computer

या रिसॉर्टमध्ये मोबाईलवर बंदी का आहे ? कारण तुम्हाला पण पटेल !!

जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी फिरायला जातो, तेव्हा ती जागा निवडताना आपण अनेक बाजूंचा विचार करतो. ती जागा छान असायला हवी, जिथे चांगल्या प्रकारे सुट्टी घालवता येईल अशी आपली इच्छा असते. पण आपल्यासोबत एक अशी गोष्ट असते जी आपल्याला सुट्टीचा चांगल्या प्रकारे आनंद घेऊ देत नाही. ती गोष्ट म्हणजे आपला स्मार्टफोन! कारण आपण जाऊ तिथले  चांगले फोटो आपल्याला सोशल मीडियावर टाकायचे असतात. आणि या नादात त्या जागेला पूर्ण एन्जॉय करायचे राहून जाते.  सुट्टी मनसोक्त एन्जॉय न करता बराच वेळा, लाईक कमेंट चेक करण्यातच जातो.

त्यात ऑफिसचे इमेल्स, ऍप्सही मोबाईलवरच असतात. त्यामुळं सध्याच्या काळात माणसाच्या तणावाचे सर्वात मोठे कारण मोबाईल आहे राव!! आणि जिथे आपण तणाव घालविण्यासाठी जातो, तिथेसुद्धा तणावाचे कारण सोबत वागवत असू तर कसे चालेल?

या सगळ्यावर टेक्सासमधले मिरावल रिसॉर्ट  एक भन्नाट आयडिया घेऊन आले आहे. तिथे गेल्यावर तुम्हाला तुमचा मोबाईल हॉटेलच्या रूममध्ये सोडून यायचा असतो. बाहेर फिरताना एकदम मोबाईल-फ्री! स्क्रीनफ्री आयुष्य किती चांगले असते हे लोकांना कळावे हा त्यामागे त्यांचा हेतू आहे. पूर्ण सुट्टी मोकळेपणाने साजरा करता यावी आणि मनसोक्त जगणे काय असते याचा शोध घेता यावा याचसाठी त्यांनी हा नियम केला आहे.

फोन नसेल तर पूर्णवेळ करायचं काय? त्यासाठी मिरावल रिसोर्टमध्ये एन्जॉयमेंटसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तिथे तुम्ही योगा करू शकता, स्वयंपाक शिकू शकता, प्राणी रंगवा, तसेच ड्रम वाजवा.. म्हणजे रोजच्या धकाधकीत जे काही तुम्ही करत नाही, ते सगळं करू शकता.  तरंगते मेडिटेशन ही नविन संकल्पनासुद्धा तिथे निर्माण करण्यात आली आहे. छताला टांगलेल्या कापडात स्वतःला गुंडाळून तरंगत राहून चिंतन करणं हा एक भन्नाट अनुभव आहे असे तिथले लोक सांगतात. तसेच तरंगत्या बिछान्यावरही मस्तपैकी बॅकग्राउंड म्युझिक ऐकत ध्यान करता येऊ शकते. 

हे रिसॉर्ट शांतपणे विना मोबाईलचे आयुष्य किती सुंदर आहे हेच दाखवून देत असते. अर्थातच ते तुमचा फोन काढून घेत नाहीत, तर अतिशय चांगल्या शब्दात तुमचा फोन बंद करून बॅगमध्ये किंवा रूमवर ठेवायला सांगतात. तरीही तुम्ही फोन वापरताना दिसलात तर तिथला स्टाफ नम्रपणे तुमचा फोन बंद करायला सांगतो. आणि हो, पुस्तकप्रेमींसाठी तिथे एक मोठे ग्रंथालयसुद्धा आहे. म्हणजे  ई-बुक्ससुद्धा वाचायला नकोत! 

मंडळी, एकंदरित 'वर्तमानात जगणे' या थीमवर त्यांचे रिसोर्ट काम करते. मग, तुम्हांला आवडेल का अशा शांत सुंदर आणि मोबाईल-फ्री ठिकाणी फिरायला जायला? अर्थात भारतात सगळ्याच ठिकाणी अजून मोबाईलचं तितकं स्ट्रॉंग नेटवर्क पोचलं नाहीय, त्यामुळे किमान काही भागांत तर लोकांना मोबाईल-फ्री आयुष्य जगावंच लागतं. हो ना?

सबस्क्राईब करा

* indicates required