computer

धार्मिक विधींवर होणारा खर्च आता शाळा बांधण्यासाठी होणार...महाराष्ट्रातल्या गावाचा स्तुत्य निर्णय !!

गोष्ट महाराष्ट्रातली आहे. औरंगाबाद येथील  पोखरी गावाने एक कौतुकास्पद निर्णय घेतलाय. धार्मिक विधींमध्ये ज्या गोष्टी वापरल्या जातात त्या एकदा वापरल्या की त्यांचा काहीच उपयोग होत नाही. पण हाच खर्च जर शिक्षणावर केला तर त्यातून मिळणारं ज्ञान हे पुढे अनेक पिढ्या वाढतच जातं. हाच विचार करून गावातल्या धार्मिक विधींना लागणारा पैसा आता जिल्हा परिषदेची शाळा बांधण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

आजच्या लेखात आपण पोखरी गाव आणि तिथल्या शाळेबद्दल जाणून घेणार आहोत.

काय योजना आहे ?

पोखरी गावातली सध्याची शाळा ही ०.४५ एकर जागेत आहे. बचत केलेल्या पैशांतून शाळेचा विस्तार करण्यासाठी २ एकर जमीन विकत घेण्यात येणार आहे. शिवाय शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची होईल याची काळजी घेण्यात येणार आहे. हे फक्त योजनेपुरतं मर्यादित नाही बरं. गावकऱ्यांनी शाळेच्या अंगणवाडीत सुधारणा करून अंगणवाडीला डिजिटल बनवलं आहे. एवढंच नाही तर शाळेतल्या कम्प्युटर लॅबसाठी १० लाख रुपये खर्च करण्यात आलाय.

कोणत्या प्रकारचा खर्च टाळण्यात येणार आहे ?

हा निर्णय ३ महिन्यांपूर्वी  घेण्यात आला. तंबूला लागणारा खर्च, भागवत साप्ताहमध्ये मिठाईसाठी लागणारा पैसा या सारखे खर्च कमी करण्यात येतील. याखेरीज प्रसादासाठी लागणाऱ्या जेवणात डाळ एका जागी बनवण्यात येईल तर चपात्या या गावातल्या प्रत्येक घरातून आणण्यात येतील.

हा निर्णय एक मताने घेण्यात आलाय. वरती जो खर्च नमूद केला आहे त्यातला अर्धा वाटा हा गावकऱ्यांनी उचलला तर अर्धा खर्च हा ग्रामपंचायतीने केला होता. शाळेला लागणाऱ्या २ एकर जागेसाठी गावातल्या ४५० घरांमधून प्रत्येकी ५००० रुपये योगदान देण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे १००० एकर पेक्षा जास्त जमीन आहे ते ५००० हून जास्त रक्कम देणार आहेत.

पोखरी गावाने घेतलेल्या निर्णयाबद्दल समजताच शेजारच्या गावांनी देखील शाळेसाठी दान देण्याची इच्छा दाखवली, पण यावर तूर्तास निर्णय झालेला नाही. ही शाळा आता फक्त पोखरी पुरती राहिलेली नाही तर शेजारच्या गावांमधून मुलं अॅडमिशनसाठी येत आहेत.

पोखरी येथील झेडपी शाळेचा दर्जा जर वाढला तर तो एक आदर्श तर ठरेलच पण पुढच्या पुढ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या निर्णयाबद्दल पोखरी गावाला बोभाटाचा सलाम.

सबस्क्राईब करा

* indicates required