डिस्नेबद्दल ठाऊक नसलेल्या १० अफलातून गोष्टी !!

मिकी माउस, डोनाल्ड डक, डॉग फ्लूटा, गुफी, यासारख्या प्रसिद्ध कार्टून्सना जन्म देणारे वॉल्ट डिस्ने आणि त्यांच्या डिस्ने कंपनीने खूप मोठी प्रगती केली आहे. डिस्नेने मनोरंजन क्षेत्रात स्वतःचे वेगळे विश्व निर्माण केले आणि विशेष म्हणजे गेल्या नऊ दशकाहून अधिक काळ ते जपले आहे. डिस्ने म्हणजे फक्त कार्टून एवढीच मर्यादित ओळख पुसून, आज डिस्नेने मनोरंजनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला आहे. वॉल्ट डिस्नेच्या यशाबद्दल तर सर्वांनाच माहिती आहे, पण डिस्ने विषयी कदाचित या दहा गोष्टी तुम्ही कधी वाचल्या नसतील.
१. दाढी आणि केस

१९६०च्या दशकात हिप्पी चळवळीचा खूप प्रभाव होता. ज्याची दाढी आणि केस वाढलेले असतील त्याला सहजच कोणीही हिप्पी संबोधत असे इतका याचा प्रभाव होता. अशा चळवळीशी आपल्या कंपनीचा कुठल्याही प्रकारे संबंध जोडला जाऊ नये म्हणून डिस्ने कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना दाढी मिशी काढण्याची सक्ती केली होती. चेहऱ्यावर कुठेही केस दिसता कामा नये, असा या कंपनीचा नियम होता.
कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना हा नियम लागू होता. जर एखाद्या कर्मचाऱ्याने दाढी आणि मिशी व्यवस्थित कट केली नसेल तर सरळ सरळ त्याला कंपनीतून नारळ मिळत असे. त्यामुळे जॉब जर टिकवायचा असेल तर अगदी दाढी मिशी नीट काढलेली असलीच पाहिजे. सुमारे ५० च्या दशकापासून हा नियम लागू करण्यात आला होता आणि तो काटेकोरपणे अंमलात आणला जात होता. २००० मध्ये यात थोडी शिथिलता आणली. मिशी ठेवली तरी ती नीट कोरलेली असावी असा नवा नियम आणला गेला.
२. ऑस्कर विजेता.
ऑस्कर आणि वॉल्ट डिस्ने यांचे नाते तर खूपच जवळचे आहे. या कंपनीला आजवर २०० पेक्षा जास्त नामांकने मिळाली आहेत. शिवाय, त्यांना ५० वेळा तरी पुरस्कार मिळाला आहे. हे सगळे पुरस्कार डिस्ने कंपनी अंतर्गत केलेल्या चित्रपटांसाठीच आहेत. पिक्सारसाठी डिस्नेनी जे काम केले त्याचे पुरस्कार वेगळेच. खुद्द वॉल्ट डिस्ने यांनाच कितीदा तरी त्यांच्या कामासाठी नामांकन आणि पुरस्कार मिळाले आहेत.
३. इतर कर्मचाऱ्याशी असलेले नाते
डिस्ने कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे एकमेकांशी असलेले नाते आणि व्यवहार कसा असावा याबाबत या कंपनीचे नियमही खूपच कडक आहेत. कोणत्याही विरुद्ध लिंगी कर्मचाऱ्याशी डेटिंग करायचे नाही आणि फ्लर्ट तर बिलकुल नाही. अगदी ग्राहकांकडून अशा फ्लर्टी प्रतिक्रिया जेव्हा येतात तेव्हा त्यालाही कंपनी खूप भाव देत नाही. सरळ सरळ दुर्लक्ष केले जाते. कंपनीतील प्रत्येक व्यक्तीने व्यावहारिक वर्तन ठेवले पाहिजे, असे डिस्ने यांचे मत होते आणि ते याबाबत खूपच आग्रही असत. एका माजी कर्मचाऱ्याने सांगितल्याप्रमाणे त्याचा आणि त्याच्या ऑफिस गर्लफ्रेंडचा किस्स करतानाचा फोटो लिक झाल्यानंतर त्याला कामावरून कमी केले होते. आधी त्याने डिस्नेचे काम सोडले आणि मग आपल्या प्रेयसीशी लग्न केले. प्रेमासाठी माणूस शेवटी काहीही करू शकतो.
४. ट्रेडमार्कचे रक्षण
डिस्ने कंपनी उभारण्यासाठी सुरुवातीला अनेक लोकांनी मेहनत घेतली आहे. घाम गाळला आहे. आपल्या कष्टाने मिळवलेली प्रसिद्धी जर इतर कुणी वापरत असेल तर डिस्नेला ते अजिबात परवडत नाही. आपल्या ट्रेडमार्कच्या वापराबद्दल ते खूपच जागरूक असतात. एकदा फ्लोरिडा केअर सेंटरमध्ये एक पार्टी आयोजित करण्यात आली होती आणि या पार्टीसाठी त्या यजमानांनी डिस्नेच्या पात्रांची वेशभूषा जाहिरातीसाठी वापरली. त्यांच्या वर लगेचच दावा ठोकण्यात आला आणि त्यांना एक कोटींचा भुर्दंड भरावा लागला होता. शेवटी व्यवसाय आहे, इथे मैत्री, नाते आणि इतर भावनिक व्यवहार आड आणून अजिबात चालत नाही. हेच खरे.
