ह्या इजिप्शियन ममीची जीभ सोन्याची आहे? पुरातत्वशास्त्रज्ञ काय म्हणतायत पाहा !!
प्राचीन इजिप्शियन लोकांचा पुनर्जन्मावर विश्वास होता. राजा, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती किंवा एखाद्या श्रीमंत व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे मृत्यूनंतरचे आयुष्य देखील सुखात आणि वैभवात असावे ह्या गोष्टींची तेव्हा काळजी घेतली जायची. हे मोठ मोठे पिरॅमिड्स देखील त्याचसाठी बांधलेले होते. ह्या पिरॅमिड्मध्ये त्या राजाची ममी (शव) सोन्याच्या पेटीत ठेवली जायची. त्या पेटीमध्ये राजाच्या आवडत्या वस्तू, सोने, नाणे ठेवले जायचे. राजाच्या ममी सोबत राजाच्या नोकरांच्या ममी देखील सापडल्या होत्या. पुरातत्व खात्याच्या अंदाजानुसार मरणानंतरच्या आयुष्यात देखील राजाच्या आसपास त्याचे सेवक असावेत म्हणून त्यांच्या सेवकांच्या ममीज सापडल्या होत्या.
तर इतकी मोठी गोष्ट सांगण्याचा हेतू हा आहे की ताएसियार मॅग्ना ह्या इजिप्तमधील ऐतिहासिक जागेवर पुरातत्त्व खात्यातील शास्त्रज्ञांनी पुन्हा उत्खनन केले. ही जागा २००० वर्षांपूर्वी दफनभूमी म्हणून वापारली जायची. ताओसियार मॅग्ना हे शहर साधारण इसविसनपूर्व २८०-२७ या काळातील असावे. हे संशोधन सॅंटो डोमिंगो ह्या विद्यापीठाच्या पुढाकारातून सुरू करण्यात आले होते.
आता ह्याच जागी शास्त्रज्ञांनी एक ममी शोधून काढली आहे. आणि मुख्य आणि आजवर सापडलेल्या ममी पेक्षा वेगळी गोष्ट म्हणजे ह्या ममीची जीभ ही सोन्याची आहे.
ह्या ममी सोबत अजून १५ ममीज देखील शास्त्रज्ञांना सापडल्या आहेत. त्यापैकी २ ममीजवर संशोधन सुरू केले आहे. ह्या व्यतिरिक्त संशोधकांना आणखी एका ममीमध्ये सोन्याचा थर आढळून आला आहे.
आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की ह्या ममीची जीभ सोन्याची का आहे?
त्याच काय आहे ना, प्राचीन इजिप्तचे लोक त्यांच्या राजालाच देव मानत. राजाच्या तोंडून निघालेला शब्द थेट विधात्याच्या तोंडून निघालेला शब्द असतो अशी त्या काळातील लोकांची निष्ठा होती. म्हणुनच राजाच्या मृत्यूनंतर त्याची खरी जीभ काढून ही सोन्याची जीभ ममी मध्ये ठेवली असावी असा अंदाज बांधला जातोय.
सप्टेंबर २०२० मध्ये देखील इजिप्तमध्ये जवळपास २५०० वर्षांपूर्वीच्या एकूण १३ ममीज सापडल्या होत्या. ह्या शोधानंतर काही दिवसातच पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी लाईव्ह येऊन त्यापैकी एका ममीची पेटी उघडली होती. दफन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कापडात ती ममी ठेवण्यात आली होती. ह्या ममीच्या चेहऱ्यावर काही प्रमाणात सजावटदेखील केलेली आढळते. त्या काळातील जे धर्मगुरू होते त्यांची ती कबर होती.
इजिप्तच्या पुरातत्व मंत्रालयाने केलेल्या विधानानुसार आजवर ह्या ममीज कधीही उघडल्या गेल्या नव्हत्या. मागील २५०० वर्षात प्रथमच ह्या ममीजच्या पेट्या उघडले गेले होते.
इतका समृध्द, प्राचीन आणि मुख्य म्हणजे वैभवशाली इतिहास लाभलेले इजिप्त नेहमीच चर्चेत असते ते तेथील पिरॅमिड्स आणि ममीज च्या आकर्षणामुळे. हे वैभव आणि प्राचीन इतिहासाचा वारसा पाहण्यासाठी आयुष्यात एकदा तरी इजिप्तला गेलंच पाहिजे. काय म्हणताय?
लेखिका: स्नेहल बंडगर




