computer

जवळजवळ १०० वर्ष जुना चोर बाजार होणार बंद....त्याआधी हा लेख वाचलाच पाहिजे !!

मुंबई म्हणजे एक असा पेटारा आहे की तुम्ही तो उघडल्यावर त्यात अत्यंत अजब गोष्टी सापडतात. पु.ल.देशपांडे यांनी तर म्हटले होते की मुंबई हा माणसे पकडायचा एक पिंजरा आहे. त्यात एकदा माणूस शिरला की तो परत बाहेर जात नाही. अशा या मुंबईत आलेले विदेशी पर्यटक, इथल्या अनेक प्रेक्षणीय स्थळांबरोबरच अनेक विचित्र गोष्टी पाहून थक्क होतात. बेशिस्त माणसे, रस्त्यातच दाणे टाकून पाळलेली हजारो कबुतरे, मोकाट कुत्रे, रस्त्यातून फिरणाऱ्या गायी, भिकारी, अनिर्बंध फेरीवाले, कमालीची अस्वच्छता अशा कित्येक गोष्टींचे त्यांना आश्चर्य वाटते. त्यात आणखी एक सर्वात गंमतीदार गोष्ट म्हणजे मुंबईतील " चोर बाजार " ! इथले व्यापारी पूर्वी आपला माल विकताना खूप मोठयामोठ्याने ओरडत असत म्हणून त्याला " शोर बाजार " म्हणत असत . नंतर त्याचा अपभ्रंश होऊन चोर बाजार हे नाव रूढ झाले, असे म्हटले जाते. पण येथील पूर्वापार व्यापार पाहता आत्ताचेच नाव खरे असावे असे वाटते. 
 

इथे चोरलेल्या वस्तू दिवसाढवळ्या राजरोसपणे कशा काय विकल्या जातात, असा प्रश्न पडलेले विदेशी पर्यटक,येथे हा बाजार पाहायला अनेकदा येतात. फोटो काढतात, खरेदी करतात. दिल्लीमध्ये एका व्यावसायिकाने अगदी या बाजारासारखी सजावट केलेले " चोर बाजार " नावाचे हॉटेल काढले होते. हरयाणातील ऑटोमोबाईल म्युझियममध्ये ऑटो पार्ट्सचा संग्रह, मुंबईच्या चोर बाजारसारखी दुकाने थाटून त्यात मांडला आहे. रिचर्ड बर्टन या अवलियाची पत्नी इझबेल हिने १८७६ साली लिहिलेल्या पुस्तकात "भेंडी बाजार "चा उल्लेख एक आश्चर्यकारक बाजार असा केला आहे.

तर असा हा चोर बाजार, बारा इमाम स्ट्रीट, चिम्ना बुचर स्ट्रीट, मटण स्ट्रीट, खारा टॅंक रोड, बाप्टी रोड, सैफी ज्युबिली स्ट्रीट, मन्सुरी सुलेमान बावन पटेल मार्ग अशा गल्ल्यांमध्ये पसरला आहे. या बाजाराबद्दल कमालीच्या मनोरंजक अशा अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत.

येथे फक्त चोरीचा माल विकला जातो ही एक मोठी दंतकथा आहे. असे जर होत असेल तर मुंबईचे पोलीस हे पाहत बसणे शक्यच नाही. व्हिक्टोरिया राणीच्या सामानातून गायब झालेले तिचे व्हायोलिन इथेच सापडले असे म्हणतात. एकदा एका जगप्रसिद्ध गायिकेच्या इंपोर्टेड कारच्या चाकाची, टायरवर लावलेली स्टीलची कॅप रस्त्यात कुठेतरी पडून गेली, हरवली. तिचा ड्रायव्हर ती कॅप घेण्यासाठी ती गाडी घेऊन इथे आला. इथल्या एका माणसाने त्याला गोडाऊनमधून आणून देतो असे सांगून थांबायला सांगितले. थोड्या वेळाने तो एक ओरिजिनल कॅप घेऊन आला. चाकाला ती कॅप फिट बसल्याने, खुशीत जास्त पैसे मोजूनही तो ड्रायव्हर परतला. घरी आल्यावर तो पाहतो तर त्याच्याच गाडीच्या पलीकडच्या एका चाकाची कॅप काढून ती त्यालाच विकली होती. परंतु एका नव्वदी ओलांडलेल्या बोहरी चाचाने मला सांगितले की असे काही घडलेले नाही. कारण ती गायिका तेव्हांपासूनच इतकी प्रसिद्ध आहे की तिच्या गाडीचा मेक, क्रमांक इथे सर्वांना पाठ होता. आम्ही सर्वजण तिचे चाहते आहोत. इतक्या थोर गायिकेबद्दल इथला कुणीही विक्रेता असे काही करणार नाही. 

