computer

या भारतीयाने लंडनच्या पोलीस हेडक्वार्टरला चक्क हॉटेलमध्ये बदललं?? कोण आहे हा माई का लाल ??

एका भारतीयाने लंडनच्या मधोमध पंचतारांकित हॉटेल उभारलं आहे भाऊ. ही तशी मोठी गोष्ट राहिलेली नाही, कारण भारतीयांनी जगभर आपला ठसा उमटवला आहे. पण या भारतीयाने ज्या जागेत हे पंचतारांकित हॉटेल बांधलं आहे ते बघून तुम्हाला नक्कीच कौतुक वाटेल.

ती इमारत आहे लंडनची ‘दि ग्रेट स्कॉटलंड यार्ड’ बिल्डिंग. या इमारतीचं रुपांतर युसुफ अली या भारतीय उद्योगपतीने एका पंचतारांकित हॉटेल मध्ये केलं आहे. युसुफ अली हे पद्म पुरस्कार प्राप्त उद्योगपती आहेत. ते लुलू ग्रुप इंटरनॅशनल या कंपनीचे मुख्य आहेत. २०१६ साली त्यांनी स्कॉटलंड यार्ड इमारत विकत घेतली होती. त्यानंतर इमारतीच्या कायापालटाची सुरुवात झाली. यावर्षी हे काम पूर्ण झालं आहे. या कामात तब्बल ७५ मिलियन पाऊंड एवढा खर्च आला आहे राव. भारतीय चलनाप्रमाणे ६८३,४३,५९,९३४ रुपये.

पुढे आणखी जाणून घेण्यापूर्वी ‘दि ग्रेट स्कॉटलंड यार्ड’ इमारतीचं महत्व समजून घेऊया !!

लंडनची प्रसिद्ध ‘स्कॉटलंड यार्ड’ उर्फ ‘दि ग्रेट स्कॉटलंड यार्ड’ इमारत एकेकाळी लंडनच्या मेट्रोपोलिटन पोलीसांच मुख्यालय होतं. ही इमारत तयार झाली १८९० साली. त्यापूर्वीच स्कॉटलंड यार्ड भागाला पोलीस ठाण्याचं स्वरूप आलं होतं. आपल्याकडे जसं दलाल स्ट्रीट म्हटलं की शेअर बाजार आठवतो तसं स्कॉटलंड यार्ड म्हटलं की फक्त पोलिसच आठवायचे. १८९० साली तयार झालेल्या या नव्या इमारतीने तर या भागाला नवी ओळख मिळवून दिली.

(ब्रॉडवे येथील मेट्रोपोलिटन पोलीस मुख्यालय ज्याला न्यू स्कॉटलंड यार्ड नाव देण्यात आलं होतं.)

नव्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मागणीमुळे आणि जागेच्या अभावी १९६७ साली मेट्रोपोलिटन पोलिसांनी आपलं मुख्यालय लंडनच्या ब्रॉडवे भागात हलवलं. पुढे २०१३ साली मेट्रोपोलिटन पोलिसांनी ‘कर्टिस ग्रीन बिल्डिंग’ येथे आपलं मुख्यालय स्थापन केलं, पण स्कॉटलंड यार्ड हे नाव इतकं प्रसिद्द होतं की ‘कर्टिस ग्रीन बिल्डिंग’चं नाव बदलून ‘दि ग्रेट स्कॉटलंड यार्ड’ ठेवण्यात आलं.

२०१६ साली जुन्या आणि ऐतिहासिक ‘दि ग्रेट स्कॉटलंड यार्ड’ इमारतीला युसुफ अली यांनी विकत घेतलं. या इमारतीचा कायापालट करून त्यांनी त्याला एका पंचतारांकित हॉटेलचं रूप दिलं आहे.

स्कॉटलंड यार्ड हॉटेलचं स्वरूप कसं आहे ?

हॉटेल मध्ये १५३ खोल्या तयार करण्यात आल्या आहेत. मूळ इमारतीत काही मोजक्या खोल्या या लंडनच्या प्रसिद्ध इमारतींच्या बाजूने उघडायच्या. जसे की एक खोली इंग्लंडच्या शाही परिवाराच्या बकिंगहॅम पॅलेसच्या बाजूने होती. अशा महत्वाच्या खोल्यांना त्यांच्या मूळ रचनेतच ठेवण्यात आलं आहे. तुम्हाला जर या हॉटेल मध्ये एक रात्र राहायचं असेल तर त्यासाठी प्रत्येकी १०,००० पाऊंड मोजावे लागणार आहेत भाऊ. आजच्या पाऊंडच्या भावाप्रमाणे ९,१०,४९९ रुपये.

पोलीस मुख्यालय म्हणजे इमारतीत जेल पण आलंच. युसुफ अली यांनी त्या जुन्या लॉकअपचा वापर मिटिंग रूम म्हणून केला आहे. इमारतीत १९ व्या शतकातील महिला लुटारुंच्या कारवायांची साक्ष देणारं एक झुंबर पण आहे. हे झुंबर त्याच्या मूळ जागीच ठेवण्यात आलं आहे. या महिला लुटारूंना 'दि फोर्टी एलिफंट्स' नावाने ओळखलं जायचं.

(युसुफ अली)

मंडळी, यावर्षाच्या अखेरीस हॉटेल लोकांसाठी खुलं होणार आहे. लंडन मध्ये फिरायला जाण्यासाठी आता एक नवीन कारण तयार झालं आहे असं म्हणायला हरकत नाही. हे कारण एका भारतीयाने दिलंय याचा जास्त आनंद होतोय.

सबस्क्राईब करा

* indicates required