बायकोची बोलणी ऐकावी लागू नयेत म्हणून हा माणूस ६२ वर्षं मुकबधीर राहिला ? बातमी खरी की खोटी ??

लहानपणी अशी समजूत होती की बेडकाला दगड मारला तर बायको मुकी होते. मोठं झाल्यावर आपण खरंच बेडकाला दगड मारायला हवा होता असं बऱ्याच जणांना वाटत असतं. आता गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.
बायकोचं बोलणं ऐकण्यापासून कोणता विवाहित पुरुष वाचला आहे का ? तर नाही !! याच संदर्भात एक विचित्र गोष्ट घडली आहे. बातमी अशी आहे की एका महाभागाने बायकोची बोलणी खावी लागू नयेत म्हणून तब्बल ६२ वर्ष मुकबधीर असण्याचं नाटक केलं.
चमत्कारिक बातमी आहे, नाही का ? मागील २ दिवसांपासून इंटरनेटवर ही बातमी व्हायरल झाली आहे. पण ही बातमी खरी आहे का ? चला पाहूया !!
तर, या कथेतील हिरोचं नाव आहे बॅरी डॉसन. तो कनेक्टिकटचा राहणारा आहे. त्याची पत्नी डोरॉथी म्हणजे या कथेच्या हिरोईनने त्याच्यावर ६२ वर्ष मुकबधीर असल्याचं नाटक केल्याचा आरोप केला आहे. ६२ वर्षांच्या संसारात तो एकदाही आपल्याशी बोलला नाही असं ती म्हणाली. यावर बॅरी डॉसन महाशय म्हणतात की आपलं लग्न इतकी वर्ष टिकण्याचं तेच तर कारण आहे.
मंडळी, चला या नाटकावर पडदा टाकूया. ही बातमी कॅनडाच्या एका इंटरटेनमेंट वेबसाईटने प्रसारित केली आहे. ही वेबसाईट मनोरंजनासाठी ‘फेक न्यूज’ प्रसारित करते. वरती दिलेली केस पण काल्पनिक असून याच वेबसाईटने तयार केली आहे. ही बघा त्यांची न्यूज > https://worldnewsdailyreport.com/man-faked-being-deaf-and-dumb-for-62-years-to-avoid-listening-to-his-wife/
या वेबसाईटचा फंडा एकदम स्पष्ट आहे. मनोरंजनासाठी खोट्या बातम्या तयार करायच्या !! आपल्याकडे पण फेकिंग न्यूज नावाची वेबसाईट प्रसिद्ध आहे भाऊ.
तर मंडळी, खरी बातमी पसरवण्यासाठी ही पोस्ट नक्की शेअर करा !!