या पतीपत्नीची झाली तब्बल ७२ वर्षांनी भेट, नेमकं काय घडलं होतं याकाळात?

मंडळी, वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक सुखावणारी बातमी आम्ही आणली आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले नारायण नांबियार आणि त्यांच्या पहिल्या पत्नी शारदा हे तब्बल ७२ वर्षांनी पहिल्यांदाच भेटले. लग्न होऊन अवघ्या ८ महिन्यात दोघांची ताटातूट झाली होती. ७२ वर्षांनी ते नक्की भेटले कसे ? त्यांची ताटातूट का झाली होती ? चला जाणून घेऊ....
१९४६ साली दोघांचा विवाह झाला. त्यावेळी नारायण नांबियार १८ वर्षांचे होते तर शारदा १३ वर्षांच्या होत्या. तो काळ ब्रिटीश सत्तेविरुध्दच्या उठावाचा होता. अशाच एका शेतकरी उठावात नारायण नांबियार वडिलांसोबत सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांच्या घरावर पोलिसांनी छापा मारला, स्त्रियांवर अत्याचार केले. या सगळ्यात नारायण यांच्या घरच्यांनी शारदा यांना त्यांच्या माहेरी पाठवलं. थोड्याच दिवसात पोलिसांनी नारायण आणि त्यांच्या वडिलांना ताब्यात घेतलं.
जेल मध्येच नारायण यांच्या वडिलांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. नारायण यांना १६ गोळ्या लागल्या पण ते त्यातून वाचले. काही गोळ्या तर अजूनही त्यांच्या शरीरात आहेत. हे एकीकडे होत असताना शारदा यांच्या घरच्यांनी त्यांचं लग्न दुसऱ्याशी लावून दिलं. नारायण जेल मधून आल्यानंतर त्यांचाही दुसऱ्या मुलीशी विवाह झाला.
यानंतर ते पुन्हा कधीही भेटले नाही. ७२ वर्षांनी नुकतंच दोघांच्या मुलांची भेट झाल्यावर या गोष्टींना उजाळा मिळाला. मुलांनीच त्यांची भेटही घडवून आणली. आज नारायण विधुर आहेत तर शारदा यांचे पतीही या जगात नाहीत. त्यांच्या मुलांनी म्हटल्याप्रमाणे ७२ वर्षात दोघेही एकमेकांची सतत आठवण काढायचे. पण पहिल्यांदा भेटल्यावर कोणीही कोणाशी फारसं बोललं नव्हतं. खूप काही बोलायचं असूनही दोघेही शांत बसून होते.
मंडळी, अशा प्रकारे सरतेशेवटी एक गोष्ट पूर्ण झाली !!