भारतीय पोलिसांची खाकी वर्दी जाऊन नवा युनिफॉर्म येतोय?

राव सुरक्षेचा प्रश्न आला की आपल्याला लगेच आठवतात ते पोलीस.  पण सर्वात आधी आठवते  ती त्यांची खाकी वर्दी. पोलिसांची वर्दी ही त्यांची सर्वात मोठी ओळख. पण आता यापुढे ही  वर्दी कदाचित तुम्ही म्युझियममध्ये आणि जुन्या सिनेमांमध्येच  बघाल, कारण एका महत्वपूर्ण निर्णयानुसार राज्य, केंद्रशासित प्रदेशातील पोलिसांची खाकी वर्दीची जागा आता नवी कोरी करकरीत वर्दी घेणार आहे. 

असं आहे राव, की इंग्रजांच्या काळात पोलिसांसाठी  जे युनिफॉर्म तयार करण्यात आले होते, तेच  आजही वापरले जातात . यात समस्या अशी आहे की या वर्दीचं कापड फारच जाड असतं. त्यामुळं उन्हाळ्यात पोलिसांना काम करणं फार कठीण जातं. त्याच बरोबर चामड्याचे बूट आणि जाडजूड टोपी देखील बाळगणं कठीण असतं.  त्याहूनही  मुख्य बाब अशी आहे की देशात पोलिसांच्या वर्दीत समानता नाही, दिल्ली, राजस्थान किंवा तामिळनाडू अशा वेगवेगळ्या ठिकाणचे पोलिसांचे पोषाख थोडे वेगवेगळे आहेत.  या सर्वगोष्टी लक्षात घेता एकंदरीत पोलिसांचं संपूर्ण मेकओव्हर कारण्याचं ठरवलं गेलं आहे.

शर्ट, पँट, पट्टा, टोपी आणि जॅकेट, तसंच रेनकोट आणि हेडगिअरचंसुद्धा नवीन डिझाईन तयार करण्यात येणार आहे.  डिझाईनचं महत्वपूर्ण काम अहमदाबादमधल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन या संस्थेकडे सोपवण्यात आले आहे आणि ब्युरो ऑफ रिसर्च अँड डिवेलपमेंटच्या मदतीने नव्या वर्दीचे ९ नमुने तयार सुद्धा करण्यात आलेत. हे नमुने सर्व राज्यातल्या पोलिसांना पाठवण्यात आले आहेत. आता या ९ मधून एकाची निवड केली जाणार आहे. 

[हा आहे त्या युनिफॉर्मच्या नऊ पर्यायांपैकी एक..]  स्रोत

मंडळी, फक्त पोलिसांच्याच वर्दीत बदल होणार नसून निमलष्करी दलासाठी देखील याच प्रकारचे नवे युनिफॉर्म तयार करण्यात येणार आहेत.

नव्या युनिफॉर्मची खासियत म्हणजे सर्व हवामानात घालण्यायोग्य हा पेहराव असणार आहे.  त्यामुळे ज्या अडचणी आता येतात त्या पुढे येणार नाहीत.  एकंदरीत काय तर, आपले पोलीस आता  'फुल टू डॅशिंग' अवतारात दिसतील राव!!!

सबस्क्राईब करा

* indicates required