अशी करा पिकांची पाहाणी इ-पीक पाहणी या ॲपच्या माध्यमातून!!

सध्या महाराष्ट्रात इ-पीक पाहणी या ॲपची चर्चा आहे. यंदा पीक पाहणी शेतकऱ्यांनी ऑनलाईन करावी यासाठी शासनाने इ-पीक पाहणी हे ॲप सुरू केले आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकरी आपली पीक पाहणी करू शकणार आहेत. यासाठी आम्ही अतिशय सोप्या पद्धतीने पीक पाहणी कशी करता येईल हे सांगणार आहोत.

सर्वात आधी तर गुगल प्ले-स्टोरवर जाऊन इ-पीक पाहणी नावाचे ॲप डाउनलोड करून घ्यावे. ॲप उघडल्याबरोबर एक बाणसारखी निशाणी येईल त्यावर डावीकडे सरकवुन 'पुढे' जिथे लिहिले असे तिथे क्लिक करावे. आता आपला मोबाईल क्रमांक टाकावा त्यानंतर तीन रकाने येतील. पहिल्या रकान्यात आपला जिल्हा निवडावा, दुसऱ्या खात्यात तालुका आणि सर्वात शेवटी आपले गाव. यावेळी एका गोष्टीची काळजी घ्यावी ती म्हणजे आपली शेती ज्या गावाच्या शिवारात येत असेल ते गाव निवडावे.

एवढं झाल्यावर खातेदार निवडायचा असेल. यावेळी तुम्हाला खातेदाराचे नाव, मधले नाव, आडनाव, गटक्रमांक असे पर्याय दिसतील. यापैकी तुम्हाला सोयीस्कर ती माहिती तिथे टाकावी. आता परत 'पुढे' हे बटन दाबावे. तिथे तुम्हाला मोबाईल क्रमांक दिसेल तो बरोबर आहे का हे बघून पुढे बटन दाबा. तुम्हाला सांकेतांक क्रमांक (ओटीपी) येईल तो टाकला की मग स्क्रीनवर सहा वेगवेगळे पर्याय दिसतील.

सुरुवातीला परिचय या पर्यायावर क्लिक करा. तिथे वैयक्तिक माहिती भरावी. मग होम या बटनावर क्लिक करून मागे यावे, तिथे पिकांची माहिती असे असेल तिथे क्लिक करा. तिथे तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. जसे गट क्रमांक, हा पर्याय निवडला की पुढे तुमच्या नावावर असलेले क्षेत्र आणि पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र आपोआप येते तिथे काही टाकण्याची गरज नाही.
मग पुढे तुमच्या पिकाची माहिती विचारली असेल. ती टाकावी. एकच पीक असेल तर तसे निवडावे अनेक पिके असतील तर मिश्र पिके निवडावे. पुढे शेतात सिंचन कोणत्या साधनाने केले आहे त्याची निवड करावी. पीक कोणत्या तारखेला लागवड केली हे टाकावे. सर्वात शेवटी तुम्हाला कॅमेऱ्याचा फोटो दिसेल. त्यावर क्लिक केल्यास कॅमेरा ओपन होतो. आता आपल्या शेतीचा फोटो काढावा आणि सबमिटवर क्लिक करावे.

तुम्हाला आपली पीक माहिती सबमिट झाली आहे, असा मेसेज स्क्रीनवर दिसेल. अशा पद्धतीने तुम्ही तुमची पीक पाहणी करू शकता. तुम्ही दिलेली माहिती बघण्यासाठी पिकांची माहिती यावर क्लिक करावे. अशा पध्दतीने तुम्ही कुणाचीही मदत न घेता स्वतःची पीक पाहणी स्वतःच करू शकता.