नवरीच्या नावाने नवऱ्याला केलं बेजार....काय आहे ते नाव, पाहा बरं !!

राव, हल्ली लग्नपत्रिका घरोघरी जाऊन देण्याची पद्धत लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. पत्रिका स्वतःहून देण्याऐवजी त्याचा फोटो फॉरवर्ड केला जातो. म्हणजे काय तर, खर्च पण वाचतो आणि वेळपण वाचतो. पण सध्या याच शॉर्टकटने एका नवरदेवाच्या नाकी नऊ आणलेत राव. चला जाणून घेऊया नक्की काय घडलंय ते.

विभेश नावाच्या एका तरुणाने आपली लग्न पत्रिका छापली. ही पत्रिका थोडी हटके होती. पत्रिकेत लिहिलं होतं, “जो कोणी ‘ध्यनूर्हनगीती’ (Dhyanoorhanagithy ) हे नाव बरोबर उच्चारेल त्यालाच लग्नात एन्ट्री मिळेल.” आता हे नाव कोणाचं आहे असा प्रश्न पडणं साहजिक आहे. राव तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे नाव चक्क नवरीचं आहे. तिच्या अवघड नावामुळेच त्याने अशी पत्रिका छापली होती.

स्रोत

त्याने वर सांगितल्या प्रमाणे वेळ वाचवण्यासाठी ही पत्रिका व्हॉट्सअॅप वर फॉरवर्ड केली. पण पत्रिका नातेवाईकांपर्यंत न राहता ती व्हायरल झाली. काही दिवसांनी तर विभेशला स्वतःचीच पत्रिका व्हायरल मेसेज म्हणून आली तेव्हा तर त्याला धक्काच बसला.

या पत्रिकेत विभेशचा मोबाईल नंबर असल्याने त्याला अनोळखी माणसांचे सतत फोन येऊ लागले. या फोन कॉल्सने तो प्रचंड वैतागला. फोन करणाऱ्या प्रत्येकाला या नवा बद्दल जाणून घ्यायचं होतं. त्यांचा एकचं प्रश्न होता, ‘या नावाचा अर्थ काय ?’

स्रोत

ध्यनूर्हनगीतीने आपल्या नावाबद्दल सांगताना म्हटलंय की तिच्या वडिलांना साहित्यात फार रस होता. आपल्या मुलीचं नाव वेगळं असावं या कारणाने त्यांनी ‘ध्यनूर्हनगीती’ हे नाव दिलं. पण हे नाव अनेकांना पचनी पडलेलं नाही. विभेशच्या मित्रांनी त्याला उलट सवाल केला आहे. “अशा नावाच्या मुलीशी तू लग्न कसं करू शकतो ?”

राव, लोकांच्या चौकशीला वैतागून तो आता पोलीस स्टेशन गाठणार आहे. व्हायरल मेसेजमुळे एखाद्या माणसाला किती छळलं जाऊ शकतं याचं हे उत्तम उदाहरण आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required