computer

त्याने सरकारी यंत्रणेला ठकवून १० दिवस फुकटात गोवा दर्शन कसं केलं ?

आम्ही तुम्हाला तोतया भाऊसाहेब पेशव्यांची गोष्ट सांगितली होती. त्या तोतयाने महाराष्ट्रात कसा धुडगूस घातला हेही सांगितलं होतं. तो काळच असा होता की अशा तोतायांचा खरेपणा ओळखणं कठीण होतं, पण आजच्या काळात तोतायांना पकडणं सहज शक्य आहे. पण खरी गोष्ट तर अशी की हे तोतये आजच्या काळातही लोकांना असेच ठकत आहेत. याचं उत्तम उदाहरण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सुनील सिंग नावाच्या ठगाने ‘गोवा प्रोटोकॉल विभागाला’ संपर्क साधून सांगितलं की तो उत्तर प्रदेशचा सहकार मंत्री आहे आणि गोव्याला भेट देणार आहे. पुराव्यासाठी त्याने खोटी कागदपत्रं सादर केली. ह्या कागदपत्रांवर विश्वास ठेवल्यामुळे सुनील सिंग आणि त्याच्या ४ साथीदारांना १० दिवसांसाठी फुकटात सरकारी पाहुणचार मिळाला.

गोवा सरकारतर्फे त्याच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्याला एक गाडी आणि पोलीस सुरक्षा देण्यात आली. याखेरीज त्याने गोव्याच्या मंत्र्यांना आणि महत्त्वाच्या व्यक्तींना भेट दिली. तो प्रोटोकॉल विभागातर्फे आलेला असल्याने त्याला कोणीही प्रश्न विचारला नाही.

त्याला नेमकं कसं पकडलं याबद्दल माहिती मिळू शकलेली नाही. एका बातमीनुसार गोव्याच्या मंत्र्यांनी त्याची माहिती गुगलवर सर्च केली असता काहीही हाती लागलं नव्हतं. त्याच्या बोलण्यातून संशय पण येत होता. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या आदेशावरून नुकत्याच त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. गोव्याच्या क्राईम ब्रांचने त्याची  सुरु केली आहे. त्याच्या मित्रांकडून माहिती मिळाली की त्याला फुकटात गोवा फिरायचं होतं म्हणून त्याने ही शक्कल लढवली. प्रमोद सावंत यांच्या मताप्रमाणे तो आपल्या व्यवसायासाठी संपर्क वाढावेत म्हणून आला होता. महत्त्वाच्या माणसांना भेटून त्याला आपल्या व्यवसायासाठी फायदा करून घ्यायचा होता.

मंडळी,काळ बदलला तसा तोतयांची पद्धतही बदलली आहे. या घटनेतलं आश्चर्य म्हणजे सुनील सिंगने कोण्या सामान्य माणसाला फसवलेलं नाही तर गोव्याच्या सरकारी यंत्रणेलाच फसवलं आहे. १० दिवस तो सरकारी पाहुणचार घेत असताना कोणालाच कसं समजलं नाही हा प्रश्न शेवटी उरतोच.

 

आणखी वाचा :

पार्वतीबाईंच्या या प्रश्नाने तोतया भाऊसाहेब पेशव्याचा खोटेपणा झाला सिद्ध !!