गाणार्या व्हायोलीनचे सूर हरपले ! ज्येष्ठ व्हायोलीन वादक प्रभाकर जोग यांचे निधन !

कालचा दिवस संगीतप्रेमींसाठी फारच वाईट बातमी घेऊन आला. महाराष्ट्रातील तीन पिढ्यांचे कान आपल्या व्हायोलिन वादनातुन तृप्त करणारे प्रसिध्द व्हायोलिनवादक प्रभाकर जोग यांचे पुण्यात निधन झाले आहे. गीतरामायणाला आपल्या व्हायोलिनवादनाने समृद्ध करणारे म्हणून प्रभाकर जोग यांची ओळख मराठी मनात कायमस्वरूपी कोरली गेली आहे.
ते १२ वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी जोगांनी पुण्यात व्हायोलीन वादनास सुरुवात केली होती. या कमी वयात घरांमध्ये गाण्यापासून सुरू झालेला हा प्रवास थेट देश-विदेशात ५०० पेक्षा अधिक कार्यक्रम करून थांबला आहे. ज्यांच्या वादनातून शब्द ऐकू येतात असे म्हटले जायचे. म्हणून 'गाणारे व्हायोलिन' आता शांत झाले अशा दु:ख व्यक्त करणार्या प्रतिक्रिया लोकांकडून येत आहेत.
जोग यांच्यात असलेली प्रतिभा सुधीर फडकेंसारख्या संगीतकारांनी ओळखली नसती तर नवलच. गीतरामायणाचे ५०० पेक्षा अधिक प्रयोगाला सुधीर फडक्यांना त्यांनी सोबत केली. गुरूदेवदत्त हा त्यांचा पहिला मराठी सिनेमा होता, पण 'लपविलास तू हिरवा चाफा' या गाण्याने त्यांची संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख आपल्याला झाली. त्यानंतर अनेक मराठी चित्रपटातील त्यांची गाणी गाजली. कुंकवाचा करंडा या चित्रपटातलं 'आज प्रीतीला पंख हे लाभले रे', 'उद्योगाचे घरी देवता लक्ष्मी वास करी' (थांब लक्ष्मी कुंकू लावते), 'गाऊ मोटेवरचं गाणं' (आंधळा मारतो डोळा) अशी अनेक गीतं गाजली.
जोग यांच्या सांगीतिक कारकिर्दीचा सन्मान म्हणून त्यांना आजवर अनेक पुरस्कार देण्यात आले आहेत. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, २०१५ साली मिळालेला लाईफ टाईम अचिवमेंट अवॉर्ड यांचा समावेश आहे. जोग यांनी 'स्वर आले जुळूनी' या आपल्या आत्मचरित्रात त्यांचा आयुष्याचा प्रवास प्रभावी शब्दात मांडला आहे.
अलीकडच्या काळात 'गाणारं व्हायोलीन' या आल्बमच्या माध्यमातून त्यांचा नवा श्रोतृवृंद तयार झाला होता. अनेक सार्वजनिक कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी या आल्बमच्या गाण्यांमुळे मुग्ध होऊन प्रेक्षक खुर्चीवर बसूनच असायचे, मुख्य कार्यक्रमाला उशीर झाला तरी तो कोणाच्याही लक्षात यायचा नाही. आज त्याच आल्बममधील काही गाण्यांसोबत इतर गाणीही ऐकूया!!
प्रभाकर जोगांना बोभाटाकडून आदरांजली. आज ते आपल्यात नसले तरी डिजिटल मिडिया आणि युट्यूबवरती त्यांच्या कलाकृती आपल्यासोबत नेहमीच राहतील.