computer

या घ्या कैरीच्या पदार्थांच्या साध्यासोप्या सहा चटपटीत पाककृती.. तोंडाला एकदम पाणी सुटेल..

कैरी म्हटलं की कसं तोंडाला पाणी सुटतं ना? मधल्या सुट्टीत शाळेबाहेर विकायला आलेल्या कैर्‍या तर आठवतातच, पण एखाद्या झाडावरून पाडून खाल्लेल्याही आठवतात. नुसत्या कैर्‍या खाण्यापेक्षा आज आम्ही घेऊन आलो आहोत कैर्‍यांचे सहा चटपटीत पदार्थांच्या साध्यासोप्या आणि सहज पाककृती.. 

१.  आंबेडाळ:

चैत्र म्हटलं की कोवळ्या पालवीसोबतच आठवते ती आंबेडाळ आणि पन्हं.

साहित्य: एक वाटी हरभरा डाळ, एक कैरी, दोन हिरव्या मिरच्या, एक चहाचा चमचा साखर, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरे, चवीपुरतं मीठ

फोडणीसाठी : दोन टेबलस्पून तेल,चिमूटभर मोहरी, अर्धा चहाचा चमचा हिंग, दोन-तीन फोडणीच्या लाल मिरच्या , हळद

कृती: वाटीभर हरभरा डाळ दोन-तीन तास भिजत घाला. हरभरा डाळ जास्त वेळ भिजली की पिठूळ बनते आणि हाताशी वेळ कमी आहे म्हणून गरम पाण्यात भिजवली की तिची चव जाते. त्यामुळं दोनेक तास हाताशी असल्याशिवाय या पाकृच्या वाटेला जाऊ नये.

१. एक मध्यम आकाराची कैरी किसून घ्या. कैरीचा आंबटपणाही किंचित चाखून पाहा. त्यानुसार पाककृतीमध्ये कैरी कमी किंवा अधिक घालता येईल. आंबटपणा कमी करण्यासाठी साखरेचं प्रमाण खूप वाढवू नका, चव बदलते.

२. मिक्सरच्या भांड्यात जिरं, मिरच्या, कोथिंबीर आणि मीठ घालून एकदा फिरवून घ्या.

३. त्याच मिश्रणात पाणी पूर्णपणे निथळलेली डाळ घालून अर्धबोबडी वाटून घ्या.

४. वाटलेलं मिश्रण एका वाडग्यात काढून घ्या. त्या मिश्रणातच आंबटपणानुसार किसलेली कैरी आणि साखर मिसळून नीट कालवून घ्या.

६. फोडणीच्या कढईत तेल तापवून घ्या. तेल तापल्यानंतर मोहरी घाला. मोहरी चांगली तडतडायला हवी. त्यानंतर हिंग, लाल मिरच्या आणि हळद घाला. या पदार्थात हिंग नेहमीच्या प्रमाणाहून थोडा जास्तच घालायचा असतो.

फोडणी थंड झाल्यानंतर कैरी-डाळीच्या मिश्रणावर ओता. व्यवस्थित कालवून खायला घ्या. काहीजण आंबाडाळीत थोडं ओलं खोबरेदेखील किसून घालतात.

 

२. पन्हं

साहित्य: दोन कैर्‍या, गूळ किंवा साखर , चिमूटभर वेलची पूड, जिरेपूड (ऐच्छिक), चवीपुरतं मीठ

कृती:- पन्ह्यासाठी कैर्‍या निवडणं ही कला आहे. कोवळ्या कैर्‍या टाळाच. खोबरी/शेपू इत्यादी वास असलेल्या टाळून छान कोय धरलेल्या निवडून घ्या.

१. कैर्‍या सालासह किंवा साल काढून कुकरमधून उकडून घ्या.

२. थंड झाल्यावर सालापासून उकडलेला गर वेगळा करून घ्या. पन्हं माफक गोड आवडत असेल तर कैरीचा गर आणि साखर/गुळाचं प्रमाण ४:३ म्हणजेच एक वाटी गरास पाऊण वाटी साखर/गूळ असं घ्या. गोड आवडत असेल तर १:१ प्रमाण घ्यायला हरकत नाही.

३. मिक्सरच्या भांड्यात कैरी-गूळ/साखर, वेलची , जिरेपूड हे सगळं घालून छान एकजीव करून घ्या. गरज वाटल्यास नंतर अर्धी वाटी पाणी घालून एकजिनसी घट्ट द्राव बनवून घ्या.

हे मिश्रण फ्रीजमध्ये चांगलं टिकतं. प्यायला घेताना आवडीनुसार पाणी घालून प्यायला घ्या.

चित्रस्त्रोत

 

 

३. तक्कू:

साहित्य: एक कैरी, दोन मध्यम आकाराचे कांदे, लाल तिखट, मीठ, साखर किंवा गूळ

फोडणीसाठी: दोन चमचे तेल,अर्धा चहाचा चमचा मेथ्या, तितकी मोहरी, दोन चिमूट हिंग

कृती:

१. कैरी आणि कांदे दोन्ही किसून घ्या.

