टॉवेल आणि बेडशीट्स किती दिवसांनी धुवावेत ? तुम्ही किती दिवसांनी धुता ?

मुंबईसारख्या शहरात एक दिवस घातले की कपडे धुवायला टाकावेच लागतात. पण इतर गावांतले लोक असं करतच असतील असं नाही. आणि हॉस्टेलवर राहणाऱ्या लोकांचा तर आपण विचारच करायला नको. हो ना ? 

तर,  ते जाऊ द्या. आजचा आपला विषय अंगावरचे कपडे कधी धुवायला टाकायचे हा नाही, तर बेडशिट्स आणि टॉवेल किती दिवसांत धुवायला हवेत हा आहे. 

स्रोत

आता तसं बघायला गेलं तर, प्रत्येकवेळी वापरल्यावर टॉवेल धुवायला हवा असं संशोधकांचं म्हणणं आहे. कारण टॉवेल म्हणजे बॅक्टेरिया, बुरशी, मृत त्वचा, शरीरातून बाहेर पडणारे वेगवेगळे स्राव, आणि तुमच्या बाथरुममधून टॉवेलवरती आलेले इतर जंतूंचं माहेरघर असतं. पण तुम्हांला आणि आम्हांलाही माहित आहे की हे शक्य नाही. तेव्हा न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमधल्या फिलिप टिएर्नो या मायक्रोबयोलॉजिस्टचं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमचा टॉवेल न धुता जास्तीत जास्त तीन वेळा वापरु शकता! ते सुद्धा प्रत्येक वापरानंतर टॉवेल नीट सुकवला गेला असेल तरच. ओलसर टॉवेलात विषाणू जास्त पटकन वाढतात. याचाच अर्थ तुम्ही तुमच्या बहीण-भावंडाचा किंवा लग्नाच्या जोडीदाराचा टॉवेलतर नक्कीच वापरु शकत नाही. अहो, जिथे तुमचे स्वत:चे विषाणूच तुम्हांला इतके घातक ठरणार असतील, तर इतरांच्या विषाणूंची काय कथा ??

स्रोत

जर टॉवेलच दर तीन दिवसांनी किमान धुतले पाहिजेत, तर मग बेडशीट्स, म्हणजेच बिछान्यावरच्या चादरींचं काय? त्या तर टॉवेलहून अधिक अस्वच्छ असतात. तुम्ही ओला टॉवेल बेडवर टाकता, तेव्हा त्यातले बॅक्टेरिया आणि इतर गोष्टी बेडवर तर येतातच, पण मग बेडवर बसून लावलेल्या क्रीम्स, धुळीतले कीडे, बुरशी आणि इतर अस्वच्छ गोष्टी पण त्या चादरीवर जमा होतात. जसजसा बेडशीटवरचा ऐवज वाढत जातो, तसतशी तुम्हांला त्याची ॲलर्जी व्हायला पण सुरुवात होऊ शकते. पण आहेच आपलं सतत चोंदलेलं नाक नाहीतर इतर काही ॲलर्जीज. 

असं म्हणतात की एक मनुष्य प्राणी एका वर्षात सुमारे ९८ लिटर घाम आपल्या बेडमध्ये उत्सर्जित करतो. आणि हा घाम कधी आपल्याला दिसतही नाही. म्हणजेच, हा घाम बेडशीटमध्ये शोषला जातो. त्यामुळंच, आपल्या बेडवरची चादर किमान आठवड्यातून एकदा तरी धुवायलाच हवी. आणि हो, पांघरुणसुद्धा वर्षातून किमान ६-८वेळा धुवायला हवं. 

चला तर मग, पटापट चादरी बदलू आणि टॉवेलही धुवायला टाकू..

सबस्क्राईब करा

* indicates required