computer

निळ्या केळ्यांच्या फोटोमागचं सत्य जाणून घ्या....ही केळी खरोखर अस्तित्वात आहेत का?

बारा महिने सहज उपलब्ध असलेले फळ कोणते? असा प्रश्न विचारल्यावर पहिलं जे उत्तर येईल ते म्हणजे केळे. खिशाला परवडणारे आणि खनिजांचा  साठा असलेले, कॅलशिअम, फॉस्फरस, लोह खनिजे, ब जीवनसत्‍वयुक्त असलेलं हे फळ. सोनकेळी, राजेळी, बनकेळी, खान्देशी, जळगावची केळी अशी अनेक जातींची नावं तुम्ही ऐकली असतील. हिरवा आणि पिवळा रंगही त्याची ओळख. आता तुम्ही म्हणाल आंब्याच्या मोसमात केळ्याची आठवण काढायचे कारण काय? तर नुकतेच निळ्या रंगाच्या केळ्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. निळी केळी कधी पहिली नसतील ना? हा फोटो खरा आहे की फोटोट्रीक आहे. चला पाहुयात.

ही निळी केळी खरोखरच आहेत आणि या निळ्या केळ्यांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे याची चव व्हॅनिला आइसक्रीम सारखी लागते. निळी केळी जगात अनेक ठिकाणी आहेत. या केळीची झाडे ६ मीटरपर्यंत उंच असतात आणि त्यांना दीड ते दोन वर्षात केळी लागतात. ही केळी वेगवेगळ्या नावाने ओळखली जातात. फिजी मध्ये या केळ्यांना हवाईयन बनाना, हवाई मध्ये आयस्क्रीम बनाना, फिलीपिन्स मध्ये क्रि किंवा ब्ल्यू जावा बनाना म्हटले जाते. शिवाय को केरी, हवाई केळे अशीही त्यांची नावे आहेत. या केळ्यांची शेती कॅलिफोर्निया, टेक्सास, फ्लोरिडा, लुझियाना मध्ये केली जाते.  दक्षिण पूर्व आशियात सुद्धा काही ठिकाणी या केळ्यांच्या बागा आहेत. कमी तापमान आणि थंड प्रदेशात हे पिक चांगले येते.

एफएमआरचे सह-अध्यक्ष थम खाई मेंग यांनी अलीकडेच आपल्या ट्विटर अकाऊंटवर निळ्या केळ्यांच्या घडाचे फोटो पोस्ट करत आश्चर्य व्यक्त केले. " हे चवीला आइसक्रीमसारखे असणारे ब्लू जावा केळे खरंच अविश्वसनीय आहे"  या कॅप्शनसह त्याने पोस्ट शेअर केली आणि हे फोटो सगळीकडे व्हायरल झाले.

केरळमध्ये लाल केळी ही मिळतात. फुलं जशी आपण विविधरंगी पाहतो, तसे हे फळ आता बघायला मिळाले. आता ही निसर्गाचीही कमालच म्हणली पाहिजे, नाही का?

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required