computer

लिरिल गर्ल आणि ऍड - आयडिया, मॉडेल ते शूटिंग कसं आणि कुठे झालं यामागची डिट्टेलवार ष्टोरी!!

अगदी वयात येण्याच्या वर्षांमध्ये एका जाहिरातीची आपण सगळेच वाट बघायचो. हो,आणि आपणच  का?  बाबा, काका, मामा अशी सगळीच घरातली वयस्क मंडळी त्या वीस सेकंदाच्या जाहिरातीची वाट बघायची.  वीस सेकंदात अगदी फ्रेश करून टाकणारी जाहिरात होती, लिरिल साबणाची!

आजूबाजूची हिरवाई, त्यात कोसळणारा धबधबा आणि त्यातून बाहेर येणारी ती एकदम 'टकाटक' सुंदरी!! सोबत ते ला..लल..ला... ला ला ला असे बिनाशब्दांचे गाणे! वाह, मंडळी काय अनुभव होता तो! वीस सेकंदात दिल बाग बाग करणारी लिरिलची जाहिरात! 

तुम्हांला ही जाहिरात आठवत नसेल तर ' हाय ! कंबख्त ,तू ने पी ही नही'!

तुम्हाला आठवत असेल तर या जाहिरातीची जेव्हा दोस्तांमध्ये चर्चा व्हायची तेव्हा एखादा दोस्त उसासे टाकत सांगायचा " गेली बिचारी ती, माहित्येय ?"

तर मंडळी, आज आम्ही तुम्हाला या जाहिरातीची डिटेलवार माहिती देणार आहोत.  एखादी जाहिरात तयार होते तेव्हा त्या जाहिरातीमागे काय विचार असतो? तो विचार चित्ररुपात उतरवताना आर्ट डायेक्टर काय करतो? जर त्या जाहिरातीत संभाषण असेल तर त्याचे संवाद कोण लिहितं? असे अनेक प्रश्न असतील तर उत्तरं आज तुम्हाला मिळणार आहेत . सुरुवात करू या ही जाहिरात बनवणार्‍या एजन्सीपासून. 

चला तर मग आधी लिंटासच्या ऑफिसात जाऊ या 

लिंटास म्हणजे हिंदुस्थान लिव्हर (आता हिंदुस्थान युनिलिव्हर ) कंपनीची स्वतःची जाहिरात कंपनी. लिव्हर इंन्टरनॅशनल अ‍ॅडव्हरटायजींग सर्विसेस याचे लघुरुप म्हणजे लिंटास! १९६९ साली स्थापन झालेली ही कंपनी म्हणजे हिर्‍यांची खाण होती असे म्हणायला हरकत नाही. नंतरच्या काळात सिनेमासृष्टीत गाजलेले श्याम बेनेगल, अमूलवाले गार्सन डकुन्हा,  गौतम राजाध्यक्ष आणि चिनी कम-पा यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक बाल्की  हे सगळेच एकेकाळी लिंटासचे कर्मचारी होते. या जाहिरातीमागचा विचार  अ‍ॅलेक पदमसी यांनी दिला होता. आता हे अ‍ॅलेक पदमसी असा प्रश्न पडला असेल तर तो एका स्वतंत्र लेखाचा विषय होईल. 

आता वाचू या लिरिल गर्लबद्दल! मंडळी, आधी सांगीतलेली लिरिलची अ‍ॅड १९७४ साली आली आणि २००९ पर्यंत चालतच राहिली. सीन तोच होता, तोच धबधबा, पाण्याच्या तुषारांमध्ये धुंद झालेली ती नवयौवना आणि सोबत ते ला ... लल ....ला ... ललल... ला  ...लाला ...ला हे गाणे. पहिल्या जाहिरातीत लिरिल गर्ल होती  केरन लुनेल, १९८४ मध्ये पूजा बत्रा नंतर प्रिती झिंटा आणि अनेक मॉडेल आल्या, पण जादू तीच राहिली. 

ही जाहिरात अशीच का तयार झाली ते  सांगितलं की अलेक पदमसींचा 'भेजा ' कसा काम करायचा ते कळेल. लिव्हरला त्यावेळी लिरिल हा नवा साबण बाजारात आणायचा होता. त्याच वेळी लिव्हरचे अनेक साबण बाजारात होते आणि साहजिकच  या साबणांची आपसातच लढाई झाली असती. या एका कारणासाठी नव्या साबणाला नवी ओळख देणे भाग होते. लिव्हरचा लाईफ बॉय पुरुषांचा साबण समजला जायचा, रेक्सोना स्वच्छतेचा साबण, लक्स महागडा साबण आणि पेअर्स सुंदर त्वचेचा साबण अशी प्रत्येक साबणाची ओळख होती.  नव्या साबणाचे टार्गेट होते गृहिणी. घरची कामं करून थकलेल्या गृहिणीची दिवसभरात हक्काची अशी 'पर्सनल स्पेस' असते काम आटोपल्यावरची शॉवरखालची फक्त दहा पंधरा मिनिटांची!! या पंधरा मिनिटांत ती तिच्या जगातली हिरॉईन असते. ही पंधरा मिनिटं तिला पुन्हा एकदा फ्रेश म्हणजे तजेलदार करून टाकतात. 

