computer

प्रोजेक्ट MK Ultra - ६ : फ्रँक ऑल्सनच्या आत्महत्येचा रहस्यभेद!! त्याचा MK Ultra मध्ये प्रवेश आणि अंत कसा झाला?

प्रोजेक्ट MK Ultra-१: माणुसकी शब्दाला कलंक अशा सीआयएच्या अघोरी कारस्थानाची कथा!!

प्रोजेक्ट MK Ultra-२: भेटा CIA च्या अमानुष एमके अल्ट्राला जन्म देणाऱ्या अॅलन डलेसला !!

प्रोजेक्ट MK Ultra-३: काळ्या विद्येचा जादूगार सिडनी गॉटलीबने केले लोकांवर अमानुष रासायनिक प्रयोग!!

प्रोजेक्ट MK Ultra - ४ : जाणून घ्या MK-Ultraने जगाला कसे व्यसनाच्या दरीत लोटले!

प्रोजेक्ट MK Ultra - ५ : ऑपरेशन मिडनाइट क्लायमॅक्स, अमानुष प्रयोग आणि प्रयोगांचे बळी!!

२८ नोव्हेंबरच्या त्या रात्री फ्रँक ओल्सनने त्याचे जीवन संपवले. झाल्या प्रकाराची फारशी चर्चा पण झाली नाही. सिडनी गॉटलीबने त्याच्या 'काळा जादूगार' या नावाला जागून झाला प्रकरण दाबून टाकले. हे करणं फार सोपं नव्हतं, कारण चौकशीच्या खोलात हे प्रकरण गेले असते तर त्याचवेळी 'एमके-अल्ट्रा'चा पर्दाफाश झाला असता. पण गॉटलीबने सीआयएच्या पध्दतीने आत्महत्येची चर्चा होण्याआधीच 'साफसफाई' करून टाकली. हे सगळं त्याने इतक्या सफाईने केलं की फ्रँक ओल्सनच्या आत्महत्येची चर्चा त्यानंतर वीस वर्षं गाडली गेली. तोपर्यंत तो सेवानिवृत्त होऊन अमेरिकेच्या बाहेर पडला होता. हे सगळं कसं घडलं हे आपण नंतर वाचूया. पण आज आपण फ्रँक ओल्सनच्या शेवटच्या सात दिवसांत काय झालं ते पाहूया..

पूर्वसूत्र :

अमेरिकेची देशाबाहेर काम करणारी गुप्तहेर संघटना म्हणजे सीआयए. त्यांनी त्यांचं काम करताना आजवर बरीच अमानुष कामंही केली. त्यातली ही आमची कथामालिका म्हणजे सीआयएच्या अघोरी आख्यानातला एक अध्याय आहे. गरज भासल्यास अमेरिका आपल्या नागरिकांचा पण बळी देते याची साक्ष देणारं हे प्रकरण आहे. या कथेत अनेक खलनायक आहेत. त्यांच्या कथा आपण एकानंतर एक आपण वाचणार आहोत 'बोभाटा'च्या प्रोजेक्ट एमके अल्ट्रा या मालिकेतून! ही मालिका बर्‍याच भागात आम्ही सादर करणार आहोत,  कारण ही कथा तशीच गुंतागुंतीची आहे.

हा सीआयएचा एमके अल्ट्रा प्रोजेक्ट माणुसकीच्या नजरेतून पाह्यला तर अमानुष होता. या प्रोजेक्टद्वारे लोकांवर बरेसचे बेकायदेशीर असे प्रयोग केले गेले. एखाद्याच्या मेंदूचा किंवा मनाचा ताबा घेऊन त्याला आपले गुन्हे कबूल कसे करायला भाग पाडेल अशी औषधं आणि कार्यपद्धती शोधणं हे प्रोजेक्ट एम के अल्ट्राचं काम होतं. १९५३ मध्ये या प्रोजेक्टला मंजुरी मिळाली तरी तो खरा चालू झाला ते १९७३मध्ये. बेकायदेशीर असल्याने अमेरिकेने या प्रोजेक्टची माहिती लपवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण तरी अगदी २०१८पर्यंत त्याबद्दल काही माहिती उजेडात येत गेली. पण अशा प्रकारचा हा जगातला पहिला प्रयोग नव्हता. बोभाटा हा प्रयोगाची मंजुरी, त्याचे दुष्परिणाम, अमेरिकेने हे सगळं कसं लपवायचा प्रयत्न केला, त्यामध्ये कोण सामील होते, त्यांच्या भूमिका काय होत्या हे सर्व आपल्यासमोर या मालिकेद्वारे आणत आहे.

