येशु भारतात आला होता का ? काश्मीर मध्ये येशुची कबर ?

 गुड फ्रायडे. नावात गुड असले तरी  हा येशूच्या बलिदानाचा दिवस आहे.या दिवशी येशू ख्रिस्ताला क्रूसावर चढवण्यात आले. या दिवसानंतर जो रविवार येतो, तो येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा दिवस समजला जातो. देवदूत येऊन ख्रिस्ताला स्वर्गारोहणासाठी घेऊन गेले, तो  रविवार ज्याला इस्टर संडे म्हणतात. इस्टर संडे इस्टर एग्ज्स (अंडी) साठी फेमस आहे. अंडे म्हणजे रिकाम्या कबरीचे प्रतिक आहे.

कबर म्हटले की सोबत अनेक वाद प्रवाद येतातच. असाच एक प्रवाद आहे की येशू इस्टर संडेला प्रवासासाठी निघाला आणि भारतात आला. त्यानंतर त्याने काश्मिरकडे प्रस्थान केले आणि अनेक वर्षांनी वृद्धापकाळाने त्याला मृत्यु आला. श्रीनगरजवळ रोजाबेल ही येशूची कबर असल्याचा दावा पण बर्‍याच विद्वानांनी केला आहे. येशू काश्मिरमध्ये  'युझ आसफ' या नावाने राहिला आणि रोजाबेल ही त्याची कबर आहे असा एक मत प्रवाह आहे. ही कबर १९०० वर्षे जुनी आहे. कबरीची देखभाल करणार्‍या कुटुंबाच्या मते ही एक अहमदी मुस्लिमांनी पसरवलेली अफवा आहे. 
आता हे वाद प्रतिवाद किती सत्य किंवा असत्य आहेत हे पडताळण्याची आपली कुवत नाही, पण हे वाद काय आहेत ते आपण बघू या !!

येशू भारतात आला होता असे ज्यांचे म्हणणे आहे, त्यांच्या मते शुक्रवारी क्रूसावर चढवल्यानंतर शिष्यांनी येशूला क्रूसावरून खाली उतरवले आणि त्याच्या जखमांवर औषधी लेप लावले. येशूच्या जखमा भरल्यावर , त्याला टायग्रीस- युफ्रेटीस या नद्यांच्या मुखावर असलेल्या बंदरातून जलमार्गानी गुजरातेत पाठवण्यात आले. कल्हणाच्या ' राजतरंगीणी' या ग्रंथातील काही उतार्‍यांचा उल्लेख पुरावा म्हणून दिला जातो. लोकप्रभाच्या जुलै २००५च्या अंकात यावर एक सविस्तर लेख आला होता. फाँट उपलब्ध नसल्याने त्या अंकाची लिंक देऊ शकत नाही.
भविष्य महापुराण या ग्रंथात इसवी सनापूर्वी १०० वर्षे येशूने भेट दिलेल्या काश्मिरातील  स्थळांचा उल्लेख असल्याचा दावा केला जातो. 

२०१० नंतर या वादाला एक नविन वळण लागले. 'लोनली प्लॅनेट' या मासिकाने रोजाबेल येथे येशूची कबर असल्याचा दावा केला आणि जगभरातील प्रवासी तेथे गर्दी करू लागले. या बातमीचा पाठपुरावा BBC, The Times in Britain आणि The Times of India ने केला.  'लोनली प्लॅनेट' ने हा दावा करण्याचे कारण म्हणजे अहमदी मुस्लीम पंथाचे एक विद्वान मौलवी अब्दुल्लाह यांनी केलेले लिखाण. १८९९ साली मौलवींनी  'मसिहा हिंदुस्थान में' या पुस्तकात  त्यांनी अनेक संदर्भ देऊन रोजाबेल ही येशूची कबर असल्याचा प्रयत्न केला आहे. या कबरीजवळ दोन पावलांचे एक शिल्प आहे. त्या शिल्पात अंगठ्याच्या खाली जखमांच्या खुणा दाखवल्या आहेत ज्याचा संदर्भ ख्रिस्ताच्या पायाला ठोकलेल्या खिळ्यांशी जोडला जातो.

याच वादावर आधारीत फिल्म्स डिव्हीजनची एक डॉक्युमँटरी आहे ज्याच्या उल्लेखाशिवाय हा लेख अपुरा राहील.

Govt of India Documentry on Jesus in Kashmir !!

                         

सबस्क्राईब करा

* indicates required