computer

भारतीय सैनिकांनी गुडघाभर बर्फातून २ किलोमीटर चालत गरोदर महिलेला हॉस्पिटलपर्यंत पोचवलं...

सगळीकडेच वातावरण बदलेले आहे. आधीच थंड हवामान असणाऱ्या काश्मीर मध्ये तर हा ऋतू फारच जीवघेणा ठरतो. त्यात या ऋतूत तिथे बर्फवृष्टीही होते. गेले दोन दिवस काश्मीर मध्ये बर्फवृष्टी सुरु आहे. अनेकदा पर्यटकही या बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी काश्मीर मध्ये जातात. पण, निसर्गाने रौद्र रूप धारण केलेच तर ही बर्फवृष्टी आनंददायी वाटण्याऐवजी जीवघेणी वाटू लागते. गेले दोन दिवस सुरु असलेल्या बर्फवृष्टीमुळे काश्मीर मधील जनजीवन पूर्ण विस्कळीत झाले आहे. या बर्फवृष्टीमुळे काश्मीर मधील विमानसेवाही बंद करण्यात आली आहे.

अशात अचानक पहाटे पाच वाजता सैनिकांना एक फोन येतो. पलीकडून बोलणारी व्यक्ती अतिशय तणावग्रस्त आवाजात बोलत असते, “माझी बायको गरोदर आहे. तिला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल. मी घरातून बाहेरही पडू शकत नाही. घराच्या चारही बाजूला बर्फाचा खच पडला आहे आणि इथून बस मिळणेही अशक्य आहे.”

अशा अडचणीच्या वेळी सैनिकांना फोन करणाऱ्या त्या व्यक्तीचे नाव आहे ‘मंझूर अहमद शेख’. काश्मीर मधील फार्कीयान गावाचा हा रहिवासी. हे गाव उंच डोंगरावर वसलेले आहे. बर्फवृष्टीच्या काळात अशा डोंगर भागात राहणाऱ्या लोकांना तर खूप साऱ्या अडचणींना सामोरे जावे लागते. दवाखान्यात जाण्यासाठी त्याच्याकडे गाडीही नव्हती आणि स्थानिक वाहतूक तर अतिरिक्त बर्फ पडल्याने कधीचीच ठप्प झालेली. अशा कठीण प्रसंगात त्याला आठवण झाली ती लष्कराची आणि लष्करातील सैनिकांची. त्याचा फोन येताच सैनिकांनाही प्रसंगाचे गांभीर्य लक्षात आले.

रस्त्यावर गुडघाभर बर्फाचा खच पडलेला असतानाही ते त्याच्या घरी पोहोचले. सोबत लष्कराच्या दवाखान्यातील कर्मचारीही होतेच. मंझूर शेख यांचे घर ते हॉस्पिटल यातील अंतर जवळपास दोन किलोमीटर आहे. सैनिकांनी त्या स्त्रीला आपल्या खांद्यावर घेतले आणि बर्फाच्या ढिगाऱ्यातून वाट काढत हे दोन किलोमीटर अंतर पार केले.

दवाखान्यातील कर्मचाऱ्यांना लष्कराचे जवान एका गरोदर स्त्रीला घेऊन येत असल्याची कल्पना आधीच देण्यात आली होती. कारालपूर येथील दवाखान्यात पोहोचल्यानंतर लगेचच त्या स्त्रीला आवश्यक ते उपचार आणि सहाय्य दिले गेले. काही वेळातच तिने एका मुलाला जन्म दिला. आता दोघही सुखरूप आहेत.

या ऋतूतील ही पहिलीच बर्फवृष्टी आहे आणि त्यातही शनिवारी झालेल्या अतिरिक्त बर्फवृष्टीमुळे सगळीकडचे जनजीवनच विस्कळीत झाले आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या उधमपूर जिल्ह्याच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी या प्रसंगाचा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. सैन्य आणि स्थानिक नागरिक यांच्या मदतीने एका गरोदर स्त्रीला जवळच्या सार्वजनिक आरोग्य केंद्रावर पोहोचवण्यात यश आले, अशी माहिती त्यांनी या व्हिडीओसोबत दिली आहे.

गेल्यावर्षी म्हणजे जानेवारी २०२० मध्येही जवानांना असाच एक फोन आला होता. तेव्हाही एका गरोदर स्त्रीला जवानांनी अशाच पद्धतीने उचलून नेऊन दवाखान्यात पोहोच केले होते. दार्दपोरा गावातील ही महिला होती. तिनेही हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर एका गोंडस मुलाला जन्म दिला होता.

देशातल्या कुठल्याही कोपऱ्यात कसलीही आपत्ती उभी राहते तेव्हा पहिल्यांदा आपल्याल आठवण होते ती या जवानांचीच. आपल्या जवानांची ही तत्परता आणि सदा सतर्क राहण्याच्या सवयीमुळेच आज त्या महिलेचे आणि तिच्या नवजात बाळाचेही प्राण वाचले. कुठल्याही खडतर परिस्थितीतून मार्ग काढण्याच्या आणि त्या परिस्थितीला सामोरे जाण्याच्या जवानांच्या या कणखर मानसिकतेचा खरोखरच आम्हाला एक भारतीय नागरिक म्हणून अभिमान आहे.

 

लेखिका : मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required