(फ्रँक ओल्सन)

त्याच्या आयुष्यातील ते शेवटचे सात दिवस त्याच्या पत्नीच्या, सहकार्‍यांच्या, मित्रांच्या आठवणींतून जेव्हा उलगडत गेले तेव्हा सगळ्यांचं एकमत होतं की त्या दरम्यान फ्रँक ओल्सन एका प्रचंड मानसिक दबावाखाली होता.

पण का? असे काय घडले होते या शेवटच्या काही दिवसांत? वर्षानुवर्षं अमेरिकन लष्करासाठी शास्त्रज्ञ म्हणून काम करणारा फ्रँक ओल्सन अचानक आत्महत्या करतो म्हणजे त्या सात दिवसांत काहीतरी असह्य आघात झालेला असला पाहिजे हा साधा तर्क आहे. या तर्काला पुष्टी देणार्‍या अनेक घटना नंतर समोर आल्या. पण वाचण्यापूर्वी आपण फ्रँक ओल्सनची ओळख करून घेऊया!

फ्रँक ओल्सनचे आयुष्य म्हणजे सर्वसाधारण अमेरिकन नागरीकासारखे होते. त्याचे पालक स्वीडनहून अमेरिकेत स्थलांतरीत झाले होते. फ्रँक फार हुशार नसला तरी अभ्यासू मुलगा होता. विस्कॉन्सीन विद्यापीठातून रसायनशास्त्रात त्याने पीएचडी मिळवली. एका वर्गमैत्रीणीसोबत विवाहबध्द झाला. पर्ड्यू विद्यापीठाच्या एका विभागात तो नोकरी करत होता. थोडक्यात एका सर्वसाधारण यशस्वी अमेरिकन माणसासारखे त्याचे आयुष्य चालले होते. हा काळ दुसर्‍या महायुध्दाच्या आसपासचा होता. देशाला गरज पडल्यास त्याची सैन्यात नोकरी करण्याची इच्छा होती म्हणून त्याने राखीव अधिकारी दलात त्याचे नाव नोंदवून ठेवले होते. थोड्याच दिवसांत युध्द भडकले आणि त्याला सैन्यात भरती होण्याचे आदेश मिळाले. हे सुध्दा त्या काळच्या सर्वधारण अमेरिकन नागरिकाच्या आयुष्यात जे घडत होते तसेच होते.

पण त्याच्या या आयुष्याला कलाटणी मिळाली ती याच दरम्यान !

ट्रेनिंगच्या दरम्यान त्याला अचानक त्याच्या पीएचडीच्या गाइडचा -इरा बाल्डवीनचा फोन आला. एका अत्यंत गोपनीय सरकारी कामासाठी त्याला साहाय्यक म्हणून फ्रँक ओल्सनची गरज होती. ओल्सनचा पीएचडीचा विषय होता 'एरोसोल'. एरोसोल म्हणजे हवा किंवा एखाद्या वायूच्या दाबाखाली असलेला द्रव पदार्थ! अगदी आपल्या ओळखीचे एरोसोलचे उदाहरण म्हणजे 'फॉग'. या तंत्राचा वापर सरकारला जैविक शस्त्र बनवण्यासाठी करायचा होता. त्यासाठी कँप डेट्रीक याठिकाणी एक बायो वॉरफेअर म्हणजे जैविक शस्त्रांची निर्मिती करणारी एक प्रयोगशाळा उभारण्यात येणार होती. इथे इतर अमेरिकन शास्त्रज्ञांसोबत काही युध्दकैदी नाझी शास्त्रज्ञ पण काम करत होते. या प्रयोगशाळेत काम करत असतानाच त्याने 'लष्करी शस्त्रात सूक्ष्म जंतूंचा वापर' या विषयावर २२० पानांचा एक अहवाल तयार केला होता. या कामाच्या दरम्यानच त्याची ओळख हॅराल्ड अब्राम्सनशी झाली

(वाचकांना आठवत असेल तर फ्रेंक ओल्सनने आत्महत्या केल्यावर लॅशब्रुकने स्टेटलर हॉटेलातून ज्याला फोन केला होता तोच हा हॅराल्ड अब्राम्सन!)

हे सगळे घडत असताना १९४४ साली त्याचा लष्करासोबत असलेला करार संपला. पण सरकारने त्याला 'गैर-लष्करी' म्हणजे सिव्हीलीयन काँट्रॅक्टवर कामावर ठेवून घेतले. त्याचे जैविक अस्त्रांवरचे प्रयोग सुरुच राहिले .'हवेच्या माध्यमातून सूक्ष्म जंतूंचा प्रसार' करणारी शस्त्रं हा त्याचा मुख्य विषय झाला. अशाच एका प्रयोगात सॅनफ्रॅन्सिस्को जवळच्या एका बेटावर अँथ्रॅक्स जंतूंचे फवारे हवेतून सोडण्यात आले.

