रात्री अडीच वाजता इरफान खानने अनोळखी फॅनसोबत लिफ्टमध्ये काय गप्पा मारल्या असतील??

२००५-०६ असेल बहुतेक. तेव्हा मी मुलुंडच्या आर माॅलमध्ये मेंटनेन्स डिपार्टमेंटला काम करायचो. मुंबईतल्या लोकांमध्ये तो माॅल बऱ्यापैकी प्रसिद्ध होता तेव्हा. कमाईचे अतिरिक्त साधन म्हणून आर माॅल हिंदी सिनेमाच्या शूटिंग्जना परवानगी देत असे. एकदा नाईट ड्युटीला असताना 'द किलर' नावाच्या हिंदी सिनेमाचे शूटिंग सुरू आहे एवढे कळाले. शुटिंग बघायला मिळणे ही मोठी पर्वणीच होती माझ्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांसाठी.

त्यापूर्वी सिनेमाचे शूटिंग बघण्याचा योग कधी आला नव्हता. त्यामुळे धावत पळत दुसऱ्या माळ्यावर पोचलो जिथे शूट सुरू होतं. नेमकं तेव्हा इरफान खान, इम्रान हश्मीचा पाठलाग करतो असा सिन सुरू होता. इरफान खान हातात पिस्तुल घेऊन अतिशय सहजतेने कॅमेऱ्यासमोर उभा होता. शोध घेणारे त्याचे डोळे, चेहऱ्यावरचे हावभाव अगदी अप्रतिम होते. तो सिन संपला, त्यानंतर रात्रभर ते शूट असणार होते म्हणून मी माझ्या कामासाठी पुन्हा कंट्रोल रूममध्ये परतलो.

स्रोत

मध्येच रात्री अडीच-तीनच्या दरम्यान सिस्टम्सच्या कामासाठी तिसऱ्या माळ्यावर जायला पार्किंग लिफ्टमध्ये उभा राह्यलो तोवर समोरून हातातली सिगरेट खाली टाकत “रूक, रूक" म्हणत एक माणूस घाईने लिफ्टकडे येताना दिसला. अगदी जवळ आल्यावर कळालं, तो समोर इरफान खान उभा होता. लिफ्टचे दार बंद झाल्यानंतर अगदी सहजेतेने त्याने गप्पा मारायला सुरूवात केली. काय करतो, किती पगार मिळतो, घरी कोण आहेत हे सगळे अगदी पूर्वीची ओळख असल्यासारखं हसऱ्या चेहऱ्याने तो मला विचारत राहीला. त्यानंतर लिफ्टमधून बाहेर पडतेवेळी धन्यवाद म्हणायलाही तो विसरला नाही. त्यावेळी त्याचं ते डाऊन टू अर्थ वागणं खूप आवडलं. त्याचे बहुतेक सगळेच सिनेमे मी पाह्यलेत, त्यातला नक्की आवडता असं सांगता येणार नाही, पण पिकूमधला त्याचा सहजसुंदर अभिनय मला खूप आवडला होता.

माझ्या या एका भेटीच्या मित्राला अलविदा !!

-- किसन शिंदे

 

सबस्क्राईब करा

* indicates required