computer

एक हुशार विद्यार्थिनी ते एक गणिती विदुषी असा आहे मंगला नारळीकर यांचा जीवन प्रवास

गणिताचं नुसतं नाव उच्चारलं तरी आपल्यापैकी अनेक जण नाक मुरडतात.मग गणिताशी गट्टी जमणं ही तर फार लांबची गोष्ट. पण मंगला जयंत नारळीकर यांची गणिताशी इतकी गट्टी जमली, की त्यांनी याच विषयाला वाहून घेतलं. या विषयात त्यांनी केलेलं काम पाहिल्यावर त्यांच्यासाठी विदुषी ही उपाधी सार्थ ठरते. 
मंगला नारळीकर अर्थात लग्नाआधीच्या मंगला राजवाडे यांचा जन्म १७ मे १९४३ मध्ये मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.शालेय आयुष्यात त्या हुशार विद्यार्थिनी म्हणून गणल्या जात असत. त्यांची या गणिताशी मैत्री शालेय जीवनातच झाली.गणिताबरोबरच त्यांना इतर विषयही तितकेच आवडत असत. त्यामुळे त्यांना करिअर संदर्भात अनेक लोकांनी अनेक पर्याय सुचवले. सुचविल्या गेलेल्या अनेक पर्यायांतून त्यांनी गणितात करिअर करण्याचं ठरवलं. त्या पाठीमागेही त्यांना घरातून मिळालेले संस्कारच होते.
 

हुशार विद्यार्थ्यांचा कल विज्ञान शाखेकडे असतो, पण मंगला यांनी मात्र गणित विषयात इंटर आर्ट्स तेव्हाचे(११वी १२ वी), बीए करण्याचे ठरवले. पुढे गणितातच त्यांनी एमएही केले.त्यांच्या या महाविद्यालयीन आयुष्यात त्या  कायमच प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या.यासाठी त्यांना अनेक बक्षीस मिळालेली आहेत.याव्यतिरिक्त त्यांना यासाठी तत्कालीन कुलपतींकडून सुवर्णपदकही मिळाले.पुढे त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च(टी आय एफ आर) या प्रसिद्ध संशोधन संस्थेत संशोधनासाठी प्रवेश घेतला. शिक्षण आणि नोकरी हे दोन्ही सुरू असतानाच त्यांच्या घरच्यांनी त्यांच्यासाठी वर संशोधन सुरू केलं.लहानपणीच वडिलांच्या झालेल्या मृत्यूमुळे मंगला यांच्या वरसंशोधनाची जबाबदारी त्यांच्या काका काकूंनी आणि मामांनी समर्थपणे पेलली.मुंबईत लेबर ऑफिसर म्हणून कार्यरत असलेल्या बाळासाहेब राजवाडे यांनी आपल्या पुतणीसाठी लग्नाचा प्रस्ताव नारळीकरांकडे पत्रानं पाठवून दिला.पण जयंत नारळीकर त्यावेळी इंग्लंडमध्ये होते तर जयंत यांचे आई-वडील अजमेरमध्ये होते. यामुळे त्यांच्याशी संपर्क करण्यात अडचणी येत होत्या. त्यात भर पडली, ती नारळीकर यांच्या घरच्यांच्या झालेल्या गैरसमजाची.नंतर मंगला यांचे मामा बाबासाहेब चितळे यांनी शांतपणे तात्यासाहेब नारळीकर यांचा गैरसमज दूर केला. थोड्या दिवसांनी तात्या साहेबांनी राजवाडेंना अजमेरला मुलीला घेऊन येण्याबद्दल पत्राद्वारे कळवलं. जयंत डिसेंबरमध्ये भारतात येणार असल्याने सगळं काही अलबेल झाल्यास तेव्हाच लग्न करण्याचाही नारळीकर मंडळींचा विचार होता.ठरल्याप्रमाणे मंगला आणि बाळासाहेब चितळे हे दोघं अजमेरला रवाना झाले. अजमेरला पोहोचल्यावर मंगला आणि जयंत हे अजमेरच्या फॉयसागर तलावाकडे गेले. सुरुवातीला नर्व्हसनेसमुळे कमी बोलणाऱ्या मंगला यांना जयंत नारळीकरांनी आपल्या केंब्रिज विद्यापीठात घडणारे मजेदार किस्से ऐकवून काही क्षणातच मोकळं केलं.त्यामुळे ते दोघेही एकमेकांशी मोकळेपणाने बोलू शकले. गंमत म्हणजे दोघांनीही एकमेकांना पहिल्याच भेटीत पसंत केलं होतं. पुढे पाश्चात्य पद्धतीप्रमाणे नारळीकरांनी मंगला राजवाडे यांना पत्राद्वारे प्रपोज केलं आणि राजवाडेंनीही ते प्रपोजल स्वीकारलं. अशा रीतीने मंगला राजवाडे या मंगला जयंत नारळीकर झाल्या.

