computer

१०० वर्षांपेक्षा जास्त वयाचे भारतीय रेस्टॉरंट्स...या ८ पैकी किती रेस्टॉरंट्सना तुम्ही भेट दिली आहे?

असे म्हणतात की काही लोक खाण्यासाठी जगतात आणि  काही जगण्यासाठी खातात. आता या दोघांपैकी तुम्ही कोण आहात, हे तुम्ही ठरवायचे आहे. आता जेवणासाठी हॉटेलमध्ये जाणे काही नवीन राहिले नाही. नवनवीन जागा आपण शोधतच असतो. नवी जागा नवी चव. परंतु आज आम्ही अशा रेस्टॉरंट्सची यादी आणली आहे जिथे कदाचीत तुमचे आजी आजोबा जेवले असतील, निदान चहा तरी घेतला असेल. ही रेस्टॉरंट्स जवळजवळ १००वर्षे जुनी आहेत आणि आजही ग्राहकांना आकर्षित करत आहेत. पाहूया भारतातील सर्वात जुने रेस्टॉरंट जिथे तुम्ही नक्की भेट द्यायला हवी.

१. टुंडे कबाबी, लखनऊ 

लखनऊमधील टुंडे कबाब रेस्टॉरंट हे आपल्या स्वादिष्ट टुंडे/गलोटी कबाब, कोरमा आणि बिर्याणीसाठी वर्षानुवर्षे प्रसिद्ध आहे. इथले कबाब इतके मऊ असतात की ते तोंडात वितळतात. येथील स्वादिष्ट अन्नाचे रहस्य म्हणजे येथील घरगुती मसाले, जे येथील महिला स्वतः हाताने बनवतात. १९०५ मध्ये हाजी मुराद अली यांनी हे रेस्टॉरंट सुरू केले होते. लखनौच्या सर्वात जुन्या परिसरामध्ये तुम्हाला टुंडे कबाबचे दुकान मिळेल. हे रेस्टॉरंट इतके प्रसिद्ध आहे की इथल्या पदार्थांचा स्वाद घेण्यासाठी देशभरातून खवय्ये येतात. 

 

टुंडे कबाबचा सविस्तर इतिहास या लिंकवर वाचा: 

नबाब के कबाब : लखनऊचे प्रसिद्ध टुंडे कबाब आणि त्या मागचा गमतीशीर इतिहास !!!

२. फ्लरीस, कोलकाता -

कोलकात्याच्या पार्क स्ट्रीटवर गेलात की हे कॉफी शॉप तुम्हाला दिसेल. फ्लरिसची सुरुवात १९२७ मध्ये स्वित्झर्लंडच्या जे फ्लरी या जोडप्याने केली होती. कोलकाताचं हे एक लोकप्रिय कॉफी शॉप आहे. इथला इंग्लिश नाश्ता, कॉफी, स्पेगेटी, चहा, चॉकलेट मूस, सँडविच खूप चवदार असतात. प्रसिद्ध चित्रपट निर्माता सत्यजित रे बद्दल तुम्ही ऐकले असेलच, ते इथे नाश्त्यासाठी बऱ्याचदा येत असत. कोलकाता व्यतिरिक्त आता दिल्ली, मुंबई आणि हैदराबादमध्ये फ्लरीसचे १५ आऊटलेट्स आहेत.

३. लिओपोल्ड कॅफे, मुंबई - 

हे कॅफे मुंबईतील सर्वात जुन्या रेस्टॉरंट्सपैकी एक आहे. ते १८७१ साली बांधले गेले होते. मुंबईकर तर इथे भेट देतातच पण अनेक पर्यटकही येथे गर्दी करतात. इथे मेन्यूही विविध प्रकारच्या खाद्यपदार्थानी सजला आहे. मेनूमध्ये चायनीज खाद्यपदार्थ, इटालियन पदार्थ तसेच आपले भारतीय खाद्यपदार्थ देखील मिळतात. येथे भेट देणार असाल तर इथले हॉट चॉकलेट, पिझ्झा, चहा, सँडविच, सोया वाइन चिकन जरूर खाऊन पाहा. वर्षानुवर्षे त्यांनी पदार्थांची चव राखली आहे.

२६/११ चा हल्ला झाला तेव्हा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आलेल्या पहिल्या काही ठिकाणांमध्ये लिओपोल्ड कॅफेचा समावेश होतो. हल्ल्यात झाडण्यात आलेल्या गोळ्यांच्या खुणा या कॅफेने आजही जपून ठेवल्या आहेत.

