computer

रणरागिणींच्या कथा: बलाढ्य रोमन साम्राज्यासमोर स्वत: न झुकलेली आणि मृत्यूनंतर जनतेलाही न झुकण्याची प्रेरणा देणारी धैर्यशाली शूर राणी तेउता!!

आजची कथा आहे राणी तेउताची. ही युरोपातल्या एका छोट्याशा राज्याची खरंतर राजमाता. तिचा जन्म कधी झाला याचीही माहिती नाही. इसवीसन पूर्व २३१ मध्ये मृत्यू पावलेल्या या छोट्या राज्याची राणी बलाढ्य रोमन साम्राज्यासमोर नमली नाही, तिचा मृत्यूही तिच्या जनतेसाठी इतका प्रेरणादायी होता की त्यांनीही रोमन सम्राटांसमोर कधीच मान झुकवली नाही. जाणून घेऊया या धैर्यशाली शूर राणी तेउताबद्दल!!

युरोपाचा नकाशा पाहिलात तर एका बाजूला इटली आणि दुसऱ्या बाजूला जुना युगोस्लाव्हिया आहे. आता त्याचे तुकडे पडून स्लोव्हेनिया, क्रोएशिया, बॉस्निया -हर्झगोवेना, सर्बिया, मॅसेडोनिया असे बरेच तुकडे झाले आहेत. जुन्या युगोस्लाव्हियाच्या शेजारी अल्बेनियाही आहे. या दोन मुख्य भूभांगामधल्या चिंचोळ्या दिसणाऱ्या भागात आहे ॲड्रिॲटिक समुद्र. या ॲड्रिॲटिक समुद्राच्या पश्चिमेला आणि बाल्कन बेटाच्या वायव्येच्या प्रांतात कधीकाळी इलीरीयन्स या इंडो-युरोपियन लोकांचा वावर होता. यांचे स्वतःचे राज्य होते. डान्यूब नदीपासून दक्षिणेला ॲड्रिॲटिक समुद्रापर्यंत आणि तिथून पूर्वेकडे सार डोंगर रांगापर्यंत म्हणजेच कोसोवो देशापर्यंत त्याचे हे राज्य विस्तारले होते. या राज्यात असंख्य जमाती होत्या आणि या प्रत्येक जमातीची स्वतःची प्रशासन व्यवस्था होती. अशा अनेक जमाती आणि त्यांचे प्रमुख एकत्र येऊन त्यांनी हे राज्य वसवले होते. इलीरीयन साम्राज्याची राजधानी होती स्कोड्रा, म्हणजे आताचे अल्बेनियामधले श्कोडेर शहर. या राज्यात सुमारे तिसऱ्या शतकाच्या उत्तरार्धात अग्रॉन नावाचा एक खूप मोठा राजा होऊन गेला. अग्रॉन हा माणूस कमी आणि राक्षसच जास्त वाटायचा. साम्राज्य विस्ताराची त्याची हावच तशी होती. हा अग्रॉन राणी तेउताचा पती होता.

आसपासचा सारा प्रदेश जिंकल्यानंतर अग्रॉनची नजर ग्रीसकडे वळली. ग्रीसच्या सीमेवरच राहणाऱ्या एटोलियन्स जमातीने मात्र त्याला कडवी झुंज दिली. त्याला आपला संभाव्य पराभव काही सहन होईना आणि एकेदिवशी संपूर्ण शहर गाढ झोपलेले असताना अग्रॉनने आपले ५००० सैन्य त्या शहरात घुसवले. रात्रीच्या वेळी अचानक झालेल्या या हल्ल्याने एटोलियन्स हडबडून गेले. एटोलियन्सचा संपूर्ण पराभव केल्यानंतरच अग्रॉनच्या आत्म्याला शांती मिळाली. इतके दिवस शत्रूला नामोहरम करण्याचा प्रयत्न केल्यानंतर आणि त्याच्याशी दिलेल्या कडव्या झुंजीचे यशात रुपांतर झाल्यानंतर विजय साजरा करणे तर आवश्यक होते. त्या रात्री अग्रॉनने आपल्या सर्व सैनिकांसाठी जंगी बेत आखून मेजवानी दिली. विजय साजरा करण्याच्या या धुंदीत तो इतका प्यायला की दुसऱ्या दिवशी दारूने त्याचे पोट फुटले आणि तो मरण पावला.

राजा अग्रॉन मृत्युमुखी पडल्यानंतर इलीरीयाच्या गादीवर दोन वर्षाच्या सावत्र मुलाला बसवून राणी तेउताने राज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. तिनेही पतीच्या माघारी साम्राज्यविस्ताराचे धोरण तितक्याच आवेगाने राबवले. ती इतकी ताकदवर झाली होती की बलाढ्य रोमन साम्राज्यालाही आव्हान देण्याचे धैर्य तिच्यात आले होते. रोमच्या ताकदीपुढे झुकण्यास तिने सपशेल नकार दिला.

इसवीसन पूर्व २१४ च्या दरम्यान रोम साम्राज्य हे जगातील एक मोठी सत्ता बनून उदयास आले होते. सिसिली आणि सार्दिनियाचे बेट जिंकल्यानंतर तर त्यांच्या सामर्थ्यात आणखीन भर पडली होती. त्या प्रदेशात त्यांच्या तुल्यबळ असे एकही साम्राज्य उरले नव्हते. ग्रीसशी व्यापार करण्याच्या बहाण्याने भूमध्य समुद्रावरही ते स्वतःचे वर्चस्व दाखवू लागले होते.

