computer

पास व्हायचं असेल तर १० झाडे लावा....कोणी केलाय हा अजब कायदा ??

मंडळी, आपल्याला शाळेत पर्यावरण विषय होता, पण या विषयाकडे कोणीच तेवढं गंभीरपणे पाहायचं नाही. सटरफटर विषयांमध्ये तो मोडायचा. या विषयासाठी मार्कं पण ठरलेले असायचे. त्यामुळे टेन्शन नव्हतं. फिलिपाईन्स देशाने मात्र हा विषय फार गंभीर घेतला आहे. त्यांनी एक नवीन कायदाच आणला आहे. चला जाणून घेऊया.

काय आहे हा नवीन कायदा ?

मंडळी, फिलिपाईन्स देशाने असा कायदा केला आहे, की शाळा आणि कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना जर पदवी मिळवायची असेल तर १० झाडे लावावीच लागतील. यामागे दूरदृष्टी आहे राव. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आणि जागतिक तापमान वाढ लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. याखेरीज पर्यावरण संवर्धनाचं महत्व पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणं हा महत्वाचा हेतू आहे.

फिलिपाईन्समध्ये सध्या १.२ कोटी मुलं प्राथमिक शिक्षण पूर्ण करणार आहेत, तर ५० लाख मुलं माध्यमिक शाळेत आहेत. साधारण ५ लाख मुलं दरवर्षी पदवीधर होतात. ही माहिती लक्षात घेता कायद्याप्रमाणे वागलं तर तब्बल १७.५ कोटी झाडे लावली जातील. एका संपूर्ण पिढीचा हिशोब मांडला तर ५२,५०० कोटी इतकी झाडे लावून होतील.

मंडळी, आता तुम्ही म्हणाल की या तर शेखचिल्लीच्या गोष्टी, या गोष्टी कल्पनेतच होऊ शकतात. यावरही फिलिपाईन्सच्या लोकांनी विचार केला आहे. त्यांच्यामते किती झाडे जगतील याचा जर वैज्ञानिक विचार केला तरी तब्बल ५२.५ कोटी झाडे पुढच्या पिढ्यांच्या कामी येतील. राव, हेही नसे थोडके.

झाडे कुठे लावली जातील?

झाडांचा हिशोब झाला, पण एवढी झाडे लावणार कुठे ? ही झाडे वन्य भागांमध्ये, ठराविक शहरी भागात, संरक्षित क्षेत्रात, पाणथळ प्रदेशात, लष्कराच्या सरावाच्या ठिकाणी आणि बंद पडलेल्या खाणींच्या भागात लावली जातील.

मंडळी, यासाठी झाडांची निवड पण लक्षपूर्वक करण्यात आली आहेत. वरती दिलेल्या ठिकाणांना लक्षात घेऊन त्याप्रमाणे झाडे लावण्यात येतील.

बोभाटा पब्लिक, कोणाकोणाला वाटतं हा कायदा आपल्या देशात पण व्हायला हवा !

सबस्क्राईब करा

* indicates required