computer

भुट्टे का कीस, पान पताशे, लाल बालटी कचोरी...इंदूरच्या सराफ्यात हे सगळं चाखलंच पाहिजे!

पावसाळा संपला! आता आले दिवस दिवाळी आणि फूड फेस्टिव्हलचे! प्रत्येक छोट्या मोठया शहरात खाण्यापिण्याची धमाल मज्जा सुरू होईल. पण काही शहरांत वर्षाचे बारा महिने फूड फेस्टीव्हल असतो. त्यांपैकी एक म्हणजे इंदूर! होळकरांचं इंदूर! मराठेशाहीतील एक मोठं संस्थान म्हणजे इंदूर! इंदूर म्हणजे समृद्ध माळवा प्रांताचा एक भाग! पग पग रोटी - डग डग नीर म्हणजेच पावलोपावली पोटभर खाणं आणि खणू तिथे पाणी अशी ख्याती!

साहजिकच या भागात बारा महिने अन्न उत्सव असतो यात नवल ते का?  चला, आज बोभाटाच्या या लेखातून फेरफटका मारू या इंदूरच्या सराफ्यात!

हो, पण आधी इंदूरची दिनचर्या समजून घेऊ या! फारसं घाईत नसलेलं हे शहर आहे. दिवसाची सुरुवात मसालेदार पोहे आणि कचोरीने होते आणि दिवस मावळतो गोलगप्पे आणि चाट खाऊनच!

सराफा म्हणजे जव्हेरी बाजार! मुंबईतल्या जव्हेरी बाजारात जशी खाऊ गल्ली आहे तशीच इथेही ही खाऊ गल्लीच आहे. या खाऊ गल्लीला बहार येते रात्री सराफ्याची दुकानं बंद झाल्यावर. असं म्हणतात की सराफी दुकानांच्या सुरक्षिततेसाठी अहिल्याबाई होळकरांनी सराफ्याची दुकानं बंद झाल्यावर पुढचा दिवस उजाडेपर्यंत इथं खाऊच्या गाड्या लावण्याची परवानगी दिली.

तर इथं सराफ्यात चारी बाजूने खाऊच्या गाड्या येतात. या गाड्यांवर काय नसते ते विचारा!! गेल्या काही वर्षांत भर पडली आहे शुद्ध शाकाहारी चायनीज आणि दक्षिण भारतीय इडली डोशांची. काही दुकानं मात्र स्थायी स्वरूपाची आहेत. आजच्या फेरफटक्यात आपण काही मोजकीच ठिकाणं बघूयात !

(सराफ्याची दुकानं)

सराफ्यात गेल्यावर आधी जावं ते जोशी वडेवाल्याकडे. हे आणि पुण्याचे जोशी वडेवाले यात नाव सोडून काही साम्य नाही. इथे आधी मक्याच्या कणसाचा किस खा. नंतर एक कचोरी खाऊन सांगता दहिवड्याने करा. हे खाऊन झाल्यावरही तुमचं बिल १००च्या एका नोटेपेक्षाही कमी झालं असेल. विश्वास बसत नाही ना? हा बोर्डच बघा की !

कचोरीच्या या शहरात एक मराठी नाव आहे रानडे यांच्या 'लाल बालटी' कचोरीचे! या मराठी कुटुंबाने हे लाल बालटी नाव का घेतलं याचा गमतीदार इतिहास आहे. १९६५ साली दुकान सुरू झाले तेव्हा दुकानाकडे ग्राहकाचे लक्ष जावे म्हणून त्यांनी दुकानाबाहेर एक लाल बादली टांगून ठेवली. या लाल बादलीत एक दिवा तेवत असायचा. आता हे दुकान लाल बालटी म्हणूनच फेमस झालंय.

(हे दुकान सराफ्यात नाही)

सराफ्यात खाणं हा मनाचा खेळ आहे. आधी चटकदार चाट खावी, मग तोंड हुळहुळतय म्हणून रबडी मालपोव्यात कुस्करून खावी. 'मी हे खातोय म्हणून तू गुलाबजाम खा', असं आपल्या सोबतच्या मित्राला सांगावं'. परिणामी सगळं काही खायला मिळतं. तेव्हढ्यात तुमचा इंदुरी मित्र म्हणतो "अरे यार, तुम्ही मुंबईकर पाणीपुरी खायला धावत जाता. पण इथले पान पताशे खाऊन बघा यार". मित्राच्या विनंतीला मान द्यायलाच पाहिजे म्हणून तीही खाऊन घ्यावी. पाच वेगवेगळ्या पाण्याची पाणीपुरी आणखी कुठे मिळणार?

पुरे पुरे म्हणेस्तो कुणालातरी खोपरा म्हणजे खोबरा पॅटीस खाल्याशिवाय मोक्ष मिळत नाही असा साक्षात्कार होतो. पण खरं सांगायचं तर हे पॅटीस 'जगात भारी' असतंय. गर्दी मात्र जत्रेइतकी असते. हे पॅटीस आणखी कुठे मिळतंय का सांगा राव, आम्ही बोभाटा तर्फे सत्कारच करू त्या वाचकाचा!

आता पोट भरायला आलेलं असतं. पण उद्या दिवसभर उपास करू या असं स्वतःला समजावत एक बटल्याची कचोरी खाऊन घ्यावी. काहीवेळा हा कार्यक्रम ठरवावा आणि कोणतरी म्हणतं "माझा उपास आहे".  चिंता नको महाराज, या सराफ्यात जबरा साबुदाणा खिचडी मिळते. यावेळपर्यंत पोट इतकं फुगलेले असतं की कोकोनट क्रश पिणं अपरिहार्य!!

हा क्रश बनवतात शहाळयातल्या मलई आणि पाण्यातून! ज्या कोकणातून ही शहाळी येतात तिथे मात्र हा भन्नाट प्रकार चाखायला मिळत नाही. आधी दोन शहाळ्यांतले पाणी घेतले जाते, त्यात दोन शहाळ्यांची मलई टाकली जाते. थोडी साखर टाकून मिक्सरमध्ये ८४ फेरे फिरला की कोकोनट क्रश तय्यार!!

सांगता अर्थातच पान खाऊन करायची असते. मीठा पान ते फायर पान, सगळं काही इथेच मिळतंय. 

तर कधी जाताय इंदूरच्या सराफ्यात ?

सबस्क्राईब करा

* indicates required