५. डिस्ने व्हॉल्ट
डिस्नेने आजवर जेवढे चित्रपट केले आहेत ते सगळे या डिस्ने व्हॉल्ट मध्ये संग्रहित करून ठेवण्यात आले आहेत. डिस्नेचे चित्रपट खूपच गाजले आहेत. नव्या प्रेक्षकांनाही डिस्नेच्या जुन्या चित्रपटांचा आनंद लुटता यावा म्हणून ते या व्हॉल्टमध्ये वारंवार जुने चित्रपट प्रदर्शित करतात. यातून त्यांना चित्रपट पुन्हा प्रदर्शित करता येतात आणि जास्त पैसे कमवता येतात, हा तर फायदा आहेच, पण डिस्नेचे चित्रपट कधीच जुने होत नाहीत. त्यांचे चित्रपट आजच्या प्रेक्षकांनाही चांगलेच भावतात.
६. डिस्नेचा पहिला साउंडट्रॅक
लाकडी बाहुला आणि त्यासोबत मागे वाजणारा डिस्नेचा साउंड ट्रॅक आजही लोकांच्या लक्षात आहे. त्यांच्या पहिल्या-वहिल्या साउंड ट्रॅकमधून त्यांना भरपूर मोठा फायदा झाला होता. चित्रपट आणि त्याचे संगीतही विकले जात होते. चित्रपटाच्या क्षेत्रात तर एक नवी लाटच डिस्नेने निर्माण केली. तेव्हा पासून डिस्नेने आपल्या प्रत्येक चित्रपटाच्या साउंड ट्रॅकसाठीही भरपूर मेहनत घेतं.
७. डिस्नेचे साम्राज्य
डिस्ने ही फक्त एक कंपनी नाही. तर हे एका मनोरंजन साम्राज्याचे नाव आहे. वॉल्ट डिस्ने हे या भल्या मोठ्या साम्राज्याचे राजे.. फ्लोरिडा मधील डिस्ने वर्ल्डची भुरळ तर प्रत्येकाला पडते. अमेरिकत गेलेला कोणताही पर्यटक या डिस्ने वर्ल्डला भेट दिल्याशिवाय राहणार नाही. हा डिस्ने वर्ल्डचा परिसर इतका मोठा आहे की, यात एक अख्खं शहर वसवता येईल. या रिसोर्टमध्ये फक्त एक चक्कर जरी टाकायची म्हटले तरी, एक अखंड दिवसही पुरत नाही.
८. मिकी माउसचे कान
डिस्ने लँड मध्ये प्रत्येक ठिकाणी मिकी माउसच्या कानाची प्रतिकृती बनवलेली आहे, पण ती तुम्हाला चटकन ओळखता येणार नाही. कारण, मिकी माउसचे हे कान इतक्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीने इथे लपलेत की त्यांना शोधणे खूपच कठीण आहे. एखाद्या पेंटिंग मध्ये, किंवा शिल्पामध्ये, अगदी कशातही हे कान लपून बसलेले दिसतील. डिस्नेची हीच खरी खासियत आहे. या संपूर्ण डिस्ने वर्ल्डमध्ये असे किती बरे कान असतील?
९. वॉल्टर डिस्नेचे घर
वॉल्ट डिस्ने यांना डिस्नेलँड खूप आवडते. एका कार्टून पासून सुरु झालेला हा प्रवास डिस्ने वर्ल्ड पर्यंत आला आहे, त्याच्याही पुढे गेला आहे खरे तर. डिस्ने वर्ल्ड पासून वाल्टर डिस्ने दूर राहू शकत नाहीत. म्हणून त्यांनी या डिस्ने वर्ल्डमध्येच एक अपार्टमेंट उभारले आहे. गंमत म्हणजे हे अपार्टमेंट भुयारात उभारले आहे. वाल्टर डिस्ने यांच्या कॅलिफोर्नियातील घरापासून हे अपार्टमेंट एका तासाच्या अंतरावर आहे. आज वाल्टर डिस्ने हयात नाहीत तरी कंपनीने हे अपार्टमेंट अजूनही तितक्याच प्रेमाने जपले आहे जितके डिस्ने स्वतः याला जपत असत. त्यांच्या स्मृतीसाठी या अपार्टमेंट मधील लाईट्स नेहमीच सुरु असतात.
१०. राईड्स
डिस्ने वर्ल्डमध्ये थरार, मस्ती, मजा या सगळ्यांचा अनुभव घेता येतो. परंतु बऱ्याचदा इथे राईड करायला आलेल्या पर्यटकांचा मृत्यूही ओढवलेला आहे. खरे तर सेफ्टी गाईडने सांगितलेले नियम पाळले तर इथे खरोखरच आनंद मिळेल. पण काही लोक सेफ्टी गाईडच्या सूचनांकडे नीट लक्ष देत नाहीत किंवा त्या गांभीर्याने घेत नाहीत. म्हणून तुम्ही जर डिस्ने वर्ल्डला भेट दिलीच तर आधी तिथल्या सेफ्टी गाईडने दिलेल्या सूचना नीट ऐका आणि त्या तंतोतंत पाळा. शेवटी डिस्ने वर्ल्डची निर्मितीच आनंदाची लयलूट करण्यासाठी झाली आहे. तेव्हा थोड्याशा हलगर्जीपणाने त्यांच्या या सुंदर उद्देशाला गालबोट लागणार नाही याची काळजी घेणे ही पर्यटक म्हणून आपलीही जबाबदारी आहे.
डिस्नेसोबतच्या आनंदाची लयलूट अशीच वाढती राहो, हीच अपेक्षा!
लेखिका: मेघश्री श्रेष्ठी