अशाच आणखी काही मनोरंजक दंतकथा ! एका प्रसिद्ध पुरातन वस्तू संग्राहकाने येथून अतिशय वेगळ्या प्रकारच्या जुन्या समया खरेदी केल्या. समयांचा अतिशय वेगळा आकार होता. त्या खूप जुन्या असल्याने खूप घासाघीस झाल्यावर सौदा पूर्ण झाला. आपल्या घरी परत गेल्यावर त्या संग्राहकाने साफ काळ्या पडलेल्या त्या समया साफ केल्यावर त्याला कळले की त्या समया चक्क सोन्याच्या होत्या ! ( याची त्या दुकानदारालाही कल्पनाच नव्हती ). लोकांना असेही वाटते की येथे तुमच्या कडील वस्तू कधी मारली जाईल ते कळणारही नाही. येथे तुम्हाला सॉलिड लुटतात. एका संग्राहकाने लॉटमध्ये एकदम ७० / ८० जुन्या फाऊंटन पेन्सचा लॉट स्वस्तात खरेदी केला. नंतर त्याच्या लक्षात आले की त्यातील अनेक पेन्स ही सोन्याची नीब्ज असलेली पार्कर कंपनीची पेन्स होती. अशा अनेक दंतकथा आहेत. पण मुंबईत इतरत्र जेवढा धोका असतो तेवढाच येथे असतो. इथले बहुसंख्य दुकानदार मुस्लिम आहेत. नमाजला किंवा जेवायला जाताना ते आपले दुकान बंद करीत नाहीत. दुकानाच्या दारात एक खुर्ची आडवी ठेवली किंवा मालावर एखादे कापड टाकले की दुकान बंद ! अशा दंतकथा जगभरातील पर्यटकांची या बाजाराबद्दलची उत्सुकता खूप वाढवतो. 
 

म्हणजे मग हा साळसूद व्यापाऱ्यांचा बाजार आहे का ? तर तसेही नाही. पूर्वी येथे चोरीच्या अनेक वस्तू आणून दुकानदारांना आणि नंतर त्या गिऱ्हाईकांना विकल्या जात असत. पण त्या चोराला पुढे कधी पोलिसांनी पकडले की तो या आधी आपण असा माल कुठे कुठे विकला ते दुकानदार तो पोलिसांना दाखवीत असे. मग त्या दुकानदाराच्या मागे कायद्याचे लचांड लागे. त्यामुळे हल्ली बहुतेक दुकानदार अपरिचित विक्रेत्याकडून वस्तू घेत नाहीत. अनेकदा येथे चांगल्या कंपन्यांचा डुप्लिकेट आणि कमी दर्जाचा माल मिळतो. एखादी जुनी वस्तू १०० ते २०० वर्षे जुनी सांगून वाटेल ती किंमत सांगितली जाते. या वस्तू इतक्या जुन्या नसतातच आणि त्यामुळे त्यांची किंमतही अवाजवी असते. रस्त्यावर जे फेरीवाले बसतात त्यांच्याकडे चोरीचा मालही असण्याची खूपच शक्यता असते. देवळांतून चोरलेल्या चपला- बूट, इमारतींतून चोरलेले कपडे, अनेक भुरट्या भंगार वस्तू, घरे - दुकाने फोडणारे शर्विलक त्यांनी चोरलेल्या वस्तू येथे आणून विकतात. येथे विविध मोबाईल फोन रस्त्यात विकायला असतात. कदाचित तेही अशाच तऱ्हेने येथे पोचत असावेत.
 

येथे अनेक प्रकारची दुकाने आहेत. काही दुकानात व्यायामाची साधने, खेळांचे साहित्य, हार्डवेअरचे सामान, हत्यारे इत्यादी वस्तू नवीन आणि स्वस्त मिळतात. पण सर्वसाधारणपणे येथे जुन्या, दुरुस्त केलेल्या, वापरात नसलेल्या वस्तू विकल्या जातात. अनेकदा फारशा प्रसिद्ध नसलेल्या कंपन्यांच्या नवीन वस्तू येथे स्वस्तात मिळतात. येथील रस्त्यात जेव्हा कांही मंडळी घणाचे घाव घालून एखादी कार तोडताना तुम्ही पाहता तेव्हां थक्क होता. भंगारमध्ये विकलेल्या कार्स येथे आणतात. त्यातील उपयुक्त भाग काढून घेतले जातात आणि नंतर त्या काळजीपूर्वक तोडल्या जातात. कांही वेळात या गाडीचे पत्रे एका ट्रकमध्ये भरून नेतात. गाडीचे हॉर्न्स, वायपर्स, दिवे, पंखे, टायर्स, जॅक, कॅरीयर्स, क्रॅशगार्डस् इ. स्वस्तात विकणारी अनेक दुकाने येथे आहेत.

