींनी आतापर्यंत त्यांचे स्वयंपाकाचे प्रशिक्षण संपवून आता "संपू दे रे देवा हा बंदीवास" अशा प्रार्थना आळवायला सुरुवात केली असेल. ज्यांनी किचनमध्ये डोसे तव्यावर टाकण्याचे प्रयोग करून बघितले असतील त्यांना असाही एक साक्षात्कार झाला असेल की "पहिल्या प्रेमासारखा पहिला डोसा पण तव्यावरच वाया जातो". तर असे अनेक चटके सहन केलेल्यांसाठी बोभाटाचा हा खास लेख! आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर! काय म्हणता?

काही लाखो वर्षांपूर्वी माणसाला अग्नीचा शोध लागला. मग कधीतरी हातातलं कच्चं अन्न, एखादा मांसाचा तुकडा किंवा एखादं फळ चुकून शेकोटीत पडल्यावर त्याची चव वेगळीच छान लागली आणि माणसं माकडासारखं दिवसभर कच्चंमुच्चं न खाता भाजलेलं काहीतरी खायला लागली. कच्चं अन्न पचवण्यात जी उर्जा खर्च व्हायची ती वाचली. 'कमी खाऊन जास्त उर्जा' फॉर्म्युला माणसाला कळला. वाचलेल्या उर्जेतून मेंदूचा विकास झाला. याच प्रवासातच कधीतरी भाजलेल्या मातीचा तुकडा हाताशी लागला. त्यातून जन्माला आला भाजलेल्या मातीचा म्हणजे खापराचा तवा! ४०,००० ते २,००,००० वर्षांपूर्वी कधीतरी हा तवा जन्माला आला. आपण आजही तो खापराचा तवा वापरतोच आहे. 

(खापराचा तवा)

त्यानंतर माणसाला धातूचा शोध लागला. लोखंड, तांबं अशा धातूंचे गुणधर्म कळले. तांबं तसं कमी उपलब्ध होतं. लोखंड मात्र मुबलक मिळायचं. माणूस धातू गाळायला शिकला. धातू गाळण्याला 'स्मेल्टींग' असे म्हणतात. हे स्मेल्टींगचे तंत्र ज्यांना जमले ते आजही ' धावड' या नावाने ओळखले जातात. धावडांनतर आले घिसाडी, शिकलगार वगैरे. 

पण आधी चूल जन्माला आली आणि त्यानंतर लोखंडाचा तवा जन्माला आला. हा तवा म्हणजे बिडाचा तवा! बिड म्हणजे कच्चं लोखंड. बिडाला पिग आयर्न असेही म्हणतात. त्यात कोळशाचे म्हणजे कार्बनचे प्रमाण जास्त असल्याने ते लगेच गरम होतं. तवा ताबडतोब तापतो, तव्यावरची खरपूस भाकरी याच तव्यावर आधी जन्माला आली. याच गुणधर्माचा उपयोग सध्या पापड भाजण्याची जी तयार जाळी मिळते त्यात केलेला असतो. या जाळीची तार तापल्यावर लाल भडक होते हे तुम्ही पाह्यलंच असेल. पण बिडाचे काही दोषही आहेत. बिडाची वस्तू जमिनीवर पडली तर त्याचे तुकडे पडतात. दुसरा दोष असा की ते ताबडतोब गंजतं. म्हणजे रात्री तवा धुवून ठेवला तर सकाळपर्यंत त्यावर तांबेरा आलेला असतो. 

(बिडाचा तवा)

पण म्हणून काही बिडाचे तवे वापराच्या बाहेर गेले नाहीत. आजही घरोघरी बिडाचे तवे, बिडाची आप्पेपात्रे वापरले जातात. पण बाजारातून आणलेल्या बिडाच्या तव्याला तात्काळ स्वयंपाकघराचे सदस्यत्व मिळत नाही. वापरण्याच्या आधी त्याला दीक्षा द्यावी लागते. या दीक्षा देण्याला इंग्रजीत 'सिझनींग' म्हणतात. नवा तवा तापवून त्याच्यावर कांदा आणि तेल घालून मंद अग्नीवर तापवावे लागते. त्यात तेल मुरले की त्याचे सिझनींग होते. फक्त तवा धुवून तेलाचा हलका हात फिरवून ठेवावा लागतो नाहीतर तो रात्रभरात पण गंजतो.

