computer

एकच पण लै भारी कार जगाला देणाऱ्या जॉन डी’लॉरेनच्या उदय आणि ऱ्हासाची गोष्ट!!

काही लोकांची स्वप्नं ही स्वप्नंच राहतात, तर काही लोकं मात्र आपली स्वप्नं जगण्यात यशस्वी होतात. स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यात यशस्वी होऊनही आपल्याच चुकीमुळे या स्वप्नांचा चुराडा होताना पाहणारा आणि सगळे काही संपल्यावर पुन्हा एकदा त्याहून उंच भरारी घेणाऱ्या एका उद्योजकाच्या यशाची आणि अपयशाची कथा तुम्ही वाचली आहे का? परीकथेतील आयुष्यालाही सत्यात उतरवणारा आणि नंतर परीकथेप्रमाणेच ज्याची सगळी स्वप्ने क्षणात उध्वस्त झाली असा हा उद्योजक कोण होता तुम्हाला माहिती आहे?

आपल्या कल्पनांना सत्यात उतरवून संपूर्ण जगाला अचंबित करणारा हा व्यावसायिक होता जॉन डी’लॉरेन! डी’लॉरेन मोटार कंपनीचा मालक आणि जीएम म्हणजेच जनरल मोटर्सचा एक मोठा अधिकारी. १९७३ साली त्याचं लग्न झालं. लॉरेन अतिशय महत्वाकांक्षी होता त्याला आपल्या स्वप्नातील कार प्रत्यक्षात आणायची होती आणि ती त्याने बाजारात आणली देखील. आजही स्पीड आणि स्टाईलसाठी कुणाचे नाव घेतले जात असेल तर ते म्हणजे डीएमसीचे!

रोमेनियन विस्थापितांचा मुलगा ते एका कार जायंट कंपनीचा मालक आणि त्यानंतर एक पांढरपेशी गुन्हेगार! डी’लॉरेनच्या आयुष्याचा हा आलेख थक्क करून टाकणारा आहे. जॉनचे आई-वडील फॅक्टरी कामगार होते. ६ जानेवारी, १९२५ रोजी जन्मलेल्या जॉनचे बालपण कामगारांच्या वस्तीतच गेले. त्याचे वडील झॅकरी फोर्ड मोटार कंपनीचे संस्थापक सदस्य होते. पण त्यांच्या दारूच्या व्यसनामुळे ते कधीच प्रगती करू शकले नाहीत. त्याची आई कॅथरीनसुद्धा जनरल इलेक्ट्रिकमध्येच काम करत होती. त्याच्या आईमुळेच त्यांचे घर चालत होते. अशा सगळ्या परिस्थितीत जॉनने आपल्या मावशीकडे राहूनच शिक्षण घेतले. दुसऱ्या महायुद्धात त्याला सैन्यात भरती व्हावे लागले. त्यामुळे शिक्षणात थोडा खंड पडला असला तरी नंतर त्याने ऑटोमोटिव्ह इंजिनियरिंग पूर्ण केले आणि नंतर मिशिगन युनिव्हर्सिटीतून एमबीएची पदवीही घेतली.

१९५२ साली तो पॅकार्ड मोटर्समध्ये रुजू झाला. आपल्या कामाने त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जॉन सुरुवातीपासूनच महत्वाकांक्षी होता. १९५६ साली तो जनरल मोटर्समध्ये इंजिनियर म्हणून रुजू झाला. जीएम ही जगातील एक नंबरची मोटार कंपनी होती आणि अशा कंपनीत संधी मिळणे म्हणजे खूप मोठी झेप होती. जनरल मोटर्सची पाँटिॲक डिव्हिजन आपल्या कारच्या डिझाईनमध्ये काहीच नवे बदल करण्यास तयार नव्हती. विशेष म्हणजे जॉनला आकर्षकता आणि वेग या दोन्हींचा संयोग असणारी कार बनवायची होती. पण जीएमची याला परवानगी नव्हती. नव्या अमेरिकन तरुणांची गरज काय आहे ते पाहून त्याप्रमाणे बदल करावेत असे जॉनचे मत होते. जनरल मोटर्सचे अध्यक्षपद त्याला मिळाले असते. पण याच मुद्द्यावर मतभेद झाले आणि जॉन जीएममधून बाहेर पडला. अर्थात स्वतःची मोटार कंपनी सुरु करण्याची महत्वाकांक्षा यामागे होतीच.

