पाकिस्तानात विमानाची वडाप सेवा : भरलेल्या विमानात कोंबले ७ प्रवासी

          "ओ ताई, जरा सरकून बसा की, अजून एक माणूस बसतोय" हे  वजनदार वाक्य फेकून आपल्याकडचे वडापवाले एकाच फेरीत भरपूर लोकांना इच्छीत स्थळी नेऊन सोडण्याची किमया करतात. त्या बिचार्‍या वाहनाच्या टपावर, बॉनेटवर बसून किंवा दोन्ही बाजूने झोंबकळत प्रवास करणारे प्रवासीही खूपच जिद्दी असतात राव. जीव गेला तरी बेहत्तर, पण गेलो तर यातूनच जाणार आणि आत्ताच जाणार. जणू ते वडाप सोडलं तर यांना दुसरं काही वाहन मिळणारच नाही...

          असो... आपल्याकडे हे रस्त्यांवर घडतं, पण पाकिस्तानात हे हवेत घडलंय !! हो, पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सने एका पूर्ण क्षमतेनं भरलेल्या विमानात जास्तीचे ७ प्रवासी भरले. आणि या प्रवाशांनी उभ्याने ३ तास प्रवास केला.

          २० जानेवारीला पीके-७४३ नावाचं हे विमान कराचीहून मदिनेला जातं होतं. स्टाफ मेंबर्सना धरून या विमानाची प्रवासी क्षमता होते ४०९ इतकी. पण प्रत्यक्षात मात्र या विमानात ४१६ प्रवासी होते. पाकिस्तानच्या 'डॉन' वृत्तपत्राने ही बाब उघड केली आहे. पाठवलं ते पाठवलं, निदान हे विमानाच्या कॅप्टनला तरी सांगायचं!  यानी ते तर केलंच नाही आणि वर या एक्स्ट्राच्या प्रवाशांना कॉम्प्युटर जनरेटेड पास देण्याऐवजी हाताने लिहिलेले पास दिले गेले. हद्द म्हणजे या विमानात इमर्जन्सीवेळी लागणारी कोणतीही साधनं उपलब्ध नव्हती... 


           इतिहासात पहिल्यांदाच अशाप्रकारे प्रवाशांचा जीव धोक्यात घालून केलेल्या या वाहतूकीची कोणतीही चौकशी झालेली नाही हेही एक आश्चर्यच. 

सबस्क्राईब करा

* indicates required