व्हेल माशाच्या जबड्यातून सुखरूप परतलेला माणूस....काय घडलं होतं? तो कसा बचावला?

देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय नुकताच एका अमेरिकेच्या मच्छिमाराला आला. मायकल पॅकार्ड असे त्याचे नाव आहे. ५६ वर्षाचा मायकल हा लॉबस्टर डायवर आहे. लॉबस्टर हा कोळंबीचा प्रकार आहे, पण आकाराने त्यांचा आकार कोळंबीपेक्षा मोठा असतो. मायकल हा पाणबुड्यासारखा समुद्रात जाऊन लॉबस्टर पकडत असे. शुक्रवारी मॅसॅच्युसेट्सच्या किनारपट्टीवर नेहमीप्रमाणे तो लॉबस्टर पकडण्यासाठी गेला. पाण्यात उतरल्यानंतर थोड्यावेळाने त्याला लक्षात आले की त्याला एका महाकाय व्हेलने गिळले आहे.
ही सिनेमाची स्टोरी नसून खरोखर घडलेली घटना आहे. सविस्तर जाणून घेऊ या!!
अतिशय विचित्र अशा या प्रकारात मायकल थोडक्यात बचावला आहे. गेल्या शुक्रवारी मायकल नेहमीप्रमाणे समुद्रात उतरला होता. परंतु पुढे त्याचे काय होणार आहे याची त्याला कल्पना नव्हती. अचानक त्याच्यावर हल्ला झाला आणि त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली. तो एका माशाच्या तोंडात आहे हे त्याला कळालेही नाही. मायकलने स्वतःचा मृत्यू अगदी जवळून पाहिला. मायकलला सुरुवातीला वाटले की त्याला शार्कने गिळले आहे, पण नंतर त्याने स्वतःकडे पाहिल्यावर त्याच्या लक्षात आले की, त्याला जखम झालेली नाही.
तो म्हणाला, "प्रथम मला वाटले की मला शार्कने खाल्ले आहे. आता तो कोणत्याही क्षणी मरेल आणि हे क्षण आयुष्यातील शेवटचे आहेत. मला माझी पत्नी, दोन मुलांची खूप आठवण आली. त्यांना आता भेटू शकणार नाही याचे दुःख वाटले".
व्हेल मासा त्याला पूर्णपणे गिळण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या तोंडाचे स्नायू हलत होते. पण अचानक ३०-४० सेकंदानी व्हेल ने उलटी केली. आणि मायकल बाहेर फेकला गेला. मायकलवर विश्वास नव्हता की तो जिवंत आहे. त्याला तातडीने त्याच्या टीमने रूग्णालयात दाखल केले. तिथे त्याच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. नशिबाने कोणतीही गंभीर दुखापत त्याला झाली नव्हती. मायकेलने ही घटना फेसबुकवर शेअर केली. त्याने स्वतःचा फोटोही पोस्ट केला आहे. त्याने आपल्या टीमला रुग्णालयात नेल्याबद्दल धन्यवाद लिहिले आहे. अनेकांनी पोस्ट वाचल्यावर त्याच्या नशिबाचे कौतुक केले.
४० सेकंद व्हेलच्या तोंडातून नशिबानेच मायकल सुटला. मृत्यूच्या दाढेतून परत येणे म्हणजे काय असते हे मायकलने खरोखरच अनुभवले. नाही का?