त्या वेळी असे प्रयोग अनेक देश करत होते. (या प्रयोगात नेमके काय घडले ते बोभाटाच्या या ३ लेखांत तुम्हाला वाचायला मिळेल.) पण सोव्हिएत रशिया या जैविक शस्त्रांच्या अभ्यासात अग्रेसर होताना दिसल्यावर अमेरिकेचे धाबे दणाणले. या भीतीतून जैविक अस्त्रे बनवण्यासाठी स्पेशल ऑपरेशन्स डिव्हीजनची निर्मिती करण्यात आली. काहीच दिवसात फ्रँक ओल्सन या स्पेशल ऑपरेशन्स डिव्हीजनच्या मुख्य पदावर पोहचला. १९५३ पर्यंत त्याने प्रयोगशाळेत अनेक संहारक अस्त्रं बनवली.

हवेत विष फवारणारा सिगारेट लायटर, हवेत स्टेफ एंटेरॉक्सीन सारखे जहाल विष फेकणार्‍या शेव्हींग क्रिमसारख्या दिसणार्‍या ट्यूब, ओठांवर लावल्यावर थेट मृत्युच्या दारात नेणारे लिपस्टिक अशी अनेक शस्त्रं त्यानी बनवली.

 

(सिडनी गॉटलीब)

या कामाच्या ताणामुळे त्याला १९५३ साली अल्सरचा असह्य त्रास सुरु झाला आणि त्याने नोकरी सोडली. पण अल्सर हे केवळ दाखवण्याचे कारण होते का? अशी शंका येण्यास इथे वाव आहे. कारण नोकरी सोडली, पण थोड्याच दिवसांत तो सीआयएच्या प्रयोगशाळेत काम करायला लागला. रॉबर्ट लॅशब्रुक आणि काळा जादूगार सिडनी गॉटलीब ही जोडी त्याला भेटली ती इथेच!

फ्रँक ओल्सनच्या निवृत्तीने कामात तसा फारसा काही फरक पडला नाही. कँप डेट्रीकमध्येच राहून तो सीआयएची काम करायला लागला. वेगवेगळ्या प्राण्यांवर विषारी वायू आणि वेगवेगळ्या विषांचा काय परिणाम होतो हा त्याच्या अभ्यासाचा मुख्य विषय झाला होता. या पदार्थांचा वापर करण्यात त्याचा सहभाग नसला तरी वेगवेगळ्या देशात, एखाद्या सेफ हाऊसमध्ये अडकवून ठेवलेल्या अनेक कैद्यांना बघायला त्याला जावे लागायचे.

कोण होती ही माणसे? तर ही माणसं सीआयएच्या नजरेतून 'खतम' करण्याच्या लायकीची होती. शत्रू देशाचे गुप्तहेर, गुप्तहेरांचे हस्तक, संपवून टाकायच्या लायकीचे सीआयएचेच हस्तक! सीआयएच्या भाषेत ही सर्व 'एक्स्पेंडेबल' होती. एवीतेवी त्यांना संपवायचेच होते, तर त्यांच्यावर वेगवेगळे प्रयोग करून त्यांना संपवण्यात यायचे. अशा गुप्त छळ चाचणीत कैद्यांचे तडफडून होणारे मृत्यू तो बघत होता. या सर्व दृश्यांनी तो मानसिकरित्या खचून जात होता आणि यावर शेवटची काडी पडली नोव्हेंबर१९५३ मधल्या 'थँक्स गिव्हींग डे' च्या आसपास!

सीआयएच्या एमके अल्ट्रा प्रोजेक्टवर कार्यरत टेक्निकल सर्व्हिस स्टाफ अधिकारी आणि स्पेशल ऑपरेशन डिव्हिजन (केमिकल कॉर्प्स) या लष्कराच्या अखत्यारीतील काही शास्त्रज्ञांसाठी गॉटलीबने दोन दिवसांचा एक खासगी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे निमंत्रण फ्रँक ओल्सनला मिळाले. 'डीप क्रीक लेक' या भागातल्या एका रिसॉर्टमध्ये सगळ्यांनी जमायचे होते. रिसॉर्टची दिशाभूल करण्यासाठी या कार्यक्रमाचे नाव ' कथा पटकथा लिहिणार्‍या लेखकांच्या भेटीगाठी' असे ठेवण्यात आले होते. या विशेष भेटीगाठीचे फ्रँक ओल्सनला आश्चर्यच वाटले. कारण एकत्र भेटणारे सगळेच रोज कामानिमित्त भेटतच होते. दोन वेगवेगळ्या सरकारी संस्थांमध्ये काम करत असले तरी कामाचा उद्देश एकच असल्याने कोणीच अनोळखी नव्हते.

