रिक्षावर चक्क बाग फुलवली आहे भाऊ....कारण वाचून तुम्ही पण कौतुक कराल !!

मंडळी, तुम्ही आजवर हटके रिक्षा खूप पहिल्या असतील. वायफाय असलेल्या, टीव्ही असलेल्या, सजवलेल्या, एवढंच काय मागच्या भागाला स्कॉर्पिओ जोडली रिक्षा पण अस्तित्वात आहे. हे हटके असलं तरी कोलकाताच्या रिक्षावाल्याने त्याहीपुढे मजल मारली आहे. ही पाहा त्याची इकोफ्रेंडली रिक्षा.
यांचं नाव आहे बिजय पाल. हे कोलकाताचे व्हायरल रिक्षावाले आहेत. त्यांनी रिक्षाच्या छतावर पहिल्यांदाच एक बाग तयार केली आहे. या बागेत गवत आणि लहान रोपटी आहेत. या मागचा त्यांचा हेतू कौतुकास्पद आहे भाऊ.
“झाडे लावा जीवन वाचवा” हा संदेश बिजय पाल यांना द्यायचा होता. आपलं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मग त्यांनी आपल्या रिक्षावरच बाग तयार केली. याखेरीज रिक्षावर “झाडे लावा जीवन वाचवा” असा संदेश पण लिहिला. रिक्षा शहरभर फिरत असते त्यामुळे त्यांचा संदेश लोकांपर्यंत पोहोचला आणि ते लवकरच व्हायरल झाले. लोकांनी त्यांच्या कल्पनेचं कौतुक केलं आहे.
मंडळी, बिजय पाल यांना याचा दुहेरी फायदा झालाय. ते म्हणतात की या बागेमुळे रिक्षाच्या आतलं तापमान थंड राहायला मदत होते.
राव एवढ्याशा बागेने रिक्षाचं तापमान नियंत्रित राहत असेल तर मोठ्या संख्येने झाडे लावली तरी पृथ्वीचं तापमान नक्कीच सुधारेल.
ही वेगळी कल्पना दिल्लीच्या टॅक्सी चालकाने पण करून बघितली आहे. त्याने टॅक्सीवर बाग तयार केली आहे. टॅक्सीला नाव दिलं आहे “ग्रीन गड्डी”. कोलकाताच्या टॅक्सी चालकाने पण आपल्या टॅक्सीवर हिरवळ उगवली आहे, पण या महाशयांनी टॅक्सीच्या आतला भाग पण रिकामा सोडलेला नाही. टॅक्सीच्या आत लहानसहान रोपटी आहेत.
मंडळी, सामाजिक संदेश पोहोचवण्याची ही एक भन्नाट कल्पना आहे. तुम्हाला कशी वाटली ही आयडिया ?? सांगा बरं !!