computer

५० वर्षांपूर्वी अशा असायच्या मराठी जाहिराती....या ९ जाहिराती पाहून घ्या !!

काही वर्षांपूर्वी आम्ही तुमच्यासाठी फेसबुकवर शेअर केलेल्या १९२४सालच्या सत्यकथा मासिकातल्या जाहिरातींचा खजिना आणला होता. आज आम्ही अशाच आणखी जाहिराती आणल्या आहेत.या जाहिरातींचा नेमका काळ सांगता येणार नाही, पण जाहिराती बघून तुम्हाला अंदाज येऊ शकतो. एका जाहिरातीत तर सुलोचना दीदी दिसत आहेत. म्हणजे हा काळ साधारण १९५० ते १९८० पर्यंतचा असावा असा एक अंदाज बांधता येतो.

पाहा बरं आणखी किती जाहिराती तुम्हाला ओळखता येतात.

१. गोल्ड स्पॉट

संत्र्याच्या स्वादाचे हे शीतपेय म्हणजे एकेकाळी ‘बॉय मीट्स गर्ल’ अशा डेटिंग इव्हेंटचे प्रतिक  होते. बऱ्याच प्रेमिकांनी  गोल्ड स्पॉटच्या एका बाटलीत दोन स्ट्रॉ टाकून ते पिताना स्वतःचे फोटो काढून घेतले होते. र्तेव्हा थम्सअपसारख्या कोला ड्रिंक्सची चालती आली नव्हती. लग्न समारंभात सुद्धा पाहुण्यांना गोल्ड स्पॉट दिले तर वधूपित्याने भक्कम खर्च केला आहे असं कौतुक केलं जायचं. आता ही पार्लेची सर्व शीतपेय कोकाकोला कंपनीच्या मालकीची झाली आहेत. पण एकेकाळी गोल्ड स्पॉटचा कारखाना जिथे होता तिथल्या बस थांब्याचे नाव अजूनही गोल्ड स्पॉट असेच आहे.  

२. डोंगरे अप्सरा हेअर ऑईल

ही जाहिरात डोंगऱ्यांच्या अप्सरा हेअर ऑईलची असली तरी त्या काळात अप्सरापेक्षा दुनाख्यांचे शकुंतला हेअर  ऑईल आणि प्रकाश ट्रेडिंग कंपनीचे माक्याचे तेल यांना जास्त मागणी होती. ग्राईप वॉटर किंवा बालामृत या वर्गवारीत डोंगऱ्यांचे बालामृत देशभर प्रसिद्ध होते. ते किती प्रसिद्ध होते हे खालील फोटोवरून तुम्हाला कळेल.

हे लेखक दुसरे तिसरे कोणी नसून सुप्रसिद्ध गायक किशोर कुमार आहेत. शेवटी दिलेला पत्ता हा किशोर कुमार यांचा जुना पत्ता आहे.

३. पोरवाल नेत्रांजन

सुलोचना बाईंच्या डोळ्यात जी चमक होती, जे हास्य होते त्याला खरं म्हणजे पोरवाल नेत्रांजनाची मदत घेण्याचं काहीच कारण नव्हतं. पण या एका फोटोमुळे पोरवाल नेत्रांजनाची ही जाहिरात अमर झाली. पोरवाल यांचे  एक वैशिष्ट्य असे की त्याकाळच्या उत्कृष्ट चित्रकारांची चित्रे ते कॅलेंडरसाठी वापरत. रंगसम्राट रघुवीर मुळगावकर यांची अनेक चित्रे त्यांनी विकत घेऊन त्यानंतर कॅलेंडरची निर्मिती केली.

४. तुषार जीवनसत्वयुक्त वनस्पती

महायुद्धानंतर आलेल्या महागाईत घरचे साजूक तूप परवडेनासे झाले तेव्हा हायड्रोजनेटेड ऑईल म्हणजे ज्याला आपण ‘वनस्पती तूप’ म्हणतो ते अस्तित्वात आले.  सर्वच वनस्पती तूपवाले आपल्या तुपात ‘अ’ आणि ‘ड’ जीवनसत्वे कशी मुबलक आहेत याचा विशेष उल्लेख करायचे. याचे कारण असे की जीवनसत्व विकणे हा तेव्हाचा नफ्याचा धंदा होता. तुषार हा त्यापैकीच एक ब्रँड, पण डालडा सारख्या 'भाई' समोर कोणीच टिकले नाही.