१८ नोव्हेंबर १९५३ : स्पेशल ऑपरेशन डिव्हिजनच्या एका सहकार्‍यासोबत-विन्सेंट रुवेट- सोबत फ्रॅंक ओल्सन डीप क्रीक लेकच्या रिसॉर्टवर पोहचला. दुपारपर्यंत बाकीची मंडळी पण जमा झाली. पुढचे चोवीस तास चर्चा गप्पा खाणेपिणे यातच गेले. दुसर्‍या दिवशी रात्रीच्या जेवणापूर्वी रॉबर्ट लॅशब्रुकने 'काँत्रेयु'ची बाटली उघडली. काँत्रेयु म्हणजे एक प्रकारची सौम्य वाईन. तिला लिक्यूर असेही म्हणतात.

ग्लास भरले गेले, हसत खेळत रिकामेही झाले. पंधरा वीस मिनिटांनी गॉटलिबने विचारले, "कोणाला काही वेगळं वाटतंय का?''

बर्‍याचजणांनी काहीतरी वेगळंच वाटतंय म्हटल्यावर गॉटलीबने जाहीर केले की,"त्यांच्या वाईनमध्ये 'एलएसडी' मिसळण्यात आले आहे." पण हे कळेपर्यंत सगळेच धुंद झाले होते. त्या अवस्थेतही काहीजणांनी "तुम्ही हे जे केलेत ते बरे केले नाहीत" अशी तक्रार केली. पण तोपर्यंत 'एलएसडी'ने त्यांचा ताबा घेतला होता. त्यांचा वास्तवाशी संपर्कच तुटला होता.

फ्रँक ओल्सन या फसवणूकीने भयंकर खवळला होता. अत्यंत अस्वस्थ झाला होता. कारण 'एलएसडी' मेंदूचे काय भजे करते हे त्याच्या अभ्यासाचा विषय होता. आपल्याच वरिष्ठांनी आपली फसवणूक करावी या विचाराने तो संतप्त झाला. पण तोपर्यंत नशेने त्याचा कब्जा घेतला होता. दुसर्‍या दिवशी सकाळी नशेचा अंमल थोडा कमी झाला होता, पण 'आपण फसवले गेलो ' या विचाराने फ्रँक ओल्सन सुन्न होऊन घरी परतला!!

घरी परतल्यावरही फ्रँक आपल्याच विचारात गुंग होता. पत्नी आणि मुलांकडे त्याचे फारसे लक्ष नव्हते. त्याच्या पत्नीच्या हे लक्षात आल्यावर तिने त्याला बोलकं करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो चाचरत एकच वाक्य बोलला, ""मी एक भयंकर चूक केली आहे."

पत्नी: "काय केलंस? सुरक्षिततेचा भंग केलास का"

फ्रँक: "नाही"

पत्नी: "प्रयोगाचे चुकीचे अहवाल दिलेस का?"

फ्रँक: "नाही, पंण मी भयंकर मोठी चूक केली आहे, मुलं झोपल्यावर मी सांगीन."

पण् ती रात्र तशीच गेली. दुसर्‍या दिवशी ताण कमी व्हावा म्हणून दोघं 'मार्टीन ल्यूथर' चित्रपट बघायला गेले. तो चित्रपट निवडण्यातही चूक झाली असावी, कारण त्या चित्रपटाच्या एका संवादात नायक म्हणतो, "I cannot and will not recant anything, for to go against conscience is neither right nor safe. Here I stand, I can do no other, so help me God. Amen."

(मी काहीही बोलू शकत नाही आणि माझ्या बोलण्याविरुध्द जाऊ शकत नाही. कारण विवेकाविरुद्ध जाणे योग्य किंवा सुरक्षित नाही. मी येथे उभा आहे, मी दुसरे काहीही करु शकत नाही, म्हणून देवा मदत कर,आमेन.)

फ्रँक ओल्सन या वाक्याने अधिकच अस्वस्थ झाला आणि दोघंही घरी परत आले. पुढल्या काही दिवसांत जे घडणार होते त्याची ही नांदी होती, हे फक्त फ्रँक ओल्सनलाच माहिती होते.

सबस्क्राईब करा

* indicates required