या बाईने पोलिसांकडे आपले बाळ का दिले ? वाचा हा अनोखा किस्सा !!

पोलीसा म्हणजे दरारा, धाक, चिरीमिरी घेणारे, उशिरा पोहोचणारे अशीच प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर असते. पण पोलीससुद्धा शेवटी माणूसच आहे ना राव. हे सिद्ध करणारा एक प्रसंग नुकताच घडला आहे. 

झालं असं की, तेलंगणाच्या मेहबूब नगर येथे पोलीस भरतीसाठीची SCTPC परीक्षा सुरु होती. परीक्षेला आलेल्या एका महिलेकडे तिचं तान्हुलं बाळ होतं. सोबत तिची नणंद होती. बाळाला नणंदेच्या हाती सोपवून ती परीक्षा द्यायला गेली. नणंद अवघ्या १५-१६ वर्षांची असल्याने बाळाला कसं सांभाळावं हे तिला समजलं नाही. बाळ जेव्हा रडू लागलं तेव्हा त्याला आवरता आवरता तिची दमछाक झाली. तिच्या मदतीला तिथेच ड्युटीवर असलेले एक कॉन्स्टेबल आले. त्यांचं नाव मुजीब-उर-रेहमान. मुजीब परीक्षा केंद्रावर देखरेखीसाठी तैनात होते. बाळाला शांत करण्यासाठी त्यांनी बाळाला खेळवायला सुरुवात केली. अर्धा तास बाळाला सांभाळल्यानंतर बाळ तिथेच झोपी गेले.

हा क्षण कॅमेऱ्यात टिपला आहे जिल्हा पोलीस प्रमुख रेमा राजेश्वरी यांनी. त्यांनी हा फोटो ट्विटरवर पोस्ट केल्यानंतर तो लगेचच व्हायरल झाला. फोटो मध्ये शांत झालेलं बाळ आणि त्याला खेळवत असलेले मुजीब आपण पाहू शकतो. नेटीझन्स या फोटोवर जाम खुश झालेत.

मी माझ्या डोळ्यांसमोर बाळाला रडताना पाहू शकत नाही असं त्यांनी एका इंटरव्यू मध्ये सांगितलं आहे.मंडळी, माणुसकी प्रत्येकामध्येच असते, पोलीस याला अपवाद कसे असतील? याच वर्षी उत्तराखंडमध्ये एका शीख पोलिसाने प्रसंगावधान बाळगत मुस्लीम मुलाला लोकांच्या तावडीतून सुखरूप बाहेर काढलं होतं. अशी अनेक उदाहरणं देता येतील ज्यात पोलिसांनी वर्दितली माणुसकी दाखवून दिली आहे. मुजीब-उर-रेहमान सारख्या पोलिसांना बोभाटाचा सलाम !!

 

 

आणखी वाचा :

या शीख ऑफीसरने प्राणांची पर्वा न करता जे केलं त्यामुळे तुमचा माणुसकीवरचा विश्वास नक्कीच वाढेल!

सबस्क्राईब करा

* indicates required