५. प्रभात स्टोव्ह

गॅसच्या जमान्यात एकेकाळी घराघरात वापरले जाणारे फरफरे स्टोव्ह दिसेनासे झालेत. पेट्रोमॅक्स किंवा बत्ती हा प्रकार पण आता क्वचितच बघायला मिळतो. त्या जमान्यात देशी ब्रँड आणि विदेशी ब्रँड अशी स्पर्धा असायची. स्टोव्हमध्ये पितळी टाकीचा प्रायमस हा स्टोव्ह आणि प्रभात यांची स्पर्धा बरेच वर्षे चालत होती.   

६. कासव छाप मच्छर अगरबत्ती

मुंबईच्या दमट हवामानात मलेरिया आणि डेंग्यू यांच्या साथी वारंवार येत असतात यापैकी मलेरियाच्या साथीबद्दल आमचा हा लेख तुम्ही वाचलाच असेल.

मृत्युचं थैमान घालणारा 'चमकी बुखार' आहे तरी काय ? तो बालकांचेच बळी का घेतो ?

संध्याकाळच्यावेळी डासांची घरातून हकालपट्टी करण्यासाठी कीटकनाशक पॉइशाच्या पंपातून घरा घरात फवारली जायची. पण त्या कीटकनाशकाच्या वासाने डास आणि घरातली माणसं दोघंही बाहेर पडायची. त्यानंतर पूर्णपणे हर्बल डासांची अगरबत्ती आणण्याचा मान बॉम्बे केमिकल वर्ककडे जातो. रात्रभर संथ जळत राहणाऱ्या या अगरबत्तीला कछुवा हे नाव देण्याचे कारण हेच.  

७. कॅम्लिन

दोन अजरामर ब्रँड जर एकाच चित्रात बघायचे असतील तर ही जाहिरात नक्की बघा. त्यापिकी एक ब्रँड  अर्थातच दांडेकर यांचा कॅम्लिन आणि हे चित्र रंगवणारे गृहस्त म्हणजे ‘शंतनूराव किर्लोस्कर’. म्हणजे किर्लोस्कर ब्रँडचे मालक.

८. न्युट्रीन स्वीट्स

प्लास्टिक पॅकिंग येण्यापूर्वी उच्च दर्जाची चॉकलेट आणि बिस्किटं  पत्र्याच्या डब्यात यायची. हा पत्रा टीन प्लेटेड (कथिल) असल्याने अन्नपदार्थ खराब व्हायचे नाहीत. हे डबे वर्षानुवर्ष घराघरात आठवण म्हणून साठवले जायचे. न्युट्रीन, जेबी मंघाराम, शालीमार, यासर्व आणि इतर अनेक कंपन्या हे टीन बॉक्सेस वापरायच्या. हे तंत्रज्ञान मात्र भारतात एकाच कंपनीकडे उपलब्ध होतं. त्या कंपनीचं नाव ‘मेटल बॉक्स’.  नंतरच्या जमान्यात प्लास्टिक  पॅकिंग आलं आणि आता असे डबे फारच क्वचित बघायला मिळतात.

९. लक्स

लक्स साबणाच्या जाहिराती आजवर किती नट्यांनी केल्या याची गणतीच नाही. हा साबणच मुळात नट्यांचा साबण म्हणून ओळखला जायचा. या जाहिरातीतील पद्मिनी कोल्हापुरे यांचं वाक्य पाहा ‘माझा तर केवळ एकंच सौंदर्य साबण. लक्स’

 

(फोटो स्रोत : WhatsApp वरून साभार)

 

आणखी वाचा :

१९२४ सालच्या जाहिराती कशा होत्या?