जॉनला त्याच त्याच प्रकारची कार बनवण्याऐवजी थोड्या गतीमान आणि दिसायलाही सुबक दिसतील अशा कार बनवण्याची इच्छा होती. तरुणाईला वेगाचे वेड लावण्याचे श्रेय जॉन डी’लॉरेनलाच दिले पाहिजे. रस्त्यावरून पाळणारी स्पोर्टस् कार त्याला पहायची होती. यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेऊन कंपनी उभी केली आणि डीएमसी-१२ ही स्टायलीश आणि स्पीडी कार बनवली. ही कार आणि त्यासाठी उभी केलेली कंपनी म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखे होते. त्याने अनेक गुंतवणूकदार उभे केले. पण तरीही त्याला सरकारी पाठबळ मिळण्याची आवश्यकता होती, ती अर्थातच मिळाली नाही. उलट त्याच्या कंपनीच्या आर्थिक व्यवहारात गडबड असल्याचा संशय घेत सरकारने त्याच्या विरोधात चौकशी सुरु केली. त्याला कोकेनमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पडणे हाही सरकारी चौकाशिचाच एक भाग होता ज्याला तो नकळतपणे बळी पडला हेही नंतर उघड झाले. आपली कंपनी वाचवण्यासाठी केलेला आटापिटा त्याला चांगलाच भोवला होता.

डीएमसीने एकच कार निर्माण केली. पण ती इतकी प्रभावी होती की प्रत्येक संग्राहाकाला आपल्या संग्रहात अशी कार असलीच पाहिजे असे वाटे. नॉर्दर्न आयर्लंडमधील त्यांच्या युनिटमधून अशा प्रकारच्या एकूण ९००० कार तयार करण्यात आल्या. आपल्या कारला मार्केटमध्ये फारसा प्रतिसाद मिळत नाही हे माहित असूनही जॉनने कारचे उत्पादन थांबवले नाही. त्याच्या या अव्यवहारी धोरणामुळे लवकरच डीएमसी दिवाळखोरीत निघाली. याच दरम्यान त्याला कोकेन सप्लाय करण्याच्या आरोपाखाली अटक आली आणि क्रिस्टीनच्या-त्याच्या बायकोच्या- स्वप्नांना घरघर लागण्यास इथूनच सुरुवात झाली. अकरा वर्षांच्या संसारात तिने कधीच आपला नवरा काय करतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला नव्हता. पण त्याची स्वप्ने मोठी आहेत आणि तो कर्तृत्ववान आहे एवढेच काय ते तिला माहीत होते.

ज्या दिवशी जॉनच्या नावाचा अटक वॉरंट निघाला त्यादिवशी तर त्याची बायको क्रिस्टीनाच्या पायाखालची जमीनच सरकली. आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा आपला नवरा ड्रग्ज वगैरेच्या फांद्यात कधी सापडेल याची तिने कल्पनाही केली नव्हती. आपल्या दोन छोट्या मुलांवर याचा परिणाम होऊ न देण्याची खबरदारी घेणे किती कसोटीचे असते याची कल्पना दुसऱ्या कुणालाच करता येणार नाही. कारण, एका स्मगलरची मुले म्हणून त्यांना त्यांच्या शाळेत वेगळी वागणूक मिळू नये, आजपर्यंत त्यांच्या वडिलांच्या प्रतिष्ठेमुळे त्यांना जो आदरसन्मान मिळत होता तो लयास जाऊन त्यांची हेटाळणी होऊ नये म्हणून तिने सर्वतोपरी प्रयत्न केले. याच भीतीने तिने पत्रकारांनाही सामोरे जाण्याचे टाळले. इतकेच काय आपल्या मॉडेलिंगच्या करिअरवरही तिला पाणी ओतावे लागले. या एका घटनेने जॉनच्या कुटुंबाची स्थिती वादळात सापडलेल्या चिमणीच्या घरट्याप्रमाणे झाली होती.

दोनच वर्षांत म्हणजे १९८४ साली त्याला या आरोपातून निर्दोष मुक्त करण्यात आले. मात्र या दरम्यान त्याचे कुटुंब कोलमडून गेले होते. जाईल तिथे मुलांना टोमणे ऐकावे लागत होते. याच कारणाने त्याचा घटस्फोटही झाला. नवरा-बायको म्हणून त्यांचे नाते संपले असले तरी तो नेहमीच त्याच्या मुलांसाठी एक चांगला बाप आणि मित्र होता. या आरोपातून मुक्त झाल्यावर त्याने पुन्हा कार बनवण्याचा प्रयत्न केला नाही. त्याची डीएमसी कंपनी मात्र आजही सुरु आहे. सध्या ती कारला लागणारे पार्ट्स बनवते.

१९ मार्च २००५ रोजी वयाच्या ८० व्या वर्षी जॉन डी’लॉरेनचे निधन झाले. यशातून अपयशाकडे आणि अपयशातून स्थिरतेकडे असा जॉनचा हा प्रवास आपल्याला जीवनाच्या चढ-उतारात खंबीर आणि प्रमाणिक राहण्याची गरज दोन्ही गोष्टी अधोरेखित होतात.

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required