प्रत्येक पिढीत काही बदल होत गेले आणि लगेच न गंजणारा, पडला तरी न फुटणारा, माइल्ड स्टीलचा पण स्टेनलेस स्टील नाही असा पोलादाचा तवा अस्तित्वात आला. त्याचे वेगवेगळे आकार आले. पुरणपोळीसाठी वेगळा, भाजी परतयाचा वेगळा, असे तवे जन्माला आले. पण 'तवा' हा शब्द आला कुठून? तर मंडळी, हे नाव आले फारसी भाषेतून! जिथे फारसीचा प्रचार झाला नाही त्या देशात म्हणजे उदाहरणार्थ पाकिस्तानात तव्याला 'साज' म्हणतात.

(ख्रिस्तपूर्व २७०० वर्ष जुना तवा)

ही टाइमलाईन आताच्या वर्षापर्यंत खेचत आणली तर आधी अ‍ॅल्युमिनियमच्या तव्याचा घरात प्रवेश झाला. स्वयंपाकघरातून पितळ तांबं हद्दपार झालं. त्या सर्व वस्तूंची जागा अ‍ॅल्युमिनियम आणि स्टेनलेसने स्टीलने घेतली. अ‍ॅल्युमिनियम स्वस्त होतं. तवे पण त्यातून बनायचे, पण त्याचं ऑक्सिडेशन होऊन काळपट राप यायचा. त्यावर उपाय म्हणून हिंदाल्को कंपनीने अ‍ॅल्युमिनियममध्ये ८ ते १० टक्के मॅग्नेशियम, अत्यल्प प्रमाणात क्रोमियम टाकून एक मिश्रधातू म्हणजेच अ‍ॅलॉय बनवला. त्याला नाव दिले हिंडालियम!! आता सगळेच तवेवाले ते नाव वापरतात.

यानतर पन्नासएक वर्षांपूर्वी 'न चिकटणारा' म्हणजे 'नॉन स्टीक' तवा घराघरात पोहचला आणि एक क्रांतीच घडली, तव्याला न चिकटणारी चपाती हे महिलांना वरदानच वाटायला लागले. लोखंड किंवा अ‍ॅल्युमिनियमच्या तव्यावर दिलेला टेफलॉनचा थर म्हणजे नॉनस्टीक तवा!! 

पण हे टॅफलॉन आले कसे? ती पण एक मनोरंजक कथा आहे. १९३८ साली रॉय प्लंकेट नावाच्या ड्यू पाँट कंपनीत काम करणार्‍या शास्त्रज्ञाला या रसायनाचा शोध लागला. टेफलॉन हे त्याचे खरे नाव, पण भारतात व्यापारी त्याचा उच्चार टॅफलॉन असा करतात. पॉलीटेट्राफ्लुरोएथीलीन (polytetrafluoroethylene or PTFE) हे त्याचे शास्त्रीय नाव आहे. त्याचा सुरुवातीचा उपयोग इंडस्ट्रीअल क्षेत्रात म्हणजे यंत्रांत व्हायचा. पण तव्यावर त्याचा वापर करून पेटंट घेण्याचा मान एका फ्रेंच इंजिनियरला मिळाला. त्यातून जन्माला आली नॉनस्टीक भांडी बनवणारी कंपनी टेफाल!! 

आपण मराठी माणसं नॉनस्टीक वगैरे न म्हणता या तव्याला एकाच नावाने ओळखतो. ते नाव म्हणजे 'निर्लेप'चा तवा!! १९६८ साली मुकुंद भोगले या मराठी माणसाने स्थापन केलेल्या 'निर्लेप' ब्रँडने अनेक वर्षे आपल्या स्वयंपाकघरात राज्य केले. १२००० रीटेलर्स आणि १०० कोटीचा टर्नओव्हर असलेली ही कंपनी!!  नॉनस्टीक कुकवेअर या शब्दाला 'निर्लेप' हे एकच नाव घराघरात आजही घेतलं जातं . नंतरच्या वर्षात अनेक डुप्लीकेट निर्लेप बनवणारे बाजारात आले पण निर्लेप तो निर्लेपच!! २०१८ साली ही कंपनी ८० कोटी रुपयांत बजाज इलेक्ट्रीकल कंपनीने विकत घेतली.

(मुकुंद भोगले)

लॉकडाऊनमध्ये आपली पोळी भाजून घेणार्‍या पुरुषांनो आणि वर्षानुवर्षे चटके सोसणाऱ्या ताई-माई-आक्कांनो,  तव्याचा हा इतिहास कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा!!

सबस्क्राईब करा

* indicates required