computer

एका कुकिंग व्हिडीओने इटालियन डॉनला कसे पोलिसांच्या जाळ्यात अडकवले? हा किस्सा वाचा!!

"डॉन को पकडना मुश्किलही नहीं नामुनकीन है !"  हे अश्या अर्थाचे चित्रपटातले डायलॉग इतके गाजतात की जगभरातले डॉन स्वतःला हिरो समजू लागतात. पोलीस त्यांच्यापर्यंत कधी पोहोचणारच नाहीत असा फाजील आत्मविश्वास त्यांच्याकडे ठासून भरलेला असतो. गुन्हा करून कुठेतरी पळून जायचे आणि लपून राहून पोलिसांना गुंगारा द्यायचा. हे अगदी त्यांना सहज, सोपं वाटतं. पण पोलिसही काही कमी हुशार नसतात, ते बरोबर त्या गुंडाला शोधून काढून 'कानून के लंबे हात' दाखवून देतात. असाच एक किस्सा इटलीमध्ये नुकताच घडला.

५३ वर्षीय मार्क फेरेन क्लॉड बिअर्ट या गुंडाला नुकतेच डॉमिनिक रिपब्लिक देशातील सॅंटो डोमिंगो येथे पकडण्यात आले. त्याने पकडले जाऊ नये म्हणून पूर्ण काळजी घेतली होती पण त्याच्या एका चुकीने त्याचा सगळा खेळ संपवला.

तो आणि त्याच्या बायकोने एक यूट्यूब चॅनेल सुरू केले होते. या चॅनेलमध्ये ते नियमित इटालियन रेसिपीचा व्हिडीओ पोस्ट करायचे. मार्कने या व्हिडीओत स्वतःचा चेहरा दिसू नये म्हणून पूर्णपणे काळजी घेतली होती, पण त्याच्या हातावरच्या टॅटूमुळे पोलिसांनी त्याला ओळखले आणि ट्रॅक केले. शेवटी सोमवारी सकाळी मार्कला मिलान मालपेन्सा विमानतळावर अटक झाली.

 

२०१४ मध्ये एका इटालियन न्यायाधीशाने मार्कला मादक द्रव्यांच्या तस्करीप्रकरणी शिक्षा सुनावली होती. कॅलाब्रियामधील 'एनडरंगेटा' या माफिया गटासाठी तो काम करायचा. 'एनडरंगेटा हा देशातील सर्वात शक्तिशाली माफिया गट मानला जातो. पण तिथून तो पळून गेला. 

तो आधी आधी तो कोस्टा रिका येथे राहत होता. तिथून तो ५ वर्षांपूर्व डॉमिनिक रिपब्लिक देशात दाखल झाला. तिथे पोलिसांपासून वाचण्यासाठी त्याने बरीच काळजी घेतली. त्याने सॅंटो डोमिंगो येथील बोका चिका भागात राहणाऱ्या असंख्य इटालियन लोकांपासून स्वतःला लांब ठेवले आणि स्वतःची ओळख लपवली. पण त्याची एक चूक झाली आणि पोलिसांच्या जाळ्यात तो सापडला. 

तर, कितीही मोठा डॉन असला तरी तो एक तरी चूक करतो आणि न्यायासमोर चुकीला माफी नसते.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required