भारतीय लष्कराने सैनिकाला हेलिकॉप्टरने एअरलिफ्ट केले!! पण का?

सैन्यातले जवान देशासाठी अनेक गोष्टींचा त्याग करतात. स्वतःचे घरदार कुटुंब सोडून जीवावर उदार होऊन सैनिक आपले रक्षण करतात. देशात सैनिकांबद्दल असलेला अफाट आदर याच कारणाने आहे. अनेकवेळा तर या सैनिकांना आपल्या घरी असलेल्या महत्वाच्या कार्यक्रमांनाही हजेरी लावता येत नाही. मात्र नुकत्याच एका घटनेमुळे लष्कर आपल्या सैनिकांना पुरेशी मदत करते याचा प्रत्यय येत आहे.

बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) चे जवान कॉन्स्टेबल नारायण बेहरा हे एलओसीच्या माच्छील सेक्टरमध्ये कार्यरत आहेत. नारायण यांचे लग्न २ मे या दिवशी होणार होते. पण ते ज्या भागात कार्यरत आहेत तो भाग पूर्णपणे बर्फाने आच्छादलेला आहे. काश्मीर खोऱ्यापर्यंत येण्याचे सर्व मार्ग बंद होते.

तिकडे आई वडील आणि इकडे मुलगा चिंतेत होते. लग्न डोक्यावर येऊन ठेपले. सर्व तयारी पूर्ण झाली. पण नवरदेव पोहोचेल की नाही ही मोठी शंका होती. सैन्याने या समस्येवर उपाय शोधून काढला. नारायण यांना थेट हेलिकॉप्टरने त्यांच्या गावी ओडिशाला पाठविण्यात आले.

नारायण बेहरांचे वरिष्ठ अधिकारी राजा बाबू यांना जेव्हा या बद्दल कळाले तेव्हा त्यांनी लगोलग हेलिकॉप्टरची सोय केली. फॉरवर्ड डिफेन्स लोकेशनहून नारायण यांना हेलिकॉप्टरची सुविधा पुरवण्यात आली. आधी त्यांना हेलिकॉप्टरने खाली आणण्यात आले. मग तेथून ओडिशाला पाठविण्यात आले.

आपल्या सामान्य लोकांबद्दल ज्या तत्परतेने सैन्यदल काम करतात, त्याच तत्परतेने स्वतःच्या सैन्यादलातील सैनिकाला आपल्या घरी लग्नाला पोहोचविण्याचे काम करणाऱ्या लष्कराचे हे काम कौतुकास्पद म्हणावे असेच आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required