४. शेख ब्रदर्स, गुवाहाटी - 

हे रेस्टॉरंट शेख गुलाम इब्राहिम यांनी १८०० च्या दशकात डिझाइन केले होते. गुवाहाटीतील हे सर्वात प्रसिद्ध रेस्टॉरंट आहे. असे म्हणतात की नेहरू कुटुंबसुद्धा बर्‍याचदा येथे जेवायला येत असत. या रेस्टॉरंटची सुरुवात ब्रेड आणि बिस्किटांपासून झाली आणि आता तुम्हाला बर्‍याच प्रकारचे केक, कुकीज, बिस्किटे आढळतील. आता हे रेस्टॉरंट तिसर्‍या पिढीच्या शेखांकडून चालवले जात आहे.

५. मावळ्ळी टिफिन रूम्स, बेंगळुरू

याला मावळ्ळी टिफिन रूम किंवा MTR रेस्टॉरंट म्हणून ओळखले जाते. त्याची स्थापना १९२४ मध्ये परमपल्ली यज्ञनारायण मैया आणि त्याच्या भावांनी केली होती. हे बंगळुरूमधील सर्वात जुने रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला इडली, रवा डोसा, मसाला डोसा इत्यादी दक्षिण भारतीय पदार्थ खायला मिळतील. या रेस्टॉरंटमध्ये स्वच्छतेचीही काळजी घेतली जाते. असे म्हणले जाते की दुसऱ्या विश्वयुद्धाच्या वेळी तांदळाची कमतरता असतानाही एमटीआरने सैनिकांना इडली पूरवल्या होत्या.

६. ग्लेनरी एस, दार्जिलिंग

ब्रिटिश काळापासून 'ग्लेनरी'ची ओळख इथल्या खास ब्रेकफास्टसाठी होती. इटालियन नाव वडो या नावाने उघडलेली ही बेकरी कम रेस्टॉरंट दार्जिलिंगच्या नेहरू रोडवरील महत्त्वाचे ठिकाण आहे. इथल्या मोठमोठ्या फ्रेंच विंडोज आणि टेरेसमधून जे अप्रतिम दृश्य दिसते त्याचा अनुभव घेण्यासाठी खवय्ये येथे नक्की भेट देतात. इथे नेहमीचे पदार्थ मिळतातच पण खास पारंपारिक पद्धतीने बनवलेले टार्ट्स, मार्झिपन्स आणि चॉकलेट नक्कीच चवदार आहेत. जुन्या युरोपीय पद्धतीचा अनुभव घेण्यासाठी तिथे फायरप्लेस, जुना टाइपराइटर आणि लाल टेलिफोन बूथही ठेवला आहे. दार्जिलिंगला गेल्यास इथे भेट द्यायला अजिबात विसरू नका.

७. दोराब्जी आणि सन्स, पुणे

१३८ वर्षांपूर्वी सोराब्जी दोराब्जी यांनी एक चहाचा स्टॉल सुरू केला होता आणि नंतर रेस्टॉरंट सुरू केले. आज त्यांचा पणतू हा वारसा पुढे चालवतो आहे. इथे अस्सल पारसी पदार्थ मिळतात आणि तेही पारंपरिक पद्धतीने बनवलेले. कोळशाच्या आगीवर पारंपारिक पदार्थ आजही येथे बनतात. आणि विशेष म्हणजे इथल्या मेन्यूमध्ये आजही पदार्थांच्या किमती 'रुपये' मध्ये न लिहिता 'आणा' म्हणून लिहिलेल्या आहेत. पुण्याच्या कॅम्पमध्ये असलेले हे हॉटेल एकदा जरूर भेट देण्यासारखे आहे.

८. करीम, दिल्ली 

जुन्या दिल्लीच्या जामा मशिदीच्या जवळ करीमचे हे रेस्टॉरंट आहे. हे रेस्टॉरंट हाजी करीमुद्दीन यांनी १९१३ मध्ये सुरू केले होते. हे शहरातले सर्वात प्रसिद्ध खाण्याचे ठिकाण आहे. इथे खाण्यासाठी कायम रांगा लागलेल्या असतात. इथले शाही जेवण सगळ्यांना आकर्षित करते. कोरमापासून कोफ्तापर्यंत तसेच इथले स्पेशल डिश म्हणजे बिर्याणी खूप स्वादिष्ट असते. मेन्यूमधला प्रत्येक पदार्थ अतिशय लज्जतदार असतो. दिल्लीत गेल्यास हे नाव अजिबात विसरू नका.

 

तुम्ही यातल्या कोणत्या रेस्टॉरंटला भेट दिली आहे?


लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required