computer

चादरी, ब्लँकेट्स, टॉवेल्स, खिडक्या, नळाच्या तोट्या...पाहा बरं भारतीयांनी रेल्वेच्या किती कोटींवर डल्ला मारलाय ?

गेल्याच वर्षी प्रवाश्यांनी तेजस एक्स्प्रेस मधल्या LCD स्क्रीन तोडल्या. सोबतच हेडफोन्सवर डल्ला मारला. आपण भारतीय राष्ट्रीय संपत्तीला आपल्या मर्जीप्रमाणे वापरण्यासाठी आणि बापाचा माल असल्यासारखं उचलून घरी घेऊन जाण्यासाठी चांगले प्रसिद्ध आहोत. आपण आज रेल्वेतल्या चोऱ्यांबद्दल बोलणार आहोत.

रेल्वेतले पंखे, खिडक्यांचे गज, एवढंच काय, बाथरूममधल्या वस्तूसुद्धा भारतीयांनी लंपास केल्या आहेत. अशा लहान लहान वस्तूंना पळवल्यामुळे भारतीय रेल्वेवर मोठा आर्थिक बोजा पडतो. नुकताच आलेला एक अहवाल सांगतो की रेल्वेला अशा चौर्यकर्मामुळे तब्बल ४००० कोटींचा फटका बसला आहे. 

मंडळी, भारतीयांच्या चौर्यकर्मावर खालील मुद्द्यांच्या आधारे अधिक माहिती घेऊया.

१. RPF च्या अहवालानुसार २०१७-१८ या वर्षात वॉशरूममधले शॉवर, खिडक्यांचे गज आणि धक्कादायक म्हणजे रेल्वे रूळसुद्धा चोरण्यात आले आहेत. यात रेल्वेला २.९७ कोटी रुपये गमवावे लागले.

२. पश्चिम रेल्वेच्या अहवालानुसार गेल्या आर्थिक वर्षात तब्बल १.९५ लाख टॉवेल्स, ८१,७३६ चादरी, ५,०३८ उश्या, ५५,५७३ उश्यांचे कव्हर, ७,०४३ ब्लँकेट्स चोरण्यात आले आहेत. या वस्तूंच्या रुपात तब्बल २.५ कोटी रुपये चोरीला गेले आहेत.

३. मध्यरेल्वे नुसार एप्रिल ते सप्टेंबर (२०१८) दरम्यान ७९,३५० टॉवेल्स, २७,५४५ चादरी, २१,०५० उशांचे कव्हर, २१५० उशा आणि २,०६५ ब्लँकेट्स चोरण्यात आले आहेत. या सगळ्यांची किंमत ६२ लाख रुपये होते.

४. शौचालायातले २०० मग, १००० नळाच्या तोट्या, ३०० फ्लश पाईप्स दर वर्षी चोरले जातात. या सर्व चोरलेल्या गोष्टी चोर बाजारसारख्या ठिकाणी सर्रास विकल्या जातात.

५. २०१६ ते १७ वर्षात ५६ ट्रेन्स मधून ७१.५२ लाख किमतीच्या चादरी, उशा, आणि टॉवेल्स चोरण्यात आले होते. या सगळ्या ट्रेन्स मुंबई सेन्ट्रल, बांद्रा आणि सुरत येथून निघाल्या होत्या.

नुकतंच एका प्रवाशाला रंगेहाथ पकडण्यात आलं राव. हा भामटा AC कोचमधल्या ३ ब्लँकेट्स, ६ चादरी आणि ३ उशा आपल्या बॅगेत कोंबत होता. हे तर एक उदाहरण झालं राव. अशाच लहानसहान चोऱ्यांमुळे वरील आकडे तयार झालेत.

रेल्वेतल्या चोऱ्यांसाठी प्रत्येक भारतीयाला दोष देता येणार नाही. यासाठी रेल्वेचे कर्मचारीसुद्धा तेवढेच जबाबदार आहेत. वरील आकडे बघितले तर सार्वजनिक मालमत्तेला कशा प्रकारे हाताळावं याचं प्रशिक्षण देण्याची वेळ आज आली आहे असंच वाटतं.

 

 

आणखी वाचा :

चोरांची तेजस भरारी...प्रवाश्यांनी डझनभर हेडफोन्स वर मारला डल्ला !!!

लाज वाटली पाहिजे आपल्याला, रेल्वे शताब्दी आणि तेजस एक्सप्रेस मधून LCD स्क्रीन काढून टाकणार