computer

मुलांचे लाडके मासिक`किशोर`ला आज ५० वर्षे पूर्ण झाली !`किशोर`ला सुवर्णमहोत्सवानिमित्त शुभेच्छा !!

आज १४ नोव्हेंबर.बालदिन ! किशोरचाही वाढदिवस.आज बरोबर पन्नास वर्षांपूर्वी किशोरचा पहिला अंक प्रकशित झाला.पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त आणि बालदिनाचे औचित्य साधून तत्कालीन शिक्षण मंत्री मधुकरराव चौधरी यांनी या पहिल्या अंकाचे पुण्यात प्रकाशन केले. या अंकाच्या मुखपृष्ठावरचं नेहरूजींचं चित्र  प्रसिद्ध चित्रकार मुरलीधर आचरेकर यांनी काढलं होतं.

पाठ्यपुस्तकाइतकंच विद्यार्थ्यांना पूरक वाचन साहित्य देणं गरजेचं होतं.पूरक वाचनासाठी पुस्तकं प्रकाशित करण्याला मर्यादा होत्या.तेव्हा मासिकाद्वारे हा उद्देश साध्य करायचं ठरलं. मुलांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी,अभ्यासक्रमाबाहेरचे ज्ञान मिळावे, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा,त्यांच्या संवेदनशील मनावर उत्तम मूल्यांचे संस्कार व्हावेत ही उद्‌दिष्टे ठेवून बालभारतीच्या वतीने  किशोरचे प्रकाशन सुरु झाले.

तत्कालीन शिक्षण मंत्री मधुकरराव चौधरी यांच्या संकल्पनेतून `किशोर`ची निर्मिती झाली.

"जगात ज्ञान -विज्ञानाचा पसारा सारखा वाढत आहे. आपल्या  शाळांच्या चार भिंतीच्या आड पाठयपुस्तकातून तुम्हाला जे काही मिळते,त्यापेक्षा कितीतरी अधिक नित्य नवे ज्ञान तुम्हाला गुरुजींनी द्यावयाचे आहे.तुम्हालाही शोधावयाचे,मिळवायचे आहे. तुमच्या बुद्धीला,तरल अशा कल्पनाशक्तीला आणि जिज्ञासेला सतत काहीतरी हवे असते. काहीतरी अद्भुतरम्य पाहावे,ऐकावे याकडे तुमचे मन सारखे झेपावते. ह्या तुमच्या सर्वांगाने ,सर्वांशाने फुलण्याच्या काळात तुम्हाला काही मदत करता आल्यास ती करण्याचा`किशोर`चा विचार आहे. तुमच्या मनाची स्वाभाविक गरज उत्तमरीतीने भागविणारे साहित्य तुम्हाला विपुलतेने दिले पाहिजे. रुचतील असे विषय सहज समजेल अशा भाषेत मांडता आले पाहिजेत.आकर्षक आणि उद्बोधक चित्रे,सुबक अक्षररचना आणि वाचनसुलभता ही मुलांच्या मासिकाची वैशिष्ट्ये होत.अशा प्रकारच्या नियतकालिकाची आज जरुरी आहे. यादृष्टीने पाठ्यपुस्तक मंडळाचा हा प्रयत्न आहे. "

अशी भूमिका यावेळी श्री. मधुकरराव चौधरी यांनी मांडली होती.

पहिल्या अंकाच्या प्रती शाळेत मोफत वाटण्यात आल्या आणि विद्यार्थी - शिक्षकांच्या प्रतिक्रिया अजमावण्यात आल्या. `किशोर`चे नियमित प्रकाशन जानेवारी १९७२ पासून सुरू झाले. किशोरचे पहिले कार्यकारी संपादक होते श्री. वसंत शिरवाडकर. या मासिकाची पायाभरणी त्यांच्या काळात झाली. पुढे ज्येष्ठ नाटककार वसंत सबनीस आणि त्यांनतर ज्ञानदा नाईक यांनी किशोरची उंची अधिक वाढवली. आता चौथा कार्यकारी संपादक म्हणून हा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न मी करतो आहे. गेल्या ५०  वर्षांत किशोर मासिकाने अनेक पिढ्यांवर वाचनाचे,ज्ञान-विज्ञानाचे व मूल्यांचे संस्कार केले आहेत. अनेक चित्रकार,कवी लेखक यांना मासिकाने घडवले आहे. कालानुरूप बदल स्वीकारत पन्नास वर्षांनंतरही किशोर आपला तोच दर्जा आणि गुणवत्ता टिकवून आहे. बदलणाऱ्या मुलांचे भावविश्व  हेरत त्यांच्या सर्जनशील मनावर संस्कार करण्याचा किशोरचा वसा  कायम आहे. म्हणूनच वाचनाची भूक असलेली नवी पिढी देखील किशोरवर तितकंच प्रेम करते.  गेली ५० वर्षे मुलांचे लाडके मासिक असलेल्या `किशोर`ला सुवर्णमहोत्सवानिमित्त शुभेच्छा !!

- किरण केंद्रे, कार्यकारी संपादक, किशोर, बालभारती

सबस्क्राईब करा

* indicates required