अशा रोमच्या पश्चिमेला राजा आर्गनच्या नेतृत्वाखाली इलीरीयन साम्राज्य विस्तारत होते. राजा आर्गनच्या मृत्युनंतर तेउताच्या नेतृत्वाखालीही हे साम्राज्य त्याच गतीने विस्तारत होते. समुद्र पर्यटन आणि समुद्रामार्गे चाललेल्या व्यापारातही आता हे लोक पुढे होते. तेउताच्या सैन्यांनी ग्रीक प्रांतात प्रवेश करून ग्रीसच्या सीमेवरील काही शहरे ताब्यात घेतल्यानंतर मात्र रोम साम्राज्याची अस्वस्थता वाढू लागली. कारण ग्रीसशी त्यांचा व्यापार याच मार्गाने चालत असे. आपल्या मार्गातील महत्वाची शहरे या इलीरीयन लोकांनी जिंकली हे त्यांना सहजी पचनी पडण्यासारखे नव्हतेच.

राणी तेउताने समुद्री चाच्यांचीही फौज उभी केली होती. हे चाचे रोमच्या व्यापारी जहाजांची लूट करू लागले तेव्हा रोमचा अजूनच जळफळाट होऊ लागला. रोमच्या शासकांनी राणी तेउताशी चर्चा करून या प्रश्नावर तोडगा काढावा असे ठरवले आणि त्याप्रमाणे त्यांचे दोन प्रतिनिधी राणी तेउताला भेटण्यासाठी पाठवले. राणीच्या समुद्री चाच्यांनी रोमच्या व्यापारी जहाजांच्या जाण्या-येण्यात कसलाही हस्तक्षेप करू नये असा करार करण्याचा उद्देशाने हे प्रतिनिधी आले होते. त्यांना वाटले राणी या प्रस्तावाला सहज होकार देईल. एका छोट्या प्रदेशाच्या राणीला बलाढ्य रोम साम्राज्याशी शत्रुत्व घेणे परवडणार नाही. पण राणीने त्यांचा प्रस्ताव नाकारल्यानंतर या प्रतिनिधींना चांगलाच धक्का बसला. राणीच्या या नकाराने संतप्त झालेल्या त्या प्रतिनिधींनी राणीचा अपमान केला आणि याबदल्यात राणीने त्यातील एकाला यमसदनी पाठवण्याची व्यवस्था केली. परतीच्या प्रवासात असतानाच त्यांचा काटा काढण्यात आला. रोम साम्राज्याला हे अजिबात अपेक्षित नव्हते. तहाची बोलणी करण्यास पाठवलेल्या प्रतिनिधीशी दगाबाजी म्हणजे युद्धाला आमंत्रणच!

रोमने आपली बलाढ्य सेना पाठवून राणी तेउताला आव्हान दिले. वीस हजार इटालियन फौजेचा सामना करण्यासाठी राणी तेउताने देखील मोठी तयारी केली होती पण राणी तेउताचा सल्लागार दिमित्रीयसने अचानकच इटालियन फौजेपुढे शरणागती पत्करली. त्याने अशाप्रकारे राणीशी दगाबाजी का केली याचे उत्तर मात्र मिळू शकले नाही. तिच्या जवळच्या व्यक्तीनेच अशाप्रकारे पाठीत खंजर खुपसल्याने आक्रमक रोम सैन्यासमोर शरणागती पत्करण्याशिवाय तिच्या समोर कोणताच पर्याय शिल्लक नव्हता. ती रोमन साम्राज्याची एक मांडलिक सदस्य बनून राहण्यास तयार झाली.

यामुळे इलीरीयन साम्राज्य रोमच्या ताब्यात गेले. यानंतर राणी तेउताचे उर्वरितआयुष्य फारच हलाखीत गेल्याचे म्हटले जाते. रोमची गुलामी करणे तिला पसंत नव्हते, त्यामुळे नंतर तिने एका उंच कड्यावरून झोकून देऊन आपली जीवनयात्रा संपवली. तिचे हे बलिदान इलीरीयन्सच्या पुढील पिढ्यांसाठी एक प्रेरणा बनून राहिले.

रोमन साम्राज्याचा भाग असूनही इलीरीयन्सनी कधीच त्यांचे वर्चस्व मान्य केले नाही. उलट त्यांनी अनेकदा बंडखोरी करून रोमन साम्राज्यात अस्थिरता निर्माण केली. इलीरीयन्स बंडखोरांनी दोनदा रोमन साम्राज्याशी युद्धही केले. पुढच्या शंभर वर्षासाठी हा असंतोष असाच खदखदत राहिला. रोमन साम्राज्याला इलीरीयन्सचीही बंडखोरी कधीच चिरडता आली नाही.

राणी तेउताने आपल्या लोकांमध्ये इतकी ऊर्जा भरली होती की, स्वतंत्र बाण्याच्या इलीरीयन्सनी रोमन साम्राज्यासमोर कधीच हार मानली नाही.

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required