जर तुमची कार जुनी किंवा दुर्मिळ असेल आणि त्याचा सुटा भाग कुठे उपलब्धच नसेल तर या बाजाराशिवाय पर्याय नाही. जुने कपडे बेमालूमपणे दुरुस्त करणारे कारागीर येथे आहेत. दुरुस्तीनंतर हे कपडे त्यावर प्रक्रिया करून, धुवून, इस्त्री करून स्वस्तात विकले जातात. जुन्या सिनेमांची पोस्टर्स विकणारी दुकाने येथे आहेत. जुन्या ग्रामोफोन रेकॉर्ड्स, जुने ( antique ) ग्रामोफोन, टेप रेकॉर्डर्स, रेडियो, अत्यंत दुर्मिळ घड्याळे, कॅमेरे, जुने टेलीफोन्स, ट्रान्झिन्टर्स येथे मिळतात. या गोष्टी जशा दुर्मिळ तसेच याची दुरुस्ती करणारेही दुर्मिळ ! पण या सर्व गोष्टी दुरुस्त करणारे जाणकार येथे अजूनही आहेत. त्यांची दुकाने येथे चांगला धंदा करतात. जुने नक्षीदार दुर्मिळ पण भंगार फर्निचर येथे अप्रतिमपणे दुरुस्त करून पॉलिश करून पुन्हा विक्रीसाठी उपलब्ध असते. हे अँटिक आणि टिकवुडचे फर्निचर कितीही किंमत मोजून घेणारे रसिक येथे येतातच ! या बाजाराचे म्हणून जे खास दुकानदार आहेत त्यांची दोन वैशिष्ठ्ये आहेत. वस्तूचे वेगळेपण, दुर्मिळपण त्यांना खूप चांगले कळते. आणि दुसरे वैशिष्ठ्य म्हणजे कितीही वेळ लागला तरी त्यांना हवी असलेली किंमत मिळेपर्यंत ती वस्तू राखून आणि रोखून ठेवणे ! 
 

जुन्या पितळी किंवा धातूच्या वस्तू, मूर्ती, भांडी इ. विकणारी येथे अनेक दुकाने आहेत. आपल्या घरातील अनेक पिढ्यांनी वापरलेली भांडीकुंडी आपणच किलोच्या भावात विकून टाकतो. या सर्व गोष्टींना बाहेर प्रचंड मागणी आहे. हल्ली नवीन महागडे फ्लॅट्स आणि बंगले, खूप मोठ्या प्रमाणावर जुन्या वस्तूंनी सजविण्यात येतात. विविध स्टार हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, लग्नांचे कॅटरर्स हे अस्सल जुन्या भांडी आणि वस्तूंची सजावट करतात. जुन्या कथानकावरील नाटके, सिनेमा आणि चॅनेल मालिका यांना चित्रीकरणाच्यावेळी अशा जुन्या वस्तू पुरविणारे कंत्राटदार आहेत. त्यांना या वस्तूंची फार गरज असते. विदेशी मंडळी तर आपले मोदकपात्र, हंडे, तांब्ये, जेवण वाढायची भांडी, खानावळीचा जेवणाचा ४ / ५ खणांचा डबा, अडकित्ते, पानाचे डबे, कातणी अशा असंख्य गोष्टी ते विकत घेऊन विदेशात ( कायमचे ) नेतात. इथल्या दुकानदारांची माणसे त्यांच्या त्यांच्या गावाकडील आजूबाजूच्या गावातून फिरून अशा वस्तू स्वस्तात विकत घेऊन इकडे घेऊन येतात. जुन्या घरांच्या खिडक्या, दारे, खुंट्या, खांब, कपाटे, शोभेच्या लाकडी वस्तू, काचेच्या हंड्या - दिवे- आरसे, कड्या, खिडक्यांच्या रंगीत काचा अशा गोष्टींनाही खूप मागणी असते. 
 

