९५० हून अधिक मुलांना वाचवणारी सुपर कॉप...तिने केलेलं कार्य पोलिसांसाठी अभिमानास्पद आहे!!

काम करत असताना समाजाबद्दल कळकळ असेल तर काय होऊ शकते याचे जिवंत उदाहरण म्हणजे रेखा मिश्रा. त्यांच्या कामामुळे कित्येक कुटुंबाना मुख्य प्रवाहात येण्यासाठी मदत झाली आहे. त्यांच्या कामाची दखल स्वतः राष्ट्रपतींनी घेतली आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या आयुष्यावर बेतलेला धडा महाराष्ट्रात दहावीच्या पाठ्यपुस्तकात शिकवला जातो.
रेखा मिश्रा या मूळ प्रयागराज येथील आहेत. २०१५ साली त्यांची निवड आरपीएफमध्ये झाली, तर पोस्टिंग मिळाली थेट मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे. येथे काम करत असताना त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ती म्हणजे मुंबईच्या चंदेरी दुनियेकडे आकर्षित होऊन अनेक मुले घरातून पळून येतात. पण त्यांना इकडे वाईट आयुष्य जगावे लागते.
अशा मुलांना त्यांच्या कुटुंबीयांकडे व्यवस्थित परत पाठविण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. आजवर त्यांनी जवळपास ९५० पेक्षा जास्त मुलांना वाचवून त्यांच्या आईवडिलांशी भेट घालून दिली आहे. या दरम्यान त्यांना अनेक अनुभव आले. एकदा एक दहावीतली मुलगी हिरोईन होण्यासाठी यूपीतून पळून आली. पण मुंबईत चुकीच्या लोकांमुळे तिचे हाल झाले. रेखा मिश्रा यांना तिच्याबद्दल कळाल्यावर त्यांनी तिला एका एनजीओच्या माध्यमातून घरी पोहोचवले. तिच्या आई वडिलांना मुलगी सापडली म्हणून आकाश ठेंगणे झाले होते. अशा कामामुळे कामाच्या तासांव्यतिरिक्त पण अनेक तास रेखा मिश्रा काम करत असतात. एकदा तर त्या सलग ४८ तास काम करत होत्या.
रेखा मिश्रा सांगतात की अनेक लहान शहरांतील मुले सिनेस्टार्सना भेटण्यासाठी किंवा स्वतः हिरो बनण्यासाठी मुंबईत येतात. अशा मुलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून स्वतःचा फायदा करून घेणाऱ्या लोकांमुळे त्यांचे आयुष्य वाया जाते. अशा मुलांना शोधून, त्यांना व्यवस्थित समज देऊन त्यांच्या कुटुंबापर्यंत त्यांना पोहोचवण्याचे काम त्या सातत्याने करत आहेत.
रेखा मिश्रा यांच्या या कामाचा गौरव म्हणून त्यांना २०१७ साली राष्ट्रपतींच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार देण्यात आला होता. तसेच FCCI ने त्यांना स्मार्ट पोलिसिंग पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता. महाराष्ट्र सरकारने देखील त्यांच्या कामाची दखल घेत थेट १०वीच्या पाठ्यपुस्तकात त्यांचा धडा दिला आहे.