computer

कथा गुप्तहेरांच्या - भाग १ : पाकिस्तानच्या अणू संशोधनाची हेरगिरी करणारे मोहनलाल भास्कर!

आपल्यासारख्या सामान्य नागरिकांना गुप्तहेरांबद्दल प्रचंड कुतूहल आणि आदर मिळतो. अर्थात ज्या प्रकारचं काम हे गुप्तहेर करतात, त्या कामामुळं हे कुतूहल आणि आदर दोन्ही गोष्टींना गुप्तहेर सार्थ ठरतात. गुप्तहेर देशासाठी फक्त जीवच  धोक्यात घालत नाहीत, तर त्यासोबत असतं त्यांचं कमालीचं कर्तृत्व. कित्येकदा ते परक्या देशात ओळख लपवून राहतात, पकडले गेले तर देश आपला गुप्तहेर म्हणून ओळख नाकारेल हे ही त्यांना माहित असतं, पावलोपावली धोके तर असतातच. या सर्व गोष्टींमुळे त्यांचं काम कसं चालतं, हे कौशल्य ते कसं मिळवतात याबद्दल प्रचंड औत्सुक्य पाहायला मिळतं. म्हणूनच की काय, पण गुप्तहेरांवरचे सिनेमे केवळ भारतातच नाही, तर पूर्ण जगभरात तुफान चालतात.

आज आम्ही अशाच काही कर्तृत्ववान भारतीय गुप्तहेरांची माहिती एका लेखमालिकेच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत. हे परदेशात आपली ओळख बदलून राहिले आणि त्यांची देशाला प्रचंड मदत झाली आहे. मालिकेची सुरवात करत आहोत मोहनलाल भास्कर या भारतीय गुप्तहेरापासून.

मोहनलाल भास्कर

तेरे लहू से सिंचा है अनाज हमने खाया |
ये जज्बा ए शहादत का है उसीसे हममे आया ||

१९६६ साली भगतसिंहांच्या समाधीवर मोहनलाल यांच्या बोलांची प्रशंसा फक्त नागरिकच नाही, तर काही भारतीय गुप्तहेरही करत होते. आणि इथूनच मोहनलाल यांचा गुप्तहेर होण्याचा प्रवास सुरु झाला.

मोहनलाल यांची निवड पाकिस्तानात होत असलेल्या परमाणू चाचणीची हेरगिरी करण्यासाठी झाली होती. मुसलमान बनून त्यांना पाकिस्तानात राहायचे होते. कुणाला शंका येऊ नये म्हणून त्यांनी चक्क सुंताही करून घेतली होती. मात्र या गोष्टीची कुणकुण त्यांच्या घरात कुणाला नव्हती.

तो काळ १९६७ चा होता. पाकिस्तान आपल्या अंतर्गत गोष्टींमुळे जळत होता. आधी सेनाप्रमुख आणि नंतर राष्ट्रपती झालेले आयुब खान यांची हुकूमशाही आता कमजोर व्हायला लागली होती. यामुळे झुल्फिकार अली भुट्टो हे पाकिस्तानी जनतेत लोकप्रिय होत होते. १९६५ च्या युद्धानंतर भुट्टो यांनीच परमाणू कार्यक्रमाचा अहवाल तयार केला. याच कार्यक्रमाची माहिती एकत्र करण्यासाठी भास्कर यांना पाकिस्तानात सक्रिय केले गेले होते.

कुणाला संशय येऊ नये म्हणून रात्री वेश्यांच्या ठिकाण्यावर मुक्काम, तर दिवसभर परमाणू चाचणीची माहिती गोळा करणे हा त्यांचा ठरलेला दिनक्रम होता. याकामी ते पाकिस्तानातल्या लाहोर, सियालकोट, मुलतान, लायलपूर, पेशावर, रावलपिंडी यांसारख्या सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये फिरून आले होते. या फिरस्तीमधून पाकिस्तानी अणूचाचणीची बऱ्यापैकी माहितीसुद्धा त्यांनी गोळा केली होती. पण अचानक घात झाला. फितुरीने तसाही सगळ्यांचा नेहमीच घात केला आहे.

मोहनलालांचा अमरीक सिंग नावाचा एक सहकारी होता. या शहाण्यानं पैशांच्या लालसेपायी मोहनलाल यांची माहिती पाकिस्तानला दिली आणि साहजिकच मोहनलालना अटक झाली. फितुरांनाही फितुरी बरेचदा पचत नाहीच.  पुढे जाऊन अमरीक सिंगची गरज संपली आणि त्यालाही पाकिस्तानने तुरुंगात डांबले. अमरीक सिंगच्या गद्दारीची शिक्षा म्हणून त्याला सोडविण्यासाठी कुणी प्रयत्नदेखील केले नाहीत.

मोहनलाल यांनी लिहिलेल्या "मी पाकिस्तानात भारतीय  गुप्तहेर होतो" या पुस्तकात पाकिस्तानने दिलेल्या नरकयातनांबद्दल लिहिले आहे.  "भारतीय कैद्यांसाठी वेगळी काळकोठडी असते. जिथे इतका त्रास दिला जातो की कैदी एकतर वेडा होतो किंवा मग तो मरून तरी जातो. जोवर मरत नाही तोवर रोज फक्त मरण्याची प्रार्थना तो करत असतो."

