computer

आयपीएलच्या १२ सिझनमधले १२ ऑरेंज कॅप विजेते खेळाडू...या यादीत कोणकोणते खेळाडू आहेत?

आयपीएल सुरू होत आहे. क्रिकेटप्रेमींच्या उत्साहाला उधाण येत आहे. आयपीएल म्हटले म्हणजे फक्त कोणती टीम ट्रॉफी जिंकेल एवढे नसते. मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच, तसेच ऑरेंज कॅप, पर्पल कॅपसाठी खेळाडूंमध्ये मोठी रस्सीखेच पाहायला मिळत असते. एका सिजनमध्ये सर्वाधिक रन बनविणाऱ्या खेळाडूला ऑरेंज तर सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या खेळाडूला पर्पल कॅप दिली जाते. आज आपण आयपीएलच्या आजवरच्या १२ सिजनमधील ऑरेंज कॅप विजेत्यांबद्दल माहिती घेणार आहोत.

१) २००८

आयपीएलच्या पहिल्याच सिजनमध्ये शॉन मार्श या खेळाडूने ऑरेंज कॅप मिळवली होती. किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना त्याने ११ सामन्यांमध्ये ६१६ धावा केल्या होत्या. 

२) २००९

मॅथ्यू हेडन हा ऑस्ट्रेलियन ओपनर आपल्या तडाखेबंद खेळीसाठी ओळखला जातो. आयपीएलच्या दुसया सिजनमध्ये त्याने त्याच्या खेळीचा परिचय दिला होता. त्याने चेन्नईकडून खेळताना १२ सामन्यांमध्ये ५७२ धावा केल्या होत्या. 

३) २०१० 

सचिन तेंडुलकर खेळतोय आणि विक्रम होणार नाही, हे कधीच घडत नाही. आयपीएलमध्ये देखील त्याने लोकांना नाराज केले नाही. मुंबई इंडियन्सकडून खेळताना सचिनने १५ सामन्यांमध्ये ६१८ धावा करत ऑरेंज कॅप पटकावली होती. 

४) २०११ 

ख्रिस गेल हा खेळाडू फक्त सिक्स मारून देखील मोठ्या खेळी करू शकतो. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर कडून खेळताना त्याने १२ सामन्यांमध्ये ६०८ धावा करत ऑरेंज कॅप स्वतःकडे ठेवली होती.  

५) २०१२

ख्रिस गेलने याही सिजनमध्ये सातत्य ठेवत धावांचा पाऊस पाडला होता. १४ सामन्यांमध्ये त्याने तब्बल ७३३ धावा लुटल्या होत्या. ज्यामुळे सलग दुसऱ्यांदा ऑरेंज कॅप मिळवणे त्याला शक्य झाले. 

६) २०१३

मायकल हसी हा खेळाडू संयमी पण चांगल्या खेळीसाठी ओळखला जातो. चेन्नईकडून खेळताना त्याने १७ सामन्यांमध्ये ७३३ धावा करून ऑरेंज कॅप जिंकली होती. 

७) २०१४

रॉबिन उथप्पा क्रिजवर पुढे जाऊन सिक्स मारण्यासाठी प्रसिद्ध आहे. आयपीएलमध्ये कोलकाताकडून खेळताना त्याने १६ सामन्यांमध्ये ६६० धावा केल्या होत्या. ज्यामुळे त्याला ऑरेंज कप मिळाली होती. 

८) २०१५

सध्या टिकटॉकवर धुमाकूळ घालणारा डेव्हिड वॉर्नर तडाखेबंद शॉट मारताना दिसतो. हैद्राबाद कडून खेळणाऱ्या वॉर्नरने १४ सामन्यांमध्ये ५६२ धावा करत ऑरेंज कॅप जिंकली होती. 

९) २०१६

विराट कोहलीने आजवर बँगलोरला आयपीएल ट्रॉफी मिळवून दिली नसली तरी स्वतः चांगली खेळी करत ऑरेंज कॅप मात्र मिळवली आहे. कोहलीने २०१६च्या सिजनमध्ये तब्बल ७९३ धावांचा पाऊस पाडला होता. 

१०) २०१७

ख्रिस गेलनंतर दोन वेळा ऑरेंज कॅप जिंकण्याचा मान जातो तो डेव्हिड वॉर्नरला. यावेळी देखील हैद्राबाद कडून खेळताना त्याने १४ सामन्यांमध्ये ६४१ धावा केल्या होत्या. 

११) २०१८

केन विल्यम्सनमुळे हैद्राबादच्या वाट्याला तिसऱ्यांदा ऑरेंज कॅप आली होती. त्याने १७ सामन्यांमध्ये खेळताना ७३५ धावा केल्या होत्या. ज्यामुळे त्याला ऑरेंज कॅप मिळाली होती. 

१२) २०१९

डेव्हिड वॉर्नर हा तीन वेळा ऑरेंज कॅप जिंकणारा आयपीएलच्या इतिहासातील एकमेव खेळाडू आहे. १२ सामन्यांमध्ये त्याने ६३२ धावा करत हैद्राबादला चौथ्यांदा ऑरेंज कॅप मिळवून दिली होती. 

१३) २०२०

भारताचा नवोदित खेळाडू के एल राहुल याने पंजाबकडून खेळताना १४ सामन्यांमध्ये ६७० धावा करत ऑरेंज कॅप जिंकली होती.

 

तर हे झाले आजवरचे ऑरेज कॅप विजेते, यावर्षी तुम्हाला कोणता खेळाडू ऑरेंज कॅप जिंकू शकतो असे वाटते, हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा...

सबस्क्राईब करा

* indicates required