अशा जुन्या वस्तू येथे विकणाऱ्या व्यापाऱ्यांना खास दृष्टी असते. कित्येक वस्तू या नक्की काय आहेत हे काही वेळा त्यांना माहिती नसते. पण त्यातील खासियत ते अचूक हेरतात. अनेक सरंजामशाही वस्तू, जुने खेळ, विविध सुटे भाग, कलात्मक वस्तू, पुतळे आणि मूर्ती, जुन्या यंत्रांचे सुटे भाग, जुनी मासिके - पुस्तके, बाटल्या, वाद्ये, पोथ्या, देवांची चित्रे, जुन्या तसबिरी, पेंटिंग्ज, कुलुपे, रेडियोचे व्हॉल्व, पेन्स, दारूच्या आणि सेंटच्या रिकाम्या आकर्षक बाटल्या,अवजारे, जुन्या शोभेच्या वस्तू, बोटींवरील होकायंत्रे - स्टियरिंग व्हील - जीवरक्षक टायर ( buoy or Torpedo Buoy )- घड्याळे - दिवे ....... असे येथे काहीही मिळू शकते. सध्या तर येथे एका ठिकाणी जुन्या काळातील बायोस्कोप ( लहानपणीचा गुढग्यावर वाकून आत चित्रे पाहण्याचा ) विक्रीसाठी आला आहे. हा बाजार म्हणजे, अनेक छांदिष्ट, संग्राहक, जुन्या वस्तूंचे चाहते यांचा मोठा आधार आहे. 

शुक्रवारी या बाजारातील दुकाने बंद असतात. तेव्हा अनेक फेरीवाले रस्त्यावरच जुन्या मालाची दुकाने थाटतात. या बाजाराला जुम्मा बाजार म्हणतात. हा बाजार पहाटे सुरु होतो. बंद दुकानांच्या बाहेरच हा माल लावला जातो. कित्येकदा नियमित दुकानदार या लोकांकडून अनेक वस्तू स्वस्तात विकत घेतात आणि नंतर त्या वस्तू आपल्या दुकानातून दामदुप्पट किंमतीला विकतात. या फेरीवाल्यांनाही जुन्या वस्तूंची चांगली पारख असते. रमझान महिन्यात शेवटच्या शुक्रवारी मुस्लिम धर्मीय मंडळी बडा नमाज पढतात. " बूत " म्हणजे पुतळे किंवा मूर्ती हे इस्लामला मंजूर नाहीत. म्हणून मग हे सर्व विक्रेते या दिवशी त्यांच्याकडील सर्व पुतळे आणि मूर्ती, कापडाने झाकून ठेवतात.

गेली ५० वर्षे मी हा बाजार पहातो आहे. तेव्हा येथे ४ आण्यांना १ कवडी म्हणत असत. त्यामुळे छोट्या वस्तूंचा भाव, २ कवडी, ४ कवडी असा सांगितला जात असे. येथे ३ पिढ्या मी पाहिल्या. त्यांची भाषा शिकलो. खरेदी- विक्रीचे बारकावे शिकलो. जुन्या वस्तू ओळखायला शिकलो. आता जुन्या आणि दुर्मिळ वस्तूंचा ओघ आटत चालला आहे. शुक्रवारी तर हा बाजार म्हणजे कपडा बाजारच होत चालला आहे. तरीही येथे एक वेगळीच संस्कृती नांदत होती. येथे अनेक मशिदी, दर्गे आहेत. रस्त्यावरच नमाज पढला जातो. येथे १२५ वर्षे जुने लक्ष्मी नारायणाचे एकमेव मंदिर आहे. 

आता येथील फार मोठा भाग, बोहरी मुस्लिम समाजाच्या ट्रस्टने विकत घेतला आहे. या समाजातील बहुसंख्य मंडळी व्यापारात आहेत. महिला पुरुष उच्च शिक्षित आहेत. ट्रस्टकडे प्रचंड पैसा आहे. २० / २५ जुन्या इमारती पाडून येथे प्रचंड मोठे टॉवर उभे राहिले आहेत. आता पुन्हा पुढच्या टप्प्यात सुमारे २५ जुन्या इमारती वेगाने पाडल्या जात आहेत. तेथेही टोलेजंग टॉवर्स बांधले जाणार आहेत. पाडल्या जाणाऱ्या इमारती आणि त्यामागे उभे राहिलेले प्रचंड टॉवर्स, हे इथले सध्याचे चित्र आहे. जवळपास अर्धाअधिक बाजार संपला आहे. हळूहळू उरलेला चोर बाजार नाहीसा होईल. काही शे वर्षांचे हे गौडबंगाल नष्ट होईल. एक अनामिक हुरहूर आहे .... 

"जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळुनी किंवा पुरुनी टाका, सडत न एक्या ठायी ठाका, सावध ऎका पुढल्या हाका" असे केशवसुत म्हणाले असले तरीही कुठलेही मरण हे आनंददायी नसतेच. 
 

 

लेखक : मकरंद करंदीकर 

सबस्क्राईब करा

* indicates required