computer

बिहार पोलिसांची 'पोलीस पाठशाळा' काय आहे...त्याचा तरुणांना कसा उपयोग होतोय?

प्रत्येक राज्यात दरवर्षी पोलिस भरती होत असते. त्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. यात तरुण आणि तरुणी दोघेही वेगवेगळ्या पदांसाठी परीक्षा देतात. पोलीस भरतीसाठी होणारी परीक्षा किती खडतर असते हे आपण ऐकले असेलच. वेगवेगळ्या पदांसाठी शारिरीक आणि बौद्धिक चाचणी होते. ती यशस्वी करून पोलिसांत भरती व्हायचे स्वप्न या तरुणांचे असते. ही कठीण परीक्षा पास कशी करावी यासाठी जर पोलिसांकडूनच प्रशिक्षण मिळाले तर?  बिहार पोलिसांनी या तरुणांना मदत करण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन पाठशाळा सुरू केली आहे. बिहार राज्यचे पोलीस एकही पैसा न घेता या तरुणांना प्रशिक्षण देत आहेत.

पोलिसांत भरती होण्यासाठी जितका फिटनेस महत्त्वाचा असतो तितकिच लेखी परीक्षाही महत्वाची असते. जशी की शिपाई पदासाठी २०० गुणांच्या चाचणीत १०० गुण मैदानी चाचणी आणि १०० गुण लेखी चाचणी असते. त्यात यशस्वी झाल्यावरच भरतीसाठी तुम्ही पात्र होऊ शकता. महिलांसाठी चाचणी असते फक्त फरक एवढाच की थोडे निकष बदलले जातात. बिहारच्या भागलपूरमध्ये खास करून महिला सबलीकरणासाठी हे प्रशिक्षण सुरू झाले आहे. यात आत्तापर्यंत ३३ तरुणांना प्रशिक्षण दिले असून त्यात १८ मुली आहेत. महत्वाचे म्हणजे हे तरुण आता सब इन्स्पेक्टर आणि सार्जंट होण्यासाठी पात्र झाले आहेत. या प्रशिक्षणाचा या तरुणांना चांगला उपयोग होत आहे.

ही परीक्षा बिहार लोकसेवा आयोगाद्वारे घेतली जाते. डिसेंबर २०१६ मध्ये भागलपूरचे तत्कालीन एसएसपी मनोज कुमार यांनी या उपक्रमाची सुरुवात केली होती. त्यांनी विविध स्पर्धात्मक परीक्षा पास करण्यासाठी तरुणांना विनामूल्य शिकविण्यास सुरवात केली होती. तसेच पोलिस आणि इतर सेवांमधील प्रशिक्षणार्थींना शारीरिक क्षमता कशी वाढवावी यासाठीही प्रशिक्षण दिले.

यावेळेस कॉविड काळामुळे ऑनलाईन प्रशिक्षण दिले गेले.  या प्रशिक्षणामुळे १८ मुली आणि १५ मुले बिहार पोलिस उपनिरीक्षक आणि पोलिस कर्मचारी यांच्या पदासाठी पात्र ठरले आहेत. भागलपूरमधील शैक्षणिक आणि इतर नागरी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने पोलीस हे प्रशिक्षण चालवित आहेत. आणि त्याचा उपयोग गरजू तरुणांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी होत आहे.

पोलिस आहेत म्हणून सर्वसामान्य माणूस सुरक्षित आहे. पोलिसांच्या माणुसकीचे अनुभवही आपण खूपदा वाचले आहेत. बिहारच्या पोलिसांनी ही पाठशाळा चालवून सामाजिक बांधिलकीही दाखवून दिली आहे. त्यांच्या या कार्याला एक कडक सॅल्युट तर नक्कीच झाला पाहिजे.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required