computer

कथा गुप्तहेरांच्या - भाग ४ : भारताची वयाने सर्वात लहान गुप्तहेर, तिच्या कामासाठी जपानच्या राजानेही तिचा सन्मान केला होता!!

भारतीय इतिहासात बरेच अनाम कर्तृत्ववान हिरेही होऊन गेले. ज्ञात पराक्रमी वीरांबद्दल तर आपल्या मनात आदर आहेच, पण कृतज्ञता आणि आदरभावनेने अनाम वीरांचीही आम्ही आमच्या परीने त्यांची ओळख वाचकांना करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यातूनच आज आम्ही बोभाटाच्या वाचकांसाठी घेऊन आलो आहोत आणखी एका गुप्तहेराची गोष्ट!! महिला गुप्तहेराची गोष्ट, तीही भारताच्या सर्वात कमी वयाच्या गुप्तहेराची. सरस्वती राजामणी हे तिचं नाव!!!

(सरस्वती राजमणी)

काही गोष्टी फक्त सिनेमांमध्ये शक्य होतात. पण काही लोक असतात जी एखाद्या सिनेमालाही लाजवेल असे कर्तृत्व गाजवून दाखवतात. सरस्वतीही त्यातलीच एक. तिच्या परक्रमाने तिने भल्याभल्यांना तेव्हा चकित केले होते. सरस्वती राजामणी यांचा जन्म 1927 साली ब्रह्मदेशात झाला. त्यांचे वडील ब्रिटिशांच्या विरोधात होते. इंग्रजांपासून वाचण्यासाठी त्यांनी ब्रह्मदेशात शरण घेतली होती. असं म्हणतात की त्यांच्या मालकीच्या सोन्याच्या खाणी होत्या. त्यांचे कुटुंब उदारमतवादी होते. गांधीजी आणि त्यांच्या कुटुंबाचे पारिवारिक संबंध होते. देशभक्तीची एवढी मोठी पार्श्वभूमी असताना सरस्वती या देशासाठी झटल्या नसत्या तर नवलच!!!

एकदा गांधीजी घरी आलेले असताना राजमणी बगीच्यात गोळी चालवण्याचा सराव करत होत्या. गांधीजीना याबद्दल आश्चर्य वाटले. त्यांनी विचारले, "गोळी चालवण्याचा सराव कशासाठी?" त्यांनी दिलेले उत्तर होते इंग्रजांना संपविण्यासाठी. नंतर गांधीजींनी त्यांना अहिंसेचे महत्व पटवण्याचा प्रयत्न केला.

पण राजमणी यांनी एके दिवशी सुभाषचंद्र बोस यांचे भाषण ऐकले आणि त्यांचे हत्यार उचलण्याचा संकल्प अजूनच पक्का झाला. नेताजींनी आर्थिक मदतीचे आवाहन केले तेव्हा त्यांनी आपले सगळे दागिने नेताजींना दिले. नेताजींना या सोळा वर्षाच्या मुलीबद्दल आश्चर्य आणि कौतुक वाटले. पण नेताजींनी ते दागिने घेण्यास नकार दिला. पण राजामणींचा निश्चय ठाम होता. त्यांनी दागिने परत घेतले नाहीत. उलट राजमणींनी नेताजींसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. नेताजींना त्या मुलीत वेगळे तेज दिसले. त्यांनी राजमणींचे नामकरण सरस्वती असे केले. इथून पुढे त्यांचे एक वेगळे आयुष्य सुरू होणार होते.

राजमणी यांना अत्यंत आव्हानात्मक काम दिले गेले. ते होते आजाद हिंद सेनेसाठी हेरगिरी करण्याचे!! दोन वर्षे त्यांनी बरीच आव्हाने पेलली. तसेच अनेक महत्त्वाची कागदपत्रे नेताजींपर्यंत पोचती केली. मुलांचा वेष धारण करून ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या घरात शिरून महत्वाची कागदपत्रे आणणे म्हणजे सोपे काम नव्हते.

(प्रातिनिधिक फोटो)

या दरम्यान एक एक चूक झाली. आता खऱ्या अर्थाने शौर्य दाखवावे लागणार होते. झाले असे की सगळ्या हेरगिरी करणाऱ्या मुलींना आधीच सांगितले होते की जर पकडले गेले तर स्वतःला गोळी मारून घ्यावी. एका मुलीला अटक झाल्यावर तिने असे केले नाही. आता बिंग फुटण्याचा धोका निर्माण झाला होता. सरस्वती यांनी ठरवले की तिला आता सोडवून आणायचे. हे किती मोठे दिव्य पार पाडण्याचा विचार करत होत्या हे तुम्हाला कळले असेलच. पण एकदा ठरवले की झाले. त्यांनी आपला सगळा अवतार बदलला.

त्यांनी नर्तिकेची वेषभूषा केली आणि जिथे त्या मुलीला बंदी बनवून ठेवले होते तिथे जाऊन पोचल्या. तिथे त्यांनी सगळ्या पोलिसांना नशेचे पदार्थ खाऊ घातले. पण.. एका पोलीस जागा होता. त्याने सरस्वतींना पळताना बघितले आणि गोळी मारली. ती गोळी थेट त्यांच्या पायाला लागली. अशाही परिस्थितीत त्या पळत राहिल्या. कशाबशा एका झाडापर्यंत त्या जाऊन पोचल्या आणि झाडावर चढल्या.

आजूबाजूला ब्रिटिश सैनिक त्यांना शोधत होते. त्या परिस्थितीत तीन दिवस त्यांना झाडावर अन्न पाण्याविना बसून राहावे लागेल.. जेव्हा सैनिक निघून गेले तेव्हाच त्या खाली आले. जेव्हा नेताजींना ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी बक्षीस म्हणून सरस्वती यांना जपानच्या सम्राटाच्या हस्ते मेडल देण्यात आले. तसेच राणी लक्ष्मी ब्रिगेडमध्ये लेफ्टनंट म्हणून नियुक्त केले.

पुढे नेताजींचा अपघाती मृत्यू झाला. यथावकाश देशदेखील स्वतंत्र झाला. आजाद हिंद सेनेतल्या लोकांना नेताजींनी मायदेशी परतण्याचं आवाहन केलं. आपली सर्व संपत्ती तशीच सोडून सरस्वतींचं कुटुंब भारतात आलं. कालांतराने सरस्वतींनाही स्वातंत्र्यसैनिकाचा दर्जा मिळाला. २००६ला चेन्नईत महापूर आला तेव्हा त्यांनी त्यासाठी आपली सारी पेन्शन दान देऊन टाकली. या पराक्रमी स्त्रीचा १३ जानेवारी २०१८ला मृत्यू झाला.

आज स्वतंत्र भारतात अनेकांना सरस्वती राजमणी यांच्याबद्दल जास्त माहिती नाही. त्या आपल्यात आज नसल्यातरी स्मृतीरुपी उराव्या यासाठी आमचा हा छोटा प्रयत्न!!

 

आणखी वाचा :

कथा गुप्तहेरांच्या - भाग १ : पाकिस्तानच्या अणू संशोधनाची हेरगिरी करणारे मोहनलाल भास्कर!

कथा गुप्तहेरांच्या - भाग २ : चक्क पाकिस्तानी आर्मीत मेजरच्या पदावर पोचलेला 'ब्लॅक टायगर' रवींद्र कौशिक !!

कथा गुप्तहेरांच्या - भाग ३ : फाशीची शिक्षा होऊनही मृत्युच्या दाढेतून सुखरूप परतलेले काश्मीर सिंग !!

सबस्क्राईब करा

* indicates required