computer

मुंबई इंडियनविरूध्द हॅट्ट्रिक केलेल्या हर्षल पटेलने असा केला आहे १० वर्षं क्रिकेटमध्ये स्ट्रगल!!

मध्येच पडलेला खंड पार करून आणि कोरोना झालेल्या खेळाडूंना सांभाळत आता आयपीएल पुन्हा नव्याने सुरू झाले आहे. विजेतेपदाचे दावेदार मुंबई इंडियन्सने बँगलोर विरुध्दचा कालचा सामना गमावला आहे. पण या सामन्यात बंगळुरूच्या हर्षल पटेल नावाच्या नवख्या खेळाडूने ५ वेळा विजेत्या मुंबईच्या बॅटसमॅनना एकेक करत पॅव्हेलीयनचा रस्ता दाखवला. कालपासून फक्त त्याच्या हॅट्ट्रिकची चर्चा आहे.

मुंबई विरुद्ध एकाच सामन्यात ५ विकेट घेण्याचा विक्रम देखील त्याने एप्रिलमध्ये झालेल्या सामन्यात स्वतःच्या नावावर केला होता. त्याच्या बॉलिंगची कमाल म्हणूनच बंगळुरूने कधीनव्हे ते आपले स्थान भक्कम केले आहे. हर्षल पटेल आज जरी एकाच सामन्यामुळे पुन्हा एकदा प्रसिध्द झाला असला तरी तो गेली १० वर्षं क्रिकेट खेळत आहे.

हर्षल या मूळ गुजरातचा आहे आणि तो हरियाणाकडून रणजी सामने खेळतो. ३० वर्षीय हर्षल २०१० साली झालेल्या अंडर १९ वर्ल्डकपच्या संघाचा भाग होता. त्या संघात के. एल. राहुल, जयदेव उनाडकट, मयंक अग्रवाल असे खेळाडू सामील होते. पण त्या वर्ल्डकपमध्ये त्याला एकही सामना खेळायला मिळाला नाही.

याआधी हर्षलला मुंबई इंडियन्सने ८ लाखांत खरेदी केले होते. पण भावाचे नशीब एवढे खराब की इथे देखील त्याला खेळविण्यात आले नाही. सुरुवातीला त्याने गुजरातकडून रणजी खेळण्याचा प्रयत्न केला, पण तिथे त्याला काय संधी मिळत नव्हती, शेवटी तो मग हरियाणाकडून रणजी खेळू लागला. गेली १० वर्षं तो स्ट्रगल करतोय असे म्हणावे लागेल. ज्या वयात लोक निवृत्तीची तयारी करतात त्या वयात त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. 'कोशिश करनेवालों की कभी हार नहीं होती' म्हणतात तेच खरे!

हर्षल पटेल हा खरेतर २०१० सालीच अमेरिकेत शिफ्ट होणार होता. पण त्याच्या क्रिकेट प्रेमाने त्याला रोखले. हर्षलचा मोठा भाऊ तपन याने देखील त्याला प्रोत्साहन दिले. विशेष गोष्ट म्हणजे आजही हर्षल हा अमेरिकेचा ग्रीन कार्ड होल्डर आहे. हर्षलने या सीझनच्या पहिल्याच सामन्यात धुराळा उडवून हवा केली होती, पुढे त्याचा जलवा 'बरकरार' रहातो की परत संघर्ष करावा लागतो हे काळच ठरवेल...

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required