लग्नानंतर आयुष्याचा नवा अध्याय सुरू झाला, तो यु टर्न घेऊनच. लग्नानंतर मंगला नारळीकर यांनी टी आय एफ आर येथे राजीनामा देऊन केंब्रिज गाठलं परमुलखात जाऊन नव्यानं बस्तान बसवताना एकीकडे उत्साह होता तर दुसरीकडे स्वयंपाक करणं, घर चालवणं या गोष्टी अनुभवातून शिकायच्या होत्या. त्यावेळी करिअर संदर्भात त्यांचा एक अल्पविराम झाला. पण गणिताशी असलेली त्यांची नाळ तुटली नाही. गणित विषयाची व्याख्यानं ऐकणं गणिताचा पार्ट थ्री चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी आणि पदवी पूर्व विद्यार्थ्यांच्या ट्यूटोरिअल्स घेणं या माध्यमातून त्यांचा गणिताशी संपर्क येतच होता. मंगला नारळीकर या गणिताची आवड जोपासत असतानाच घराची देखभाल करणं, स्वयंपाक शिकणं आणि करणं, नदीत लहान बोट चालवायला शिकणं, बागकाम करणं, नवऱ्याबरोबर घडणारा प्रवास असे आयुष्यातले अनेक छोटे-मोठे आनंद  घेत असत.

पुढे १९७० मध्ये त्यांच्यावर आपत्याची जबाबदारी आल्यानं दिवस धावत असे. पण करिअर मात्र आणखीनच लांब जाण्याची शक्यता निर्माण झाली. पण त्या काळात त्यांच्या टी आय एफ आर संस्थेतील एका सह कर्मचाऱ्यांच्या बोलण्याचा मंगला यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. आणि पुढे ७२ च्या सप्टेंबर मध्ये दोन्ही लहान मुलींना घेऊन नारळीकर दांपत्य मुंबईत राहण्यास आलं.जयंत नारळीकर यांनी टी आय एफ आर च्या पदार्थ विज्ञान शाखेत प्राध्यापकी करायला सुरुवात केली. त्यांना टी आय एफ आरच्या समोरच्याच कॉलनीत राहण्यासाठी घर उपलब्ध झालं. पुढच्या वर्षी त्यांच्याकडे नारळीकरांचे आई-वडील वास्तव्यास आले. त्यावेळी एकत्र कुटुंबात लहानाचं मोठं होण्याचा फायदा मंगला यांना झाला. घरच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडून त्यांनी परत एकदा गणिताची व्याख्याने ऐकायला जाण्यास सुरुवात केली. पुढे त्यांना या विषयाची अर्धवेळ संशोधक होण्याची संधी मिळाली आणि काही कालावधीने त्यांना पीएचडीही मिळवली.

आपण शिक्षकी पेशात जाणार असा विचारही त्यांनी कधी केला नव्हता, पण नंतर घर कामाला येणाऱ्या बायकांच्या मुलांना अभ्यासात मदत करताना आपण यांना नीट शिकवू शकतो असं मंगला यांना वाटायला लागलं. यातूनच पाचवी ते सातवीचं गणित सोप्या पद्धतीने समजवून सांगणारं 'गणिताच्या सोप्या वाटा' हे पुस्तक प्रकाशित झालं. याव्यतिरिक्त त्यांनी इतरही अनेक पुस्तकं लिहिली. त्यातील 'पाहिलेले देश भेटलेली माणसं' हे प्रवास वर्णन 'नभात हसरे तारे' ही त्यांची पुस्तकं विशेष गाजली. 
हे सगळं सुरू असतानाच त्यांना जून ८६ मध्ये कर्करोगाने गाठलं. पण त्यातून त्या दुर्दम्य इच्छाशक्ती, घरच्यांची खंबीर साथ आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे सुखरूप बाहेर पडल्या. त्यानंतर ८८ मध्ये परत एकदा त्यांना याच रोगाने विळखा घातला, पण याही वेळेला कर्करोगावर मात करण्यात त्या यशस्वी ठरल्या. एवढंच नाही तर त्यानंतर ३३ वर्षं या निरोगी आयुष्य जगल्या. २०२२च्या जूनमध्ये कर्करोगाने डाव साधला आणि त्यातच त्यांचा काल दुर्दैवी मृत्यू झाला.
प्रसिद्ध अंतराळ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांची पत्नी म्हणून ओळख निर्माण असतानाच त्यांनी अत्यंत अवघड विषय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणित क्षेत्रात स्वतःच्या कामाने एक स्वतंत्र ओळख निर्माण केली.बोभाटा परिवाराच्या वतीने या विदुषीला विनम्र श्रद्धांजली.

लेखिका - राधा परांजपे