computer

मेक्सिकोतली ५ लाख वर्षं जुनी स्फटिक गुहा, पण तिथे आत का जाता येत नाही?

जगात अशी अनेक विचित्र ठिकाणे आहेत, जिथे अफाट खजिना दडलेला आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या खजिन्यांबद्दल माहिती असूनही आजपर्यंत वैज्ञानिकांना त्यांच्यापर्यंत पोहोचणे शक्य झालेले नाही. असाच एक खजिना मेक्सिको येथे क्रिस्टल केव्हमध्ये आहे. खजिना अश्यासाठी की या गुहेत महाकाय आकाराची स्फटिकं आहेत आणि ती तब्बल ५ लाख वर्षं जुनी आहेत. पण या गुहेत जाणे कोणालाही जवळजवळ अशक्य आहे. आज या विलक्षण क्रिस्टल केव्हबद्दल जाणून घेणार आहोत.

मेक्सिकोच्या सिएरा डी नायका पर्वताच्या जवळपास ९८४ फूट खाली एक गुहा आहे. तिथे अनेक मोठमोठ्या आकाराचे स्फटिक खांब आहेत. त्यामुळेच या गुहेला जायंट क्रिस्टल गुहा असे नाव पडले. २०००साली जेव्हा शास्त्रज्ञांना त्याच्याबद्दल माहिती मिळाली तेव्हा ते चक्रावून गेले कारण उत्खननादरम्यान पर्वताखाली असे काही पहिल्यांदा सापडले होते. औद्योगिक पॅनल्ससाठी काम करणाऱ्या दोन भावांनी या खाणीचा शोध लावला होता. ते माऊंट नायकाच्या खाली बोगद्याचे खोदकाम करत होते आणि तेव्हा चुकून खाणीला धडकले. त्यांना जेव्हा स्फटिकांचे खांब दिसले तेव्हा ते चकित झाले.

हे स्फटिक प्रत्यक्षात जिप्समचे बनलेले आहेत. जिप्सम हे एक प्रकारचे खनिज आहे, ते साधारणत: कागद आणि कापड उद्योगात फिलर म्हणून वापरले जाते. सिमेंट बनवण्यासाठीही त्याचा वापर होतो. विशेष म्हणजे हे जिप्सम स्फटिकांचे खांब ५,००,००० वर्षांहून अधिक जुने आहेत आहे. यापैकी अनेक खांब सहज चालता येण्याइतपत मोठे आहेत. कारण ते अनेक वर्षे पृथ्वीखाली गाडले गेले होते. पण या गुहेत कोणालाही जाता येते का? तर नाही!

कूलिंग सूटशिवाय गुहेत प्रवेश करणे कठीण आहे. खास बनवलेल्या कूलिंग सूटशिवाय मानव गुहेत प्रवेश करू शकत नाही. कारण गुहेतील तापमान ५८ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. इथे आर्द्रताही ९० ते ९९ टक्के असते. तसेच आतमध्ये पूर्ण अंधार असतो. इतक्या उष्ण तापमानामुळे आत जाणे खूप धोकादायक असते. या स्फटिकांच्या खाली अतिशय गरम द्रवरूप खडक, म्हणजेच मॅग्मा सापडले आहेत.

शास्त्रज्ञांच्या मते, सुमारे २६ दशलक्ष वर्षांपूर्वी, कॅल्शियम सल्फेट असलेले भूजल गुहांमध्ये शिरले आणि ते पाणी खाली असलेल्या मॅग्मामुळे गरम झाले. ज्यामुळे त्याचे विशाल स्फटिक तयार झाले. जेव्हा मॅग्मा बाहेर आला तेव्हा गुहेतील भूजल ९८ फूट उंच आणि ३३ फूट रुंद होते. तसेच गुहेचे तापमान ५८ डिग्री सेल्सिअसच्या वर होते आणि अशा तपमानात पाण्यातील एनहाइड्राइट मूळ स्वरूपातच राहते, परंतु तापमान ५८ डिग्री सेल्सिअसच्या खाली गेल्यावर त्याचे स्फटिक तयार होऊ लागले. याच कारणामुळे या गुहेत इतके मोठे क्रिस्टल खांब तयार झाले असावेत.

खरंच निसर्ग वेगवेगळ्या रूपात समोर येत असतो, ही गुहाही एक चमत्कारच आहे.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required