स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासोबत अंध व्यक्तींच्या पोटापाण्याची कायमची सोय करणाऱ्या देवदूत !!

स्वतःचं स्वप्न पूर्ण करणं आणि समाजसेवा करणं हे एकाच कामातून फार कमी लोकांना जमतं. मुंबईत राहणाऱ्या ‘जोनिता फिग्विरीडो’ या त्या दुर्मिळ लोकांमधल्या एक आहेत.
जोनिता आज ५६ वर्षांच्या आहेत. त्या मुंबईच्या बांद्रा भागात ‘मेट्टा फुट रिफ्लेक्सोलॉजी सेंटर’ चालवतात. या ठिकाणी पायांची मालिश केली जाते. या जागेची खासियत म्हणजे तिथे काम करणारे सर्व १५ कर्मचारी हे पूर्णपणे अंध आहेत.
जोनिता फिग्विरीडो यांनी अंधांसाठी रोजगार कसा निर्माण केला याची ही गोष्ट.

त्याचं झालं असं, की १० वर्षापूर्वी जोनिता या “नेशनल असोसिएशन फॉर दि ब्लाइंड” संस्थेच्या संपर्कात आल्या. संस्थेकडून त्यांना समजलं की आंधळेपणामुळे अंध व्यक्तींना कोणीच नोकरी देत नाही. हे ऐकल्यानंतर जोनिता यांनी या लोकांसाठी काहीतरी करायचं ठरवलं.
जोनिता या ८० च्या दशकात जसलोक हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करायच्या. याच काळात त्यांना उपचारात्मक औषधे, प्रतिबंधात्मक औषधे, निसर्ग चिकित्सा आणि योग यांच्यात रस निर्माण झाला. २००८ साली त्यांनी थायलंडमधून ‘फुट रिफ्लेक्सोलॉजी’ शिकून घेतली.
स्वतःचं स्वप्न आणि अंधांसाठी काहीतरी करण्याची इच्छा यातूनच ‘मेट्टा फुट रिफ्लेक्सोलॉजी सेंटर’ उभं राहिलं. सुरुवातीच्या काळात एका तासाच्या पायांच्या मालिशसाठी केवळ १०० रुपये आकारले जायचे. त्याकाळी अंध व्यक्ती चांगल्यारीतीने पायांची मालिश करू शकते यावर कोणाचा विश्वास नव्हता.
पुढच्या काळात लोकांचा हा समज दूर झाला. आज कामांच्या दिवसांमध्ये प्रत्येक तासाचे ४०० रुपये आकारले जातात, तर सुट्ट्यांमध्ये ५०० रुपये आकारले जातात.
जोनिता फिग्विरीडो यांनी स्वतःची वेगळी वाट तर धरलीच, पण आपल्या सोबत निराधारांना मदतीचा हात पण दिला. यासाठी त्यांचं कौतुक करू तेवढं कमीच आहे.