आता समस्या अशी होती की गृहिणी टार्गेट असेल तर शॉवरखाली आंघोळ करणारी मॉडेल दाखवता आली असती.  पण मग 'गृहिणी' या इमेजला तडा गेला असता. नदीतून बाहेर पडणारी स्त्री दाखवली असती तर बघणार्‍याचे मन 'देवता ' या इमेजकडे गेले असते, समुद्रातून न्हाऊन  बाहेर पडलेली मॉडेल घ्यावी तर समुद्राचे पाणी आणि स्वच्छ पाणी या दोन्हींचा मेळ बसला नसता . ही एक  मोठी पंचाईत होती. मग पदमसीनी एक सर्व्हे घेतला.  त्यात असे आढळले की स्रियांच्या मनात मनसोक्त आंघोळ म्हणजे रोजच्या धबडग्यातून मिळणारे स्वातंत्र्य आणि त्या कल्पनेतून मिळाणारा तजेला!! हाच अनुभव काही पटीत मोठा केला तर शॉवरच्या जागी कोसळणारा धबधबा आणि तजेला देणारे तुषार! अशी जन्माला आली धबधब्याखाली मनमुराद, मनसोक्त आंघोळ करणार्‍या तरुणीची संकल्पना!!  तजेला अधोरेखीत करण्यासाठी त्याला लिंबाच्या सुगंधाची जोड देण्यात आली.

कागदावर तर जाहीरात तयार झाली.  आता प्रश्न होता की कोणत्या नैसर्गिक धबधब्याचा वापर शूटिंगसाठी वापरायचा? काही शूट्स खंडाळ्याच्या धबधब्याखाली घेण्यात आली. त्यानंतर फायनल शूटिंगसाठी कोडाइकनालच्या पांबर धबधब्याची निवड करण्यात आली. या जाहिरातीनंतर हा धबधबा एक ' टुरीस्ट डेस्टीनेशन 'च झाला. आता जुनं नाव विसरून लोकं याला लिरिल फॉल्स असेच म्हणतात. 

या शूटमध्ये मॉडेल फक्त हिरव्या रंगाच्या तोकड्या स्विमसूटमध्ये आहे. पण त्या तोकडेपणाचा स्पर्श बघणार्‍याच्या नजरेस येतच नाही,  कारण त्यांच्या डोळ्यासमोर अनुभव "संपूर्ण" घडतो.  तुकड्या तुकड्यात नाही.  हे कौशल्य कॅमेरा आणि एडिटींग करणार्‍याचे आहे. या जाहिरातीचे कॅमेरा आर्टीस्टचे होते विलास भेंडे.  (त्यांच्याबद्दल अपण एक वेगळा लेख करु.) 

(विलास भेंडे)

आता या शूटिंगदरम्यान घडलेला एक गमतीदार किस्सा सांगतो तो वाचाच! आपण वीस सेकंदाची जाहिरात बघतो.  पण प्रत्यक्ष शूट्स तासनतास चालतात. त्यातले तुकडे एकत्र करून जो फायनल कट तयार होतो तो आपण प्रेक्षक बघतो. मॉडेल केरन लुनेलला थंडी बाधू नये म्हणून शूटिंग दरम्यान तिला थोडी थोडी ब्रँडी देण्यात आली होती.  अशा अनेक छोट्या छोट्या घोटांमुळे केरन लुनेलल चांगलीच नशा चढली होती. त्यामुळे तिचा धबधब्यात तोल गेला तर काय? या विचाराने शूटिंग संपेपर्यंत सगळ्यांचा जीव टांगणीला लागला होता. 

(केरन लुनेल)

लिरिल गर्लच्या जादूने साबणाचा खप किती वाढला हे सांगायलाच नको. २००९ पर्यंत ही अ‍ॅड लिव्हरचा गल्ला भरत होती. 

लिव्हरच्या या कहाणीत एक वेगळाच ट्वीस्ट याच दरम्यान आला. या ट्वीस्ट्ची कथा म्हणजे निरमा आणि सर्फचे व्यापारी युध्द!! या युध्दाची बित्तंबातमी पुढच्या भागात आपण वाचू या! 
जा,  आता आंघोळ करा!!

 

आणखी वाचा : 

या एका फोटोमध्ये आहेत ४५ जाहिराती...तुम्हाला किती ओळखता येतायत पाहा !!

१९२४ सालच्या जाहिराती कशा होत्या?

सबस्क्राईब करा

* indicates required