computer

कथा गुप्तहेरांच्या - भाग २ : चक्क पाकिस्तानी आर्मीत मेजरच्या पदावर पोचलेला 'ब्लॅक टायगर' रवींद्र कौशिक !!

गुप्तहेरांचं आयुष्य म्हणजे रोज टांगती तलवार घेऊन जगणं! केव्हा शत्रूंना आपलं खरं रूप समजेल आणि केव्हा जीव गमवावा लागेल हे काही सांगता येत नाही. तरीही हे गुप्तहेर आपलं काम चोख बजावत असतात. मृत्यूची भीती कधीच मागे सुटलेली असते. आज आपण अशाच एका भारतीय गुप्तहेराची कहाणी जाणून घेणार आहोत.

पाकिस्तानात वेष बदलून राहणे ठीक, तिथे जाऊन मुसलमान बनून राहणे पण एकवेळ ठीक. पण हा गडी चक्क पाकिस्तान आर्मीत मेजरच्या पदावर जाऊन पोचला होता. रविंद्र कौशिक हे त्या अवलियाचं नाव!!

कौशिक यांचा जन्म १९५२ सालचा. राजस्थानातल्या गंगानगरमध्ये त्यांचं पंजाबी कुटुंब राहात असे. लहानपणी त्यांना नाटकांमध्ये खूप रस होता. कदाचित त्यांना त्यावेळी माहीत नसावे की पुढे जाऊन आपल्याला नाटकांमध्ये नाही, तर खऱ्या आयुष्यातच अभिनय करावा लागणार आहे.

१९७५ साली ते आपल्या पदवीचे शिक्षण घेत होते. तेव्हा नॅशनल ड्रामा प्रेझेंटेशनमध्ये त्यांनी भाग घेतला होता. त्याचवेळी रॉ(RAW) म्हणजेच भारताची देशाबाहेरची माहिती मिळवणारी गुप्तहेर संस्थेने त्यांची प्रतिभा ओळखली आणि त्यांच्यासमोर सोबत काम करण्याचा प्रस्ताव दिला. कौशिक यांनी प्रस्ताव स्वीकारला. पण आधी पदवी पूर्ण करून मग रॉ जॉईन करतो म्हणून सांगितले. पदवी पूर्ण झाल्यावर मग खऱ्या अर्थाने त्यांची सुरुवात झाली.

त्यावेळी कौशिक यांचं वय होतं फक्त 23 वर्षं. इतक्या तरुण वयातल्या असलेल्या कौशिक यांना जोखमीची जबाबदारी दिली जाईल हे तर निश्चितच होतं. अंडरकव्हर एजंट बनून त्यांना पाकिस्तानात जायचे होते. याकामासाठीचं त्यांचं सर्व प्रशिक्षण दिल्लीला पार पडलं.

प्रशिक्षण मोठं कठीण आणि वेगवेगळ्या प्रकारचं होतं. फक्त देशच नाही, तर धर्म आणि संस्कृतीही वेगळी असल्यानं इत्यंभूत माहिती असायला हवी होती. याकाळात त्यांनी उर्दूवर प्रभुत्व मिळवलं. मुसलमानांचे सर्व धार्मिक ग्रंथ अभ्यासले. पाकिस्तानातल्या सर्व महत्वपूर्ण गावांचा आणि ठिकाणांचा अभ्यास केला. ते पाकिस्तानात गेले तेव्हा त्यांच्या सर्व भारतीय ओळखी पुसून टाकण्यात आल्या. आता ते रविंद्र कौशिक नाही, तर नबी अहमद शकीर बनून गेले होते.

सर्व काही प्लॅनिंगनुसार करायचे ठरवले गेले होते. त्यांनी पाकिस्तान आर्मीत भरती व्हावे अशी ती योजना होती. त्यानुसार त्यांनी आधी तिथे जाऊन कराची विद्यापीठात लॉचं शिक्षण घेतलं. आर्मीत गेल्यावर पाकिस्तानी कायद्याचं ज्ञान असेल तर अडचण येणार नाही हा त्यामागील हेतू होता.

त्यांनी आर्मी भरतीची तयारी केली आणि त्यांची निवडसुद्धा झाली. इथवर तर ठीक होतं. पण थोड्याच दिवसांत त्यांनी थेट मेजरपदाला गवसणी घातली. याकाळात त्यांनी इस्लाम स्वीकारला आणि एक पाकिस्तानी मुलगी अमानत हिच्याशी लग्न केलं. त्या दोघांना एक मुलगा देखील झाला होता.

१९७९ ते १९८३ या चार वर्षांच्या काळात त्यांनी भारतीय सैन्याला पाकिस्तानी सैन्यासंबंधी कित्येक महत्वाच्या गोष्टी कळवल्या. त्यांची कामगिरी एखाद्या वाघाला शोभेल अशीच होती. म्हणून भारतीय गुप्तचर संस्थांमध्ये ते ब्लॅक टायगर म्हणून ओळखले जात होते. महत्वाची गोष्ट म्हणजे हे नाव त्यांना खुद्द तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी दिलं होतं असं म्हणतात.

१९८३ साली इनायत मसियाह यांना कौशिक यांच्या मदतीसाठी पाकिस्तानात पाठविण्यात आले. पण इनायत यांना लवकरच अटक झाली. आता ते इथे कुणाची मदत करण्यासाठी आले हे सांगण्यासाठी त्यांचा छळ सुरू झाला.

अशाप्रकारे कौशिक यांच्या रहस्यावरून पदडा उठला होता. त्यांना पाकिस्तान आर्मीने अटक केले. १९८३ ते १९८५ अशी दोन वर्षे त्यांचे हालहाल करण्यात आले. पण हा महान ब्लॅक टायगर तोंड उघडायला तयार नव्हता. शेवटी त्यांना तुरुंगात पाठवण्यात आलं.

हे इथंच थांबलं नाही. कौशिकना आधी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली पण नंतर आजीवन कारावासात तिचं रूपांतर झालं. पुढे तब्बल १६ वर्षं पाकिस्तानात विविध तुरुंगांमध्ये ते शिक्षा भोगत होते. यात मियाँवाली आणि सियालकोट जेलचा समावेश आहे. पाकिस्तानी त्रासामुळे त्यांना तिथे दमा आणि टीबी झाला. दिवसेंदिवस त्यांचा रोग बळावत गेला आणि एके दिवशी त्यांच्या हृदयाने काम करायचं थांबवलं!!!

भारत मातेचा हा वीर सुपुत्र आजही रॉच्या प्रत्येक एजंटसाठी त्यांच्या मनात प्रेरणा म्हणून जिवंत आहे. ज्यांना भारतीय गुप्तचर संस्थांसाठी अद्भुत काम करून दाखवायचे असते, त्यांना रवींद्र कौशिक यांचे उदाहरण देण्यात येते. कितीही अत्याचार झाला तरी भारतमातेचे प्रेम इतके उत्तुंग होते की या ब्लॅक टायगरने मृत्यू स्वीकारला पण तोंड उघडले नाही.
अशा या वाघाला आमचाही सलाम!!!

 

आणखी वाचा :

कथा गुप्तहेरांच्या - भाग १ : पाकिस्तानच्या अणू संशोधनाची हेरगिरी करणारे मोहनलाल भास्कर!