computer

प्लाझ्मा दान काय असतं? कोण करू शकतं? काय नियम आहेत? सगळी माहिती जाणून घ्या !!

सध्या प्लाझ्मा दानसाठी अनेक मेसेज फिरत आहेत. रक्तदान करून प्लाझ्मा दान करता येतो. कोरोनावर मात केलेल्या व्यक्ती हे रक्तदान करू शकतात. जे कोरोना रुग्ण आयसीयूमध्ये दाखल झालेले आहेत त्यांचे प्राण यामुळे वाचू शकतात. परंतु सरसकट सर्वजण रक्तदान करू शकतात का? यासाठी काही आवश्यक बाबी माहिती असणे गरजेचे आहे. आजच्या लेखातून प्लाझ्मा दानाबद्दल महत्त्वाची  माहिती जाणून घेऊ या.

प्लाझ्मामुळे काय फायदा होतो?

जेव्हा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह होऊन बरा होतो त्यानंतर त्याच्या रक्तात अँटीबॉडी तयार होतात. डॉक्टरांनुसार जर रक्तातून प्लाझ्मा वेगळा करून कोरोना रूग्णाला दिला तर तो त्यांना बरे होण्यास मदत करतो. या तयार एंटी-बॉडी रूग्णाच्या रक्तात मिसळून एकत्रितपणे कोरोनाशी लढण्यासाठी जास्त शक्ती देतात. रुग्ण आयसीयूत असेल तर त्याचा जीव वाचतो.

प्लाझ्मा दान कोण करू शकतो?

- करोनाची बाधा होऊन बरा झालेला रुग्ण.

- वयोगट १८ ते ५५ वर्ष.

- आजारपणानंतर ३० ते ४० दिवसांनंतर प्लाझ्मा दान करू शकतो.

- वजन ५० किलोपेक्षा जास्त असावे.

- मधुमेह, उच्चरक्तदाब नसावा.

प्लाझ्मा दान कोण करू शकत नाही ?

- ज्यांच्या शरीरात अगदी कमी प्रमाणात अॅण्टिबॉडीज आहेत अशा व्यक्ती

- ज्या स्त्रिया गरोदर आहेत.

- ज्यांचे हिमोग्लोबिन १२ ग्रॅम टक्क्यांपेक्षा कमी आहे अशा व्यक्ती.

- एचआयव्ही, सिफिलीस, मूत्रपिंडारोपण झालेले रुग्ण, कर्करोग, ह्युमन टी सेल ल्युकेमिया व्हायरस1 ने बाधित झालेल्या व्यक्ती.

- कर्करोगाने बरे झालेले लोकं.

- ज्यांना मूत्रपिंड, हृदय, फुफ्फुस किंवा यकृत यांचा रोग आहे.

- ज्यांचे वजन ५० किलोपेक्षा कमी आहे.

प्लाझ्मा घेताना रक्ताची तपासणी करून त्यात किती प्रमाणात अॅण्टिबॉडीज आहेत, त्याला रक्तातून पसरणारे आजार तर नाहीत ना, याचे मोजमाप करूनच घेतला जातो. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. आता खरंच गरज आहे यासाठी पुढे येण्याची. ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर हे दान करावे ही कळकळीची विनंती.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required