मार खाऊन कैदी बेशुद्ध झाला तर त्याला अफूच्या हेवीडोसचे इंजेक्शन दिले जात असत. गुप्तांगांना सिगरेटचे चटके देणं, नखं काढून घेणं, नग्न करून बर्फाच्या लादीवर झोपवणं, असं प्रचंड हाल तिथं केलं जात होतं. जेव्हा मोहनलाल यांना अटक झाली तेव्हा त्यांच्या लग्नाला फक्त ८ महिने झाले होते आणि त्यावेळी त्यांची पत्नी गर्भवती होती.

अटकेनंतर ६ वर्षं ते पाकिस्तानच्या तुरुंगात अतोनात हाल सहन करत होते. पण पाकिस्तानी प्रलोभनं आणि नरकयातना दोन्हीमुळेही त्यांची देशावरची श्रद्धा ढळली नाही. भारतानं १९७१ चं युद्ध जिंकलं आणि शिमला करार झाला. या करारान्वये मोहनलाल यांची सुटका झाली.

(शिमला करार)

भारतात परतल्यानंतरसुद्धा त्यांच्यापुढील आव्हान संपत नव्हते. त्यांना नविन काम मिळवण्यासाठी अडथळे येत होते. अर्थात याला इतर कारणंही असतात. उदाहरणार्थ, शत्रूच्या हाती सापडलेल्या हेराला पुन्हा हेरगिरीवर/फील्डवर पाठवत नाहीत. कदाचित तो डबल एजंट बनलेला असू शकतो किंवा त्याचे weak पॉईंट्स शत्रूला कळलेले असू शकतात. त्यांना ऑफिसवर्क किंवा जिथं महत्त्वाची माहिती मिळू शकणार नाही अशी कामं दिली जातात. युद्धकैद्यांनाही हे नियम बरेचदा लागू होतात.

मोहनलाल भास्कर पाकिस्तानच्या कैदेतून सुटले तेव्हा मोरारजी देसाई पंतप्रधान होते. एकंदरीत अशा सगळ्या प्रकरणांच्या मुद्द्यावर त्यांच्याबद्दल सकारात्मक काही जास्त वाचायला मिळत नाही. सरकारने त्यांना आणि इतर गुप्तहेरांना कशी सापत्न भावाची वागणूक दिली हे सांगताना मोहनलाल भावुक होत असत. आपल्या आयुष्याची महत्वाची वर्षे देशाला देऊनही अशा वागणूकीची त्यांना अपेक्षा नव्हती. भास्कर यांच्यासमोर आता नविन आव्हान होते ते म्हणजे भारतात परतल्यावर नव्या पद्धतीने जीवन सुरू करणे. मात्र झालेल्या त्रासामुळे हात टेकले नाहीत. उलट समाजासाठी स्वत:ला वाहून घेतले. त्यातूनच त्यांनी पुढे त्यांनी मानव मंदिर सेकंडरी स्कूल नावाची शाळा काढली होती.

(मायदेशी परतल्यानंतरचा फोटो)

या माणसाचं सगळं आयुष्य रोचक होतं म्हणायला हरकत नाही. त्यांनी मूळ हिंदीत लिहिलेलं "मैं पाकिस्तानमें भारत का जासूस था" हे पुस्तक अमेझॉनवर इंग्रजीतही उपलब्ध आहे. हरिवंशराय बच्चन यांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. यातून त्यांना आत्मकथा लिहिण्याची प्रेरणा मिळाली होती. पुस्तकाच्या प्रस्तावनेत प्रसिद्ध लेखक खुशवंत सिंग सांगतात की हा एक चमत्कारच आहे की एवढ्या हालअपेष्टा सहन करून देखील मोहनलाल आज जिवंत आहेत. या पुस्तकाला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. असं म्हणतात की २००४ साली त्यांनी सिनेसृष्टीत प्रवेश केला आणि "ये है प्यार का मौसम" नावाच्या सिनेमाची त्यांनी निर्मिती केली. मात्र या सिनेमाच्या अस्तित्वाचे संदर्भ इंटरनेटवर कुठे दिसत नाहीत. त्यांनी पंजाबात स्थापन केलेली शाळा मात्र अजूनही सुरू आहे. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ तिथे अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. 

गुप्तहेरांना त्या-त्या देशाचं धन म्हटलं जातं. बरेचदा गुप्ततेमुळे त्यांचं नाव आणि कामगिरीही देशवासीयांपर्यंत पोचत नाही. तरीही हे लोक आपलं काम करत राहतात. मोहनलाल भास्करही असाच एक हिरा होते. ३० नोव्हेंबर १९४२ साली जन्मलेल्या या भारतमातेच्या पुत्राने २२ डिसेंबर २००४ साली या जगाचा निरोप घेतला.

सबस्क्राईब करा

* indicates required