computer

राजा रविवर्मांचा अद्भुत कलाविष्कार !!

संपूर्ण भारतीय चित्रशैलीचे सुप्रसिद्ध चित्रकार ‘राजा रविवर्मा’ यांची आज पुण्यतिथी आहे. ‘राजवाडा पेंटिंग’ या शैलीने ओळखली जाणारी त्यांची चित्रे कालातीत आणि अजरामर आहेत. कलेच्या इतिहासात राजा रविवर्मा यांच्या तोडीचा कालकार अजूनही तयार झालेला नाही. त्यांच्या नंतर बऱ्याच चित्रकारांनी त्यांची शैली वापरण्याचा प्रयत्न केला. (महाराष्ट्रात मूळगावकरांची चित्रे रविवर्मांच्या जवळ जाणारी आहेत. आपल्याकडे लक्ष्मी पूजनासाठी वापरले जाणारे लक्ष्मीचे चित्र हे मूळगावकरांचेच आहे.)

स्रोत

भारतीय पुराणातील, महाभारत रामायणातील, अनेक प्रसंग रविवर्मांच्या चित्रांमधून घरोघरी पोहोचले. यापैकी काही अमर चित्रे आज आपण बघूयात !!

१. शंतनू आणि सत्यवती !

सत्यवती कोळीण आणि शंतनू राजा यांच्या प्रेम कथेचे हे चित्रण आहे. महाभारताची सुरुवात खरे म्हणजे इथूनच होते. या प्रेम कहाणीचा पुढचा भाग म्हणजे महाभारत.

२. अर्जुन आणि सुभद्रा

या चित्रातील अर्जुन सुभद्रेचा अनुनय करताना दिसतो आहे. कृष्णाच्या सल्ल्यावरून त्याने त्रिदंडी सन्यास घेतलाय त्यामुळे चित्रात अर्जुन धनुर्धारी नाही.

३. श्रीकृष्ण शिष्टाई !

महाभारतातील श्रीकृष्ण शिष्टाई म्हणजे कृष्णाने कौरव पांडवांच्यात केलेला समेटाचा प्रयत्न ! या चित्रात निर्भय कृष्ण आणि उद्दाम शिशुपाल आणि दिग्मूढ झालेला धृतराष्ट्र यांच्या चेहऱ्यावरचे भाव अतिशय स्पष्ट दिसतात. सुईच्या टोकावर मावेल इतकी जमीन देण्यास कौरवांनी नकार दिला तो याच प्रसंगात.

४. कीचकवधापूर्वीचा प्रसंग

पांडवांच्या अज्ञातवासात कीचकाच्या महालात द्रौपदी दासी म्हणून सैरंध्री या नावाने वावरत होती. कीचकाचे मन सैरंध्रीवर जडले आणि एका रात्री त्याने सैरंध्रीला आपल्या महालात सेवेसाठी बोलावले. पुढे होणाऱ्या प्रसंगाच्या भीतीने घाबरी झालेली द्रौपदी आणि तिचे मन वळवणारी दासी यांचे हे चित्र आहे.

५. राजहंस सांगतो किर्तीच्या तुझ्या कथा

रविवर्मांनी अनेक प्रेम कहाण्या आपल्या चित्रातून मांडल्या त्यापैकी एक चित्र म्हणजे नल-दमयंतीचे आख्यान. नलाला भेटण्यासाठी आतुर असलेली दमयंती हंसाच्या मदतीने त्याला संदेश पाठवते आहे हा या चित्राचा विषय आहे.

राजहंस सांगतो किर्तीच्या तुझ्या कथा
हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता ||

६. जटायू वध

रामायणातील अनेक प्रसंग रविवर्मांच्या चित्रांचा विषय होता. त्यापैकी ‘जटायू वध’ आणि समुद्राचे गर्वहरण या दोन्ही चित्रात प्रतिकार-क्रोध यांचे उत्कृष्ट चित्रण बघायला मिळते. जटायू वधाच्या चित्रात रावणाच्या सामर्थ्याचे चित्रण दैत्य म्हणून करण्यात रविवर्मा यशस्वी झाले आहेत.

७. समुद्र गर्वहरण

संपूर्ण रामायणात रामाचे चित्रण शांत-धीरगंभीर असे आहे. लंकेला पोहोचण्यापूर्वी दोनच प्रसंग रामाच्या रागाचे चित्रण करतात. त्यापैकी एक म्हणजे दिलेले वचन विसारणाऱ्या सुग्रीवाला लक्ष्मणातर्फे पाठवलेला निरोप आणि दुसरा म्हणजे समुद्र गर्वहरणाचा प्रसंग.

 

बोभाटाने सध्याच्या काळात रविवर्मांच्या शैलीत चित्रे काढणाऱ्यांचा शोध घेतला त्यापैकी पुण्याच्या एका कलाकाराची दोन चित्रे आम्ही तुमच्या समोर देत आहोत. या चित्रकाराचे नाव आहे ‘शंकर देवरुखे’.

 


सबस्क्राईब करा

* indicates required