२. या किसलेल्या मिश्रणात चवीप्रमाणं मीठ, साखर/बारीक चिरलेला गूळ आणि लाल तिखट घाला आणि नीट कालवून घ्या.

३. कालवता कालवता चव घेऊन पाहा. आपापल्या वकुबाप्रमाणे ’स्स..’ करायला लावणारी पण आणखी खायची इच्छा होईल इतपत आंबट-गोड-तिखट चव जमायला हवी.

४. नंतर फोडणीच्या भांड्यात तेल तापवून मोहरी तडतडवून घ्या. मग मेथ्या खरपूस तळा. मेथ्या लालसर होऊ लागल्या की हिंग घाला. फोडणी थंड झाल्यानंतर कैरी-कांद्याच्या मिश्रणावर ओता.

माणसांच्या तावडीतून वाचल्यास हा तक्कू फ्रीजमध्ये दोन-चार दिवस टिकतो.

 

 

४. मेथांबा-कायरस

साहित्य: एक कैरी, गूळ, लाल तिखट, मीठ, जिरेपूड, एक ते दीड चमचा हळद.

फोडणीसाठी: दोन चमचे तेल,अर्धा चहाचा चमचा मेथ्या, तितकी मोहरी, दोन चिमूट हिंग

कृती:

१. कैरीचे कशाही आकाराचे थोडेसे पातळ काप करा.

२. गूळ किसून घ्या. गुळाचं प्रमाण कैरीच्या दुप्पट असायला हवं.  

३. जाड बुडाच्या कढईत कैरीला एक वाफ येऊ द्या. मग त्यात किसलेला गूळ, लाल तिखट, जिरेपूड आणि हळद घाला.  मिश्रण चांगलं शिजू द्या. 

४. नंतर फोडणीच्या भांड्यात तेल तापवून मोहरी-जिरे तडतडवून घ्या. मग मेथ्या खरपूस तळा. मेथ्या लालसर होऊ लागल्या की हिंग घाला. फोडणी थंड झाल्यानंतर शिजलेल्या मिश्रणावर ओता.

माणसांच्या तावडीतून वाचल्यास हेही मिश्रण फ्रीजमध्ये बरेच दिवस टिकतं.

या पाककृतीमध्ये कैरी-गूळ शिजवताना लागेल तसं पाणी घातलं की झाला कायरस!!

 

 

५. कच्च्या कैरीचं झटपट लोणचं

साहित्य: कैर्‍या हव्या तितक्या. एका कैरीनेसुद्धा काम भागेल., मीठ. लाल तिखट, मोहरीपूड

फोडणीसाठी: एक-दोन चमचे तेल, मोहरी (फोडणी घातलीच पाहिजे असा नियम नाही)

कृती:

१. कैरीचे चौकोनी तुकडे करून घ्या. त्यात मीठ आणि तिखट घाला आणि नीट कालवून घ्या. कालवता कालवता चव घेऊन पाहा. आपापल्या वकुबाप्रमाणे ’स्स..’ करायला लावणारी पण आणखी खायची इच्छा होईल इतपत आंबट-तिखट चव जमायला हवी.

२. हवी तर आता मोहरीची पूड घाला. नसल्यास वरून थंडफोडणी ओता.

मोहरीची पूड किंवा फोडणी दोन्हीपैकी एकच गोष्ट करा. अगदी दोन्हीही पायर्‍या गाळल्या तरीसुद्धा चालेल. हे लोणचं फ्रीजमध्ये दोन-तीन दिवस टिकतं. मीठामुळं लोणच्याला पाणी सुटतं पण ते ही स्वादिष्ट लागतं.

 

६. लौंजी

साहित्य: एक मध्यम आकाराची कैरी, एक चमचा बडीशेप, कलौंजी(कांद्याचे बी, वाण्याकडं मिळतं), अर्धा चमचा मेथ्या, दोन चहाचे चमचे धणेपूड, एक चहाचा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, चार चमचे साखर, दोन चमचे तेल, चवीपुरते मीठ

कृती:

१. कैरीचे चौकोनी तुकडे करून घ्या.

२. कढईत तेल तापवा. त्यानंतर तेलात मेथ्या, बडीशेप, कलौंजी चांगली तडतडवून घ्या आणि कैरीचे तुकडे घालून पटापट परतून घ्या.

३. दोनेक मिनिटांनंतर लाल तिखट, धणेपूड, साखर आणि मीठ घालून एक हलकीशी वाफ द्या. त्यानंतर अर्धीवाटी पाणी घालून साखर विरघळेपर्यंत हलवत रहा.

थंड करून फ्रीजमध्ये ठेवा.

चित्रस्त्रोत

 

सबस्क्राईब करा

* indicates required