रॉयल इन्फिल्ड हवीये ? मग या पट्ट्यांचा अर्थ माहित आहे का ?

रॉयल इन्फिल्डवर लावलेल्या या कापडी पट्ट्या वेगात फडफडताना आपण अनेकदा बघतो. नीट बघितलं कि यावर चीनी किंवा जपानी भाषेत लिहिलेली अक्षरे दिसून येतात. पण या पट्ट्या फॅशन म्हणून नुसत्याच लावल्या जातात कि यामागे काही अर्थ आहे ? चला जाणून घेऊया.

Related image

या पट्ट्या म्हणजे चीनी किंवा जपानी भाषेतील पट्ट्या नसून तिबेटीयन भाषेतील ‘प्रेयर फ्लॅग्ज’ आहेत किंवा आपण त्यांना ‘तिबेटी पवित्र प्रार्थना ध्वज’ म्हणू शकतो. या पट्ट्या दोन प्रकारच्या असतात. आडव्या फ्लॅग्जला “लुंग ता” असे म्हटले जाते. ज्याचा अर्थ होतो “वायुरूपी घोडा”. कदाचित याचमुळेच बाईकवर लावले जाणारे फ्लॅग्ज लुंग ता प्रकारातील असतात. दुसऱ्या प्रकारातील पट्ट्या उभा असतात ज्यांना “डार चोग” म्हटले जाते ज्याचा अर्थ होतो “पवित्र ध्वज”.

फ्लॅग्जवर लिहिलेली अक्षरे मुळात तिबेटी भाषेतील एक बौद्ध मंत्र आहे. ज्याचे बोल आहेत ॐ मणिपद्मे हूं !. या मंत्राला स्पष्ट असा अर्थ जरी नसला तरी असे म्हणतात कि या मंत्राचा जाप केल्याने चित्त थाऱ्यावर येऊन राग, लोभ, मत्सर, द्वेष यांवर माणूस विजय मिळवू शकतो. या फ्लॅग्जचा ‘गुड लक’ म्हणून वापर केला जातो.

या फ्लॅग्जवर असलेल्या रंगांमागे देखील विशेष कारण आहे बरं का. प्रत्येक रंग पाच तत्वांचे प्रतिनिधित्व करतो. पांढरा रंग वाऱ्याचे, लाल रंग आगीचे, हिरवा रंग पाण्याचे, पिवळा रंग पृथ्वीचे आणि निळा रंग आकाशाचे प्रतिक आहे.

तिबेटीयन संस्कृतीमध्ये म्हटले जाते कि या फ्लॅग्जचा जमिनीशी संपर्क होता कामा नये. फ्लॅग्ज स्थिर असू नयेत तसेच जमिनीपासून नेहमी उंच जागी लावलेले असावेत जेणेकरून या फ्लॅग्जवर लिहिलेल्या मंत्रांची सकारात्मक उर्जा हवे मार्फत सर्वदूर वाहून जाईल. जर या फ्लॅग्जवरील रंग आणि मंत्र पुसट झाले असतील तर याला शुभ मानले जाते कारण याचा अर्थ तुमच्या प्रेयर फ्लॅग्जच्या प्रार्थना चारी दिशांना पसरत आहेत.

लहान मोठ्या आकारातील हे प्रेयर फ्लॅग्ज आता फक्त बाईक पुरते मर्यादित राहिले नसून हल्ली अनेक कार वरही दिसून येत आहेत

आता एवढं सगळं माहित झाल्यावर जेव्हा तुम्ही यापुढे कोणत्याही बाईक वर प्रेयर फ्लॅग्ज बघाल तेव्हा नक्कीच तुमचा दृष्टीकोन बदललेला असेल आणि हो बोभाटाचीही आठवण येईलच.

सबस्क्राईब करा

* indicates required