computer

भवानीदेवी: तलवारबाजीत ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली भारतातली पहिली व्यक्ती !!

भारतीय इतिहासात अनेक शूर महिला युद्धात तलवार घेऊन लढलेल्या आपण ऐकल्या आहेत. अनेक शूर राण्यांनी युद्ध जिंकल्याची उदाहरणेही आहेत. जसा काळ पुढे सरकला, युद्धात आधुनिक शस्त्रास्त्रे आली आणि तलवारबाजी हा केवळ मनोरंजनासाठी एक खेळ बनला. आताच्या काळात हा क्रीडाप्रकार ऑलिम्पिकमध्ये खेळवला जातो. त्याला फेन्सिंग म्हणतात. याच फेन्सिंगमध्ये इतिहासात पहिल्यांदा कोणी भारतीय खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. चेन्नईची २७ वर्षीय भवानीदेवी हिने हा इतिहास घडवला.

आठ वेळा राष्ट्रीय चॅम्पियन असलेल्या भवानीदेवीने राष्ट्रकुल स्पर्धेतील एक रौप्य व एक कांस्यपदक जिंकले आहे. २०१० मध्ये इंटरनॅशनल ओपन, कॅडेट एशियन चॅम्पियन, २०१२ मध्ये राष्ट्रकुल, २०१४ मध्ये आशियायी अजिंक्यपद तिने कमावले आहे.  २०१९ मध्ये कॅनबेरामधील राष्ट्रकुल स्पर्धेत तिने अव्वल ५० महिला तिरंदाजांमध्ये स्थान मिळवले होते. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भवानी देवी ४५व्या स्थानावर असल्याने ती पात्र ठरली आहे. कोणत्याही खेळाडूसाठी ऑलिम्पिमध्ये निवडले जाणे ही खूप अभिमानाची गोष्ट असते. टोकियो ऑलिम्पिकमध्ये ती भारतासाठी खेळणारी पहिली तलवारबाज ठरणार आहे.

भवानीदेवीचे मूळ नाव चंदललावदा आनंदा सुंदररमण असे आहे. भवानीदेवी ही एका मध्यमवर्गीय व खेळाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून आली आहे. आईने  या खेळासाठी दिलेलं दिलेले प्रोत्साहन तिच्यासाठी सर्वात महत्त्वाचे होते. २००४ मध्ये शाळेत असताना तलवारबाजी या खेळात तिने पहिले पाऊल टाकले.  त्यावेळी खेळ निवडताना दुसऱ्या कुठल्याही खेळाचा पर्याय तिच्याकडे शिल्लक राहिला नव्हता, त्यामुळे फक्त उत्सुकतेपोटी तिने फेंन्सिंग हा खेळ निवडला.  इतर खेळांपेक्षा हा सर्वात वेगळा आणि वेगवान खेळ असल्याने तिला तो जास्त आवडला. अभ्यास आणि तलवारबाजी या दोन्ही गोष्टी शाळेत असताना तिने सुरू ठेवल्या. 

सकाळी सराव केल्यानंतर शाळा आणि शाळा सुटल्यानंतर पुन्हा सराव असा दिनक्रम भवानी देवीने बरेच वर्ष सुरू ठेवला. शाळेत ती बसने जायची. कधी बस चुकली तर चालत जाण्याशिवाय पर्याय नसायचा, पण तिने कधीही शाळा व सराव चुकवला नाही. तलवारबाजी या खेळात वापरण्यात येणारी तलवार ही महाग असल्यामुळे सुरुवातीला ती बांबूची तलवार तयार करून सराव करायची. राष्ट्रीय  स्पर्धा खेळताना ती तात्पुरती मोठ्या खेळाडूंकडून इलेक्ट्रिक तलवार आणायची व तो खेळ झाल्यानंतर त्यांना परत द्यायची. हळूहळू एक एक स्पर्धा जिंकत तिचे नाव होऊ लागले व तिला प्रोत्साहन मिळू लागले.

टोकियो ऑलिम्पिकसाठी निवड झाल्यामुळे क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनीही तिचे कौतुक केले आहे. या खेळात भवानीदेवीचे पहिले पाऊल नक्कीच सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल.

भवानीदेवीला बोभाटातर्फे